Join us  

केसात फार कोंडा झालाय? पोट साफ होण्यासाठी 'औषध' म्हणून घेतो त्या तेलाने करा मॉलिश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 5:15 PM

आरोग्याच्या अनेक तक्रारींवर तसेच सौंदर्यासाठीही एरंडेल तेलाचा उपयोग

ठळक मुद्देआरोग्याच्या तक्रांरींबरोबरच सौंदर्यासाठीही एरंडेल तेलाचा उपयोग आयुर्वेदात महत्त्वाचे मानले जाणारे एरंडेल तेल कोंड्याच्या समस्येवर उपयुक्त

पोटाशी निगडीत समस्या उद्भवली की आपल्यातील अनेक जण एरंडेल तेल घेण्याचा उपाय करतात. पोटाच्या समस्येसाठी हे तेल फायदेशीर असतं हे ठिक आहे. पण त्याशिवायही या तेलाचे बरेच फायदे असतात. आयुर्वेदात अतिशय महत्त्वाचं मानलं जाणारं हे तेल आरोग्याच्या समस्यांसाठी जितकं मदत करतं तितकंच ते सौंदर्याशी केसांशी निगडीत समस्या दूर करण्यासाठीही उपयुक्त ठरतं. थंडीच्या दिवसांत उद्भवणाऱ्या कोंड्याच्या समस्येवर एरंडेल तेल रामबाण उपाय ठरु शकते. अनेकदा कोंडा वाढला की आपण शाम्पू, कंडिशनर, सिरम अशा एकाहून एक केमिकल असलेल्या उत्पादनांमध्ये बदल करुन बघतो. पण त्यानीही म्हणावा तसा फरक पडला नाही तर नेमके काय करावे आपल्याला कळत नाही. अशावेळी पोटात औषध म्हणून घेत असलेले एरंडेल तेल उत्तम काम करते. केसातील कोंड्याने तुम्हीही हैराण असाल तर केसांना एरंडेल तेलाने मालिश करुन बघा. हे तेल चिकट किंवा खूप चिपचिपीत असते म्हणून आपण त्याला हात लावायचे टाळतो पण काही सोपे उपाय केल्यास या तेलाचा चिकटपणा थोडा कमी होण्यास मदत होऊ शकते. 

(Image : Google)

एरंडेल तेलाचे फायदे

१. एरंडेल तेलाने नियमित मसाज केल्यास केस वाढण्यास मदत होते. यामध्ये असणारे ई जीवनसत्त्व रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतो आणि त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या केसांना वाढ नसेल तर तुम्ही या तेलाचा नक्कीच उपयोग करु शकता. 

२. एरंडेल तेलात ओमेगा ६ आणि ओमेगा ९ फॅटी अॅलिड असतात, त्यामुळे केस मुलायम होण्यास मदत होते. 

३. एरंडेल तेल अँटीबॅक्टेरीयल म्हणून काम करत असल्याने केसांमध्ये किंवा केसांच्या मूळांशी काही बुरशीजन्य घटक असल्यास त्यांचा नाश होण्यास मदत होते. 

४. एरंडेल तेलामुळे केसांत आर्द्रता निर्माण होते, त्यामुळे केस रुक्ष होण्यापासून त्यांचे संरक्षण होते. 

केसांना लावण्याची पद्धत

१. कोरफडीचा गर आणि एरंडेल तेल एकत्र करुन ते केसांना लावल्यास त्याचा कोंडा कमी होण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो. दोन चमचे एरंडेल तेल आणि ३ चमचे कोरफड गर एकत्र करावा. त्यात थोडे टी ट्री ऑइल घालावे. हे सगळे नी एकत्र करुन केसांना लावावे. ४० मिनीटांनी एखाद्या सॉफ्ट शाम्पूने केस धुवावेत. दोन वेळा सलग हा प्रयोग केल्यानंतर तुमच्या डोक्यातील कोंड्याचे प्रमाण कमी झाल्याचे तुम्हाला दिसेल. 

२. खोबरेल तेल आणि एरंडेल तेल एकत्र करुन लावल्यास त्याचाही चांगला फायदा होतो. यासाठी २ चमचे कांद्याचा रस, २ चमचे खोबरेल तेल आणि २ चमचे एरंडेल तेल एकत्र करुन ते केसांच्या मूळांशी लावावे. ३० मिनीटांनी केस धुतल्यावर काही वेळातच तुम्हाला फरक जाणवेल. 

(Image : Google)

३. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये ऑलिव्ह ऑईल आणि एरंडेल तेल एकत्र करा. हे मिश्रण एका स्प्रे असलेल्या बाटलीत भरा आणि स्प्रेचा वापर करुन ते केसांवर मारा. यानंतर केसांना चांगला मसाज करा आणि २० मिनीटांनी केस धुवून टाका. केस धुण्यासाठी हलका शाम्पू वापरा. या उपायाने काही दिवसांतच तुम्हाला कोंडा कमी झाल्याचे जाणवेल.

४. आपण वापरत असलेल्या कंडीशनरमध्ये दोन चमचे एरंडेल तेल घालून हे कंडीशनर केसांना लावून ठेवल्यास केस मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीलाइफस्टाइल