Join us  

हॉट उन्हाळ्यातही कूल लूक शक्य आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 2:41 PM

उन्हाळा म्हणजे सौंदर्याचा शत्रू असं मानण्याच काहीच कारण नाही. घरातले सोपे उपाय करुन प्रखर उन्हातही आपण आपलं सौंदर्य जपू शकतो.

ठळक मुद्देउन्हामुळे त्वचा काळवंडते. हा काळवंडलेपणा कमी होण्यासाठी बदाम, मसूर आणि ताकाचा उपयोग करावा. होरपळलेल्या त्वचेवरचा लालसरपणा कमी होण्यासाठी चंदनाची पावडर वापरावी. घामोळयांसारख्या काटेरी पुळ्यांसाठी ताकाचा वापर करावा.

- डॉ. निर्मला शेट्टीउन्हाळा सुरू झालाय. कामानिमित्त बाहेर पडावंच लागतं. स्कार्फ, सनकोट, स्टोल, गॉगल घालून कितीही उन्हापासून वाचायचा प्रयत्न केला तरी उन्हाच्या झळां लागतातच.आणि त्यामुळे त्वचेचं नुकसान होतं. चेहेरा काळवंडणे, रॅशेस, मुरुम, पुटकुळ्या, फोड, कोरडे केस, घामोळ्या अशा एक ना अनेक समस्या उन्हामुळे त्वचा खराब होते त्यामुळे नको तो उन्हाळा असं वाटायला लागतं.उन्हाळा हा आता पुढे पुढे तीव्रच होत जाणार आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून त्वचेचं रक्षण करणं हाच त्यावरचा उत्तम उपाय आहे. हा उपाय शोधण्यासाठी बाहेर शोधाशोध करण्याची गरज नाही.उन्हाळ्याच्या चार महिन्यात पुरेसं पाणी प्यायलं, हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ली तर शरीरातलं पाण्याचं प्रमाण योग्य राहतं. तसेच बदाम, मसुराची डाळ, ताक, तुळस, पुदिना, संत्री, गाजर या घरात सहज उपलब्ध होवू शकणार्‍या जिन्नसांचा वापर करून पेस्ट बनवल्या आणि चेहर्‍यावर लावल्या तर प्रखर उन्हातही आपण आपली त्वचा आणि सौंदर्य जपू शकतो. उन्हापासून त्वचेचं सौंदर्य जपण्याचे उपाय अगदीच सोपे आणि कमी खर्चिक आहेत.

बदाम, मसूराचा लेप

उन्हामुळे त्वचा काळवंडते. हा काळवंडलेपणा कमी होण्यासाठी चार बदाम आणि तीन चमचे मसूर डाळ ताकामध्ये दोन तास भिजवावे. नंतर बदाम सोलून घेवून बदाम आणि मसूर डाळ वाटून घ्यावी. तयार झालेली पेस्ट चेहर्‍याला आणि मानेला लावावी. लेप वाळला की थोडं ताक घेवून चेहरा धुवावा.

 

तुळस, पुदिना कडूलिंबाचा रस

उन्हाळयाच्या काळात अनेकांना चेहर्‍यावर उष्णतेचे मोठे मोठे फोड येतत. ते कमी होण्यासाठी दहा तुळशीची पानं, दहा पुदिन्याची पानं आणि चार कडूलिंबाची पानं घ्यावीत. ती स्वच्छ धुवून रगडावीत. आणि तो रस फोडांना लावावा. फोड जाईपर्यंत दिवसातून दोन-तीनवेळा हा रस लावावा.तसेच घामोळयांसारख्या काटेरी पुळ्यांसाठी ताकाचा वापर करावा. दिवसातून दोन ते तीनवेळा नुसतं ताक लावावं. यामुळे घामोळ्या कमी होतात.चंदन आणि ताकप्रखर उन्हाळामुळे त्वचा होरपळते. लाल होते. हा लालसरपणा कमी होण्यासाठी चंदनाची पावडर ताकात कालवून लावावी.

संत्री, गाजर आणि ग्लिसरीन

उन्हाळ्यातल्या ‘हॉट’ वातावरणातही त्वचा कूल राहू शकते. चमकू शकते. यासाठी संत्र्याचा रस आणि गाजराचा रस समप्रमाणात घेवून एकत्र करावा. त्यात एक चमचा ग्लिसरीन टाकावं. आणि हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा चेहर्‍यावर लावावं. ते सुकलं की चेहरा थंड पाण्यानं धुवावा.( लेखिका सौंदर्यतज्ज्ञ आहेत.)info@nirmalherbal.com.