उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान वाढल्याने आपल्याला सतत गरम होत असतं, त्यामुळे घाम येत राहतो. त्यातही आपण उन्हात बाहेर गेलो की सूर्यकिरणांमुळे चेहरा टॅन होतो आणि त्वचा काळवंडते. अनेकदा उन्हाचा चटका बसून चेहऱ्यावर काळे डाग पडतात, कधी हे डाग कित्येक दिवस तसेच राहतात. मुख्यत: नाकाच्या बाजूचा भाग, कपाळ अशाठिकाणी चेहरा काळवंडतो. सौंदर्यप्रसाधने वापरुन आपल्याला चेहऱ्यावरचे हे डाग लपवावे लागतात. नाहीतर पार्लरमध्ये जाऊन क्लीन अप, फेशियल, डी टॅन अशा ट्रीटमेंटस कराव्या लागतात. मात्र त्यामध्ये असणाऱ्या केमिकल्सनी त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर या ट्रिटमेंटस बऱ्याच महाग असल्याने पैसेही भरपूर खर्च होतात. अशावेळी चेहरा नितळ आणि सुंदर दिसावा यासाठी घरच्या घरी काही सोपा उपाय असेल तर? पाहूयात नैसर्गिक पदार्थ वापरुन चेहरा डी टॅन करण्याची सोपी पद्धत (D-Tan Face Clean Up At Home)...
१. क्लिंझिंग ही डी टॅन प्रोसेसमधली एक महत्त्वाची पायरी असते. त्यासाठी घट्टसर दही घेऊन ते चेहऱ्यावर लावायचे आणि त्याने चेहऱ्याला चांगला मसाज करायचा. यामुळे चेहरा क्लिंझ व्हायला मदत होते.
२. स्क्रबिंग ही पण दुसरी महत्त्वाची पायरी असून त्यामुळेही चेहरा नितळ दिसण्यास मदत होते. त्यासाठी मसूर डाळीचे पीठ आणि मध एकत्र करावी आणि हे स्क्रबर चेहऱ्याला सगळीकडे लावावे. यामुळे चेहऱ्याची डेड स्कीन निघून जाण्यास मदत होते.
३. फेस पॅक ही डी टॅन प्रोसेसमधील एक महत्त्वाची पायरी असते. हा फेस पॅक तयार करण्यासाठीही आपण घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचाच वापर करणार आहोत. त्यासाठी चमचाभर कॉफी, गव्हाचे पीठ आणि दही एकत्र करावे. हे एकत्र केलेले मिश्रण चेहऱ्याला एकसारखे लावावे आणि १५ ते २० मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाकावा.
४. या तिन्ही प्रक्रिया केल्यानंतर चेहरा उजळ दिसण्यास मदत होते. तसेच चेहरा धुतल्यानंतर आठवणीने त्यावर मॉईश्चरायजर लावायला हवे. यामुळे चेहरा मुलायम राहतो.