Join us  

पावसाळ्यात चेहेर्‍याची काळजी घेण्यासाठी हवा दह्याचा मसाज. मऊ मुलायम त्वचेसाठी करा 2 पध्दतीने मसाज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 7:29 PM

पावसाळ्यातलं दमट कुंद वातावरण, पावसाळ्यात कधी पडणारं कडक ऊन या गोष्टी त्वचेसाठी घातक असतात. या घटकांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी योग्य उपाय शोधण्याची गरज असते. पावसाळ्यातल्या त्वचेसंबंधीच्या सर्व धोकादायक घटकांचा विचार करुन दही हा त्यावरचा उत्तम उपाय आहे.

ठळक मुद्देदह्यात कॅल्शियम , प्रथिनं आणि अनेक जीवनसत्त्वं असतात. त्याचप्रमाणे त्वचेसाठी उपयुक्त ड जीवनसत्त्वंही दह्यात असतं.दह्यात असलेलं लॅक्टिक अँसिड त्वचेवरच्या सुरकुत्यांविरुध्द काम करतं.दही आणि बेसन यांचा एकत्रित उपयोग आपली त्वचा एक्सफोलिएट करतो

ऋतू  कोणताही असो त्वचेसंबंधीच्या समस्या प्रत्येक ऋतुत असतातच. ऋतुप्रमाणे या समस्यांचं स्वरुप तेवढं बदलतं. पावसाळ्यात तर त्वचेची काळजी घेण्याची खूप गरज असते. आणि नेमकं इथेच दुर्लक्ष होतं. पावसाळ्यातलं दमट कुंद वातावरण, पावसाळ्यात कधी पडणारं कडक ऊन या गोष्टी त्वचेसाठी घातक असतात. या घटकांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी योग्य उपाय शोधण्याची गरज असते. पावसाळ्यातल्या त्वचेसंबंधीच्या सर्व धोकादायक घटकांचा विचार करुन दही हा त्यावरचा उत्तम उपाय आहे.

दह्यात कॅल्शियम , प्रथिनं आणि अनेक जीवनसत्त्वं असतात. त्याचप्रमाणे त्वचेसाठी उपयुक्त ड जीवनसत्त्वंही दह्यात असतं. दह्यात असलेलं लॅक्टिक अँसिड त्वचेवरच्या सुरकुत्यांविरुध्द काम करतं. त्याचप्रमाणे त्वचा कोमलही करतं. दह्याचा वापर चेहेर्‍यावर केल्यास चेहेर्‍यावरची चमक वाढते. शिवाय मुरुम पुटकुळ्या त्यामुळे होणारी लालसर त्वचा या त्वचेशी निगडित समस्याही सहज सुटतात.

छायाचित्र- गुगल

त्वचेसाठी दही वापरताना

1. दही आणि बेसन यांचा एकत्रित उपयोग आपली त्वचा एक्सफोलिएट करतो. शिवाय त्वचेतील सर्व अशुध्द घटक स्वच्छ करण्याचं काम दही आणि बेसनाचा लेप करतो. तेलकट त्वचा असेल तर या लेपाचा उपयोग फेस स्क्रबसारखा करता येतो. एका वाटीत दोन चमचे दही घ्यावं आणि त्यात एक चमचा बेसन घालावं. ते चांगलं घोळून घ्यावं. ही पेस्ट चेहेर्‍यावर लावावी. दहा मिनिटं हा लेप तसाच राहू द्यावा. नंतर चेहेरा थंड पाण्यानं धुवावा. या लेपामुळे चेहेर्‍याचा रंग खुलतो.

छायाचित्र- गुगल

2. दह्याचा उपयोग घरच्याघरी फेशिअल करण्यासाठी होतो. यासाठी दही आणि लिंबू वापरावं. दही आणि लिंबात क जीवनसत्त्व भरपूर असतं. तसेच यात असलेल्या लॅक्टिक अँसिडमुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि चेहेर्‍याच रंग उजळतो. त्यासाठी एका भांड्यात दही घेऊन त्यात एक छोटया लिंबाचा रस पिळावा.दही आणि लिंबाचा रस चांगला एकजीव करावा. हा लेप चेहेर्‍यावर लावावा. हा लेप लावताना कमीतकमी 20 मिनिटं हलक्या हातानं मसाज करावा. नंतर चेहेरा पाण्यानं धुवावा. या लेपामुळे चेहेरा ताजा तवाना होतो.