ठळक मुद्दे काकडीचा रस त्वचेसाठी टोनर ¸म्हणून वापरता येतो.बटाट्याच्या सहाय्यानं चेहेर्यावरचा काळेपणा तर जातोच सोबतच चेहेर्यावरचे काळे डागही जातात.लिंबात असलेलं सायट्रिक अँसिड, क जीवनसत्त्वं त्वचेशी संबंधित सर्व समस्यांवर उपाय करतात.
चेहेर्यावरचा काळेपणा ही खूप चिवट समस्या आहे. महागडी सौंदर्य उत्पादनं वापरुनही काळेपणा जात नसल्याचा अनुभव अनेकींना येतो. अशा परिस्थितीत प्रयत्न सोडून देण्यापेक्षा उपायांची पध्दत बदलून पाहायला हवी. घरातल्या भाज्या चेहेर्याचा काळेपणा घालवण्यासाठी प्रभावी ठरतात. काकडी, बटाटा आणि लिंबू या तीन भाज्या चेहेर्यावरचा काळेपणा घालवण्यासोबतच खराब झालेली त्वचा सुधारण्यासही मदत करतात.
- काकडी- सलाड म्हणून काकडी खाल्ली जाते. मात्र चेहर्यावरचा काळेपणा घालवण्यासाठी काकडीचा उपयोग प्रभावी ठरतो. काकडीमधे मोठ्या प्रमाणात सोडियम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम असतं. हे घटक चेहेर्याच्या पेशींवर उपचाराचं काम करतात. तसंच चेहेर्याच्या काळेपणाला कारणीभूत ठरणार्या मेलेनिनच्या निर्मितीस नियंत्रित करतो. आणि चेहेर्याचा रंग उजळ करतात. काळेपणा घालवण्यासाठी काकडीचा रस वापरतात . काकडीचा रस त्वचेसाठी टोनर म्हणून वापरता येतो. यासाठी काकडी किसून घ्यावी. किसलेली काकडी सुती कापडात बांधून त्याचा रस काढून घ्यावा. काकडीचा हा रस कापसाच्या बोळ्यानं चेहेर्याला लावावं. 20 मिनिटं ते चेहेर्यावर सुकू द्यावं. आणि शेवटी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.
- बटाटा- बटाटा हा फक्त भाजीसाठीच उपयोगाचा नाही. तर सौंदर्यवर्धक म्हणूनही त्याचा उपयोग होतो. बटाट्याच्या सहाय्यानं चेहेर्यावरचा काळेपणा तर जातोच सोबतच चेहेर्यावरचे काळे डागही जातात. यासाठी बटाटा किसून किंवा मिक्सरमधून बारीक करुन घ्यावा. ही बटाट्याची पेस्ट लेपाप्रमाणे चेहेर्यास लावावी. ती लावल्यानंतर दहा मिनिटांनी पाण्यानं चेहेरा धुवावा. हा उपाय नियमित केल्यास त्वचा उजळते आणि चमकते.
- लिंबू- त्वचेच्या अनेकविध समस्यांसाठी लिंबू म्हणजे रामबाण उपाय आहे. लिंबात असलेलं सायट्रिक अँसिड, क जीवनसत्त्वं त्वचेशी संबंधित सर्व समस्यांवर उपाय करतात. लिंबामधे पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि अँण्टि ऑक्सिडण्टस मोठ्या प्रमाणात असतात . या घटकांमुळे त्वचा घट्ट होते. त्यासोबतच त्वचेचा काळेपणा, दाह आणि खाज या समस्याही दूर होतात. यासाठी लिंबाचा रस घ्यावा आणि त्वचेवर जिथे समस्या आहे तिथे तो लावावा. रस सुकला की चेहेरा पाण्यानं धुवून स्वच्छ करावा.