केस कलर करणं हा एक सौंदर्यसाधनेचा महत्त्वाचा भाग झाला आहे. केस पांढरे झाले तरच मेहेंदी लावणं, डाय लावणं असं व्हायचं पण आता केस काळेभोर असले तरी केस कलर करण्याची फॅशन आहे. ही फॅशन केसांना वेगळी रंगत आणते हे खरं पण असते खर्चिक. शिवाय कोणाच्या केसांचा कलर बराच काळ टिकून राहातो तर कोणाचा पटकन उतरतो.
एवढे पैसे खर्च करुन केस कलर केले आहे, तर कलर टिकून राहावा यासाठी केस नियमित धुणे, केसांना तेल लावणे या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे केस खराब होतात. केस कोरडे आणि निस्तेज दिसतात. कलर टिकवण्याच्या हट्टापायी केसांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा थेट परिणाम केसांच्या पोषणावर होतो. असं होवू नये, केसांना केलेला कलर दीर्घकाळ शाबूत राहून केसांचं नीट पोषण होण्यासाठी काही नैसर्गिक उपाय आहेत. हे उपाय केल्यानं कलर केलेल्या केसांचा रंग आणि केसांचं आरोग्य दोन्हीही शाबूत राहातं.
Image: Google
नैसर्गिक हेअर मास्कचा उपाय
1. ऑलिव्ह ऑइल आणि अनसॉल्टेड बटर यांचा वापर करुन तयार होणारं हे हेअर मास्क केसांची गुणवत्ता राखण्यासाठी महत्त्वाचं आहे. हे हेअर मास्क तयार करण्यासाठी एका भांड्यात अर्धा कप ऑलिव्ह ऑइल, त्यात 2 चमचे अनसॉल्टेड बटर घालून ते चांगलं तेलात एकजीव करावं. त्यानंतर यात एक चमचा सुकी रोजमेरी घालून मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. हे मिर्शण 5 मिनिटं उकळत ठेवावं. गॅस बंद करुन ते गाळून घ्यावं. हे मिश्रण कोमट झालं की ते केसांवर लावावं. ते केसांना मसाज करत लावावं. एक पाच दहा मिनिटं मसाज झाल्यावर एक तास केसांवर हा मास्क तसाच राहू द्यावा. तासाभरानंतर सौम्य शाम्पूनं केस धुवावेत. या हेअर मास्कमुळे केसांना केलेला कलर तर टिकतोच सोबत केस देखील मजबूत होतात.
2. केळ आणि खोबर्याच्या तेलाचा वापर करुन परिणामकारक हेअर मास्क तयार होतं. हे मास्क तयार करण्यासाठी एक केळ घ्यावं. ते कुस्करुन घेतलं की त्यात 2 चमचे खोबर्याचं तेल घालावं. केळ आणि तेल चांगलं एकजीव करुन घ्यावं. नंतर या मिश्रणात एक अंडं फोडून घालावं आणि ते चांगलं मिसळून घ्यावं. आता हे मिश्रण लेपाप्रमाणे केसांना लावावं. हा लेप केसांवर 40 मिनिटं ठेवावा. केस धुतांना सौम्य शाम्पूचा वापर करावा.
Image: Google
उपायासोबत काळजीही महत्त्वाची
केसांना केलेला कलर टिकवण्यासाठी सोबत केसही चांगले राहाण्यासाठी हेअर मास्क जसे प्रभावी उपाय आहेत. पण या उपायांसोबतच काही गोष्टींची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. यासाठी केसांची काळजी घेतांनाचा पहिला नियम म्हणजे कधीही घरातून बाहेर निघताना केसांवर सूर्याच्या हानिकारक किरणांचा परिणाम होवू नये यासाठी केसांना स्कार्फ बांधून बाहेर पडावं. यामुळे केसांवरचा कलर तर सुरक्षित राहातोच शिवाय केस रुक्षही होत नाही.