Join us  

केसांतला कोंडा थंडीत खूप वाढलाय; डोक्यात खाजही सुटते? फक्त 5 उपाय, कोंडा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2021 12:52 PM

केसात कोंडा झाला की काय करावे सुचत नाही, मग बाहेर जायचे तरी लाज वाटते, पाहूयात सोपे उपाय

ठळक मुद्देकोंडा कमी होण्यासाठी कोणते उपाय करता येतील याविषयी...

थंडी पडायला लागली की शरीर वातावरणाशी जुळवून घेईपर्यंत अनेक लक्षणे दिसायला लागतात. थंडीमुळे जशी शरीराची त्वचा कोरडी पडते त्याचप्रमाणे डोक्यातील त्वचाही कोरडी व्हायला सुरुवात होते. यालाच आपण केसांत खूप कोंडा झाला असे म्हणतो. केस विंचरले किंवा अगदी नुसता हात लावला तरी हा कोंडा खाली पडतो आणि मग चौरचौघात आपल्याला लाजल्यासारखे होते. कोंडा होणे ही अतिशय सामान्य समस्या वाटत असली तरी थंडीच्या दिवसांत कोरडेपणामुळे ही समस्या जास्त वाढते. दिर्घकाळ आणि खूप जास्त प्रमाणात कोंडा झाला तर केस गळण्याचे प्रमाणही वाढते. अशावेळी केसातील आर्द्रता टिकवून ठेवणे गरजेचे असल्याने त्या पद्धतीने उपाय करायला हवेत. तसेच आपल्याला तुम्हाला चांगले दाट केस हवे असतील आणि कोंडा कमी करायचा असेल तर नियमितपणे तेलाने मसाज करणे आणि हेअर मास्क वापरणे यांसारखे उपाय आवश्यक ठरतात. पाहूयात कोंडा कमी करण्याचे काही सोपे उपाय....

१. लिंबाचा रस 

आपण केसांना नेहमी तेलाने मसाज करतो. याच तेलात लिंबाचे काही थेंब टाकून केसांच्या मुळांना मसाज करायला हवा. यासाठी शक्य तितके नैसर्गिक खोबरेल तेल वापरायला हवे. हा मसाज ३ ते ५ मिनिटांपर्यंत करा. केस साधारणपणे तासभर तसेच ठेवा. जेणेकरुन तेल आणि लिंबाचा रस मुळांमध्ये चांगला मुरेल आणि कोंडा कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर केस धुवा. या उपायाचा तुम्हाला त्वरीत आणि चांगला निकाल दिसून येईल. 

२.  शाम्पूमध्ये या गोष्टी घाला 

आपण नेहमी केस शाम्पूने धुतो. यामध्ये असणारे रासायनिक घटक केसांना आणि मुळांना आणखी कोरडे करतात. त्यामुळे या शाम्पूमध्ये चहापत्तीच्या किंवा पेपरमिंटच्या तेलाचे काही थेंब घाला. शाम्पू आणि तेल व्यवस्थित एकत्र करुन घ्या आणि मगच केस धुवा. यामुळे केसांना आणि मुळांना कोरडेपणा न येता त्यातील मॉइश्चर टिकून राहण्यास मदत होईल. याचा रिझल्ट लगेच दिसत नाही तर दोन ते तीन वॉशनंतर तुम्हाला केसांमध्ये फरक जाणवतो. 

३. कडुलिंबाचे तेल

कडुलिंबाचे आरोग्यासाठी अनेक उपयोग असल्याचे आपल्याला माहित आहे. नावातच कडूपणा असला तरी हे कडुलिंब आरोग्याच्या विविध तक्रारींसाठी अतिशय उपयुक्त असते. त्वचेचे आजार दूर करण्यासाठी कडुलिंबाचा वापर होतो. त्याचप्रमाणे कोंडा कमी करण्यासाठीही कडुलिंबाचा उपयोग होतो. तुम्हाला केसांच्या मूळाशी कोंड्यामुळे खाज येत असेल तर आठवड्यातून दोन वेळा या तेलाने चांगला मसाज करा, त्यानंतर साधारण एक ते दोन तास केस तसेच ठेवा. नंतर अतिशय हलका शाम्पू वापरुन केस धुवा.

४. अँटी डॅन्डरफ शाम्पू 

सध्या बाजारात अनेक अँटी डॅन्डरफ शाम्पू सहज उपलब्ध असतात. त्यावरील कंटेन्ट वाचून आपल्याला सूट होईल असा एखादा शाम्पू वापरावा. पेपरमिंट असलेला शाम्पू वापरणे चांगले, कमी कोंडा असेल तर हा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो. मात्र कोंड्याचे प्रमाण जास्त असेल तर मात्र डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. 

५. कोरफड गर

कोरफड हाही आरोग्यासाठी अतिशय उत्तम पदार्थ आहे. त्वचेच्या, पोटाच्या आणि केसांच्याही कित्येक समस्यांवर कोरफड अतिशय उपयुक्त ठरते. कोरफडीचा गर काढून त्यामध्ये काही थेंब तेल घालावे. हे मिश्रण एकजीव करुन केसाच्या मुळांना लावून ठेवावे. २० ते २५ मिनिटांनंतर एखाद्या हलक्या स्वरुपाच्या शाम्पूने केस धुवावेत. कोरफडीमुळे केसातील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते.    

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी