Join us  

सॅनिटायझर लावून किंवा सतत साबणाने धुवून हात कोरडे, रखरखीत झालेत?- त्यावर हा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 8:25 PM

सतत मास्क वापरुन आणि वारंवार हात सॅनिटायझरनं स्वच्छ केल्यानं हात रखरखीत होत आहेत. कोरडे पडत आहे. तसेचा चेहेऱ्यावर कोरडेपणा जाणवणं, फोड येणं या तक्रारीही वाढत आहेत.

ठळक मुद्देसतत मास्क वापरुन आणि वारंवार हात सॅनिटायझरनं स्वच्छ केल्यानं हात रखरखीत होत आहेत. कोरडे पडत आहे. तसेचा चेहेऱ्यावर कोरडेपणा जाणवणं, फोड येणं या तक्रारीही वाढत आहेत.चेहेऱ्याची त्वचा जास्तच कोरडी पडलेली असल्यास लिंबू आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन ते मिश्रण चेहेऱ्यास डोळ्यांची काळजी घेत लावावं.चेहेऱ्याची काळजी घेताना मास्कची निवड, मास्कची स्वच्छता या गोष्टीही महत्त्व्वाच्या आहेत.

 कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर या दोन गोष्टी महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. याबाबत निष्काळजीपणा करुन चालणारच नाही. पण मास्क आणि सॅनिटायझरचा वापरत आहोत म्हणून उदभवणाऱ्या त्वचेच्य इतर समस्यांकडे दुर्लक्ष करणंही परवडणार नाही. सतत मास्क वापरुन आणि वारंवार हात सॅनिटायझरनं स्वच्छ केल्यानं हात रखरखीत होत आहेत. कोरडे पडत आहे. तसेच चेहेऱ्यावर कोरडेपणा जाणवणं, फोड येणं या तक्रारीही वाढत आहेत.

हात आणि चेहेरा जपण्यासाठी

त्वचेसंबंधीच्या तक्रीरींकडे दुर्लक्ष केल्यानं त्या वाढतात. त्यांच्यावर वेळीच इलाज करणं गरजेचं आहे. यासाठी घरगुती उपाय उपयुक्त ठरतात.- सॅनिटायझरच्या वापरानं कोरडे पडलेले हात आणि मास्कच्या वापरानं खराब झालेली चेहेऱ्याची त्वचा सुधारण्यासाठी बाहेरुन आल्यावर हात आणि चेहेरा स्वच्छ धुवावा. कोरडा करावा. त्यानंतर हाताला आणि चेहेऱ्याला कोरफड जेल लावावी. चेहेऱ्याला कोरफड जेल लावताना मसाज करत लावावी. तीन चार मिनिटानंतर चेहेरा स्वच्छ धुवावा. त्यानंतर चेहेऱ्याला मॉश्चरायझर लावावं. आणि चेहेरा काळा पडत असल्यास तो काळेपणाही या उपायानं जातो. रात्री झोपतांनाही चेहेऱ्यास कोरफड जेल लावल्यास फायदा होतो.

- चेहेऱ्याची त्वचा जपण्यासाठी दह्याचा वापरही करता येतो. दह्यात थोडं बेसनपीठ घालून लेप तयार करावा. हा लेप चेहेऱ्यास लावावा. लेप चांगला कोरडा होवू द्यावा. सुकल्यानंतर थोडं पाणी घेऊन हलक्या हातानं चोळत चेहेरा स्वच्छ धुवावा. चेहेरा कोरडा करुन मॉश्चराइजर लावावं. हा लेप आठवड्यातून दोन वेळेस लावावा.

- चेहेऱ्याची त्वचा जास्तच कोरडी पडलेली असल्यास लिंबू आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन ते मिश्रण चेहेऱ्यास डोळ्यांची काळजी घेत लावावं. हे मिश्रण चेहेऱ्यास लावण्यापूर्वी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवून कोरडा करायला हवा. लिंबू आणि ग्लिसरीनचं मिश्रण चेहेऱ्याला लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी चेहेरा धुवावा.

- मास्कमुळे चेहेऱ्याचं होणारं नुकसान वरील उपायांनी भरुन निघतं. पण मास्क वापरण्याची पध्दत जर चुकीची असेल तर मात्र समस्या वाढतच जातात. त्यामुळे योग्य मास्कची निवड, मास्कची स्वच्छता या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. मास्क निवडताना ते फँसी आहे का हे न बघता ते चेहेऱ्यास खूप ढीलं किंवा खूप घट्ट तर होणार नाही ना हे आधी बघावं. घट्ट मास्कमुळे चेहेऱ्याच्या रक्तप्रवाहास अडथळे येतात. आणि त्यामुळे तेथील त्वचा काळी निळी पडते. मास्क वापरल्यानंतर स्वच्छ जागी ठेवणे, घरातील इतरांच्या मास्कसोबत न  ठेवणे,  रोज मास्क धुणे या बाबीही महत्त्वाच्या आहेत.

- सॅनिटायजर वापरातानाही घरात असताना सॅनिटायझर ऐवजी लिक्विड साबणाचा वापर करावा. हात स्वच्छ करण्यासाठी लिक्विड साबणचा वापरही योग्य मानला गेला आहे. लिक्विड साबणानं हात धुतल्यानंतर मॉश्चरायझर लावावं. यामुळे हात मऊ होतात.  

टॅग्स :आरोग्यकोरोना वायरस बातम्या