Join us  

केसांवर ‘कूल’ जादू, त्वचेला चमक देणारी सिक्रेट गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 9:04 PM

आपण बाजारातून महागडं कोरफड जेल विकत आणण्यापेक्षा आपल्या घरातल्या कुंडीतच लावू तजेल्याचं रोप.

ठळक मुद्देकोरफडीमध्ये 99 टक्के पाण्याचा अंश असल्यानं तिचा उपयोग त्वचेवर केला तर त्वचेला मॉश्चरायझर मिळतं. त्वचेवर लाल चट्टे येणं, दाह होणं या त्वचाविकारात त्वचेच्या बाह्य आवरणाचं रक्षण कोरफड करू शकते. आपल्या केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर हवं असेल त्यांनी कोरफडीचा ताजा गर काढून तो केसांना कंडिशनर म्हणून लावावा.

-निर्मला शेट्टीघरात बाग लावताना बरेच जण तुळशीच्या रोपाबरोबर कुंडीत कोरफडही लावतात. ही कोरफड एकाच वेळेस अनेक आजारांवर घरच्या घरी उपचार करते. कोरफडीमध्ये औषधी गुणांचा खजिना दडलेला आहे. त्याचमुळे समस्या केसांची असो की त्वचेची, खाज असो नाही तर दाह कोरफड फार महत्त्वाची.

कोरफडीमध्ये ए, सी, बी 1, बी 2, बी 3, बी 6 आणि इ जीवनसत्त्वं असतं. काही प्रकारच्या कोरफडीमध्ये बी 12 हे जीवनसत्त्वही आढळतं. कॅल्शियम, तांबं, मॅग्नेशियम, पोटॅशियम, डिंकासह एकूण वीस खनिजं कोरफडीमध्ये आढळतात. सौंदर्यप्रसाधनांच्या जगात कोरफड अतिशय लोकप्रिय आहे. त्वचा मऊ-मुलायम करणं, खाज-खरूज यापासून त्वचेचं रक्षण करणं यासाठी कोरफडीचा उपयोग आवजरून केला जातो. कोरफडीमध्ये 99 टक्के पाण्याचा अंश असल्यानं तिचा उपयोग त्वचेवर केला तर त्वचेला मॉश्चरायझर मिळतं. त्वचेत नवचैतन्य येऊन त्वचा टवटवीत होते. त्वचा मऊ आणि लवचिकही होते. त्वचेसाठी नियमितपणो कोरफड वापरल्यास त्वचा जास्तीत जास्त ऑक्सिजन शोषून घेऊ शकते.

कोरफडीचा उपयोग करून आपण डोक्यापासून पायाच्या टाचेपर्यंतचे अनेक प्रश्न सहज सोडवू शकतो. कोरफड ही औषधी असते हे सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त तिचा उपयोग योग्य रीतीनं व्हायला हवा!मुख्य म्हणजे बाहेरून ऑलिवेरा क्रीम आणून लावण्यापेक्षा आपल्या घरातल्या कुंडीतली कोरफडच थेट लावणं उत्तम.

 

खाज-दाह आणि कोरफड

* त्वचेवर लाल चट्टे येणं, दाह होणं या त्वचाविकारात त्वचेच्या बाह्य आवरणाचं रक्षण कोरफड करू शकते. तसेच त्वचेचा दाहही कोरफडीमुळे कमी होतो.* कोरफडीमध्ये जीवाणू प्रतिबंधक घटक असल्यामुळे कोरफड मुरूम, पुटकुळ्या यासाठी कोरफड लावावी.          चेह-यावर जिथे मुरूम पुटकुळ्या आहेत तिथे ताज्या कोरफडीचा गर लावावा. दहा मीनिटांनी चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. कोरफडीमुळे मुरूम-पुटकुळ्या पटकन सुकण्यास मदत होते आणि त्वचेचा पोतही सुधारतो.* जखमा, वेदना आणि खाज कमी करण्याचे गुणधर्म कोरफडीमध्ये असतात.* अति उन्हानं काळवंडलेल्या चेह-यासाठी कोरफडीचा उपयोग करायचा असेल तर कोरफडीची एखादी तयार पात तोडून ती फ्रीजमध्ये ठेवावी. आणि रोज त्याचा छोटा तुकडा घेवून काळवंडलेल्या भागावर घासून लावावा. यामुळे त्वचा एकदम मऊ-मुलायम होते.* एखादा किटक चावला तर चावल्याच्या जागी कोरडीचा ताजा गर लावावा. दंशाचा दाह यामुळे एकदम कमी होतो.

केसातल्या कोंडय़ावर औषध

पपईची एक फोड, अर्ध केळं, पाऊण कप कोरफडीचा पाणी घालून पातळ केलेला गर, पाऊण कप खोबऱ्याचं तेल घेऊन हे सर्व साहित्य एकत्र घुसळून त्याची मऊ पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांवर लावावी. वीस मिनिटांनी सौम्य स्वरूपाचा हर्बल शाम्पू वापरून केस धुवावे. यामुळे केसांच्या मुळांचंही भरण-पोषण होतं. सोबत केस मऊ-मुलायम आणि चमकदार होतात.ज्यांना आपल्या केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर हवं असेल त्यांनी कोरफडीचा ताजा गर काढून तो केसांना कंडिशनर म्हणून लावावा. कोरफडीचा ताजा गर हे केसांसाठी उत्तम कंडिशनर आहे.(लेखिका ख्यातनाम निसर्गोपचारतज्ज्ञ आहेत)

nirmala.shetty@gmail.com