उन्हाळ्यात केसांची काळजी घेणं म्हणजे आव्हानच असतं. गरम होत असल्यानं सतत घाम येतो. केसांच्या मुळाशी तेल निर्मितीही जास्त होते. केस घाम आणि तेलामुळे चिपचिपे दिसतात. केसांचा तेलकटपणा काढायचा म्हणजे केसांना शाम्पू लावून केस धुणं आलंच. पण उन्हाळ्यात ही समस्या कायम असते. अशा वेळेस केसांना सारखा शाम्पू लावणं केसांसाठी घातक ठरतं.
Image: Google
केस सतत शाम्पूनं धुतल्यास टाळूकडील त्वचा, केसांची मुळं कोरडी होतात. यामुळे टाळूकडील त्वचेत पूर्वीपेक्षा जास्त तेल निर्मिती होते त्यामुळे केस आणखी खराब होतात. अशा वेळेस केसांचा चिपचिपेपणा दूर करण्यासाठी शाम्पूशिवाय इतर पर्याय अवलंबवावे. सेलिब्रेटी मेकअप आर्टिस्ट आणि स्किन केयर एक्सपर्ट रिया वशिष्ट शाम्पूशिवाय केस ऑइल फ्री ठेवण्याचे पर्याय सांगतात.
Image: Google
मुलतानी माती
नैसर्गिकरित्या केस ऑइल फ्री ठेवण्यासाठी मुलतानी मातीचा उपयोग करता येतो. मुल्तानी मातीत कोणतेही रासायनिक घटक नसतात. त्यामुळे मुल्तानी मातीचा केसांवर दुष्परिणाम होत नाही. केसांसाठी मुल्तानी माती वापरल्यास कोंडा, खाज, उवा लिखा या समस्याही दूर होतात. केसांना मुल्तानी माती लावण्यासाठी रात्री मुल्तानी माती पाण्यात भिजत घालावी. दुसऱ्या दिवशी ती चांगली मिसळून घ्यावी. मग ही मुल्तानी माती हातावर घेऊन त्याने हलक्या हातानं केसांना मसाज करावा. संपूर्ण केसांना मुल्तानी माती लावावी. थोडा वेळ केसांवर राहू द्यावी मग केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. केस आणि टाळूकडील त्वचा स्वच्छ होते.
Image: Google
रीठे आणि आवळा पावडर
केसांचा चिपचिपेपणा दूर करण्यासाठी एका वाटीत आवळा पावडर आणि रीठे पावडर घालावी. त्यात पाणी घालून मऊ पेस्ट करावी. ही पेस्ट केसांना लावावी आणि केसांच्या मुळांशी मसाजही करावी. मसाज केल्यानंतर थोडा वेळ थांबावं आणि नंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत.
Image: Google
बेबी पावडर
केस जर तेलकट वाटत असतील आणि केस धुवायलाही वेळ नसेल तर आणखी एका पध्दतीनं केस लगेच ऑइल फ्री करता येतात. यासाठी बेबी पावडरचा उपयोग होतो. केसांच्या मुळांशी थोडी बेबी पावडर भुरभुरावी. यासाठी मेकअप ब्रशचाही वापर करता येतो. नंतर बोटांनी केसांच्या मुळाशी हलका मसाज करावा. बेबी पावडर केसांच्या मुळाशी असलेलं जास्तीचं तेल शोषून घेतं आणि केस मस्त मोकळे होतात.