गौरी पटवर्धन
मैत्रिणी म्हणाली कम्फर्ट झोनमधून बाहेर ये की आपल्या सगळ्या फॅशनचा उत्तर ध्रुवच हलतो. म्हणजे आपण इतकी वर्षं आपल्याला काय आवडतं, काय चांगलं दिसतं, काय घातलं की आपल्याला कॉम्प्लिमेंट्स मिळतात या सगळ्याचा विचार करून आपली स्वतःची अशी एक स्टाईल ठरवलेली असते. ज्यात आपल्याला चुकायला काही स्कोप नसतो. आणि ही ढमाली खुशाल त्यावर कम्फर्ट झोनचा शिक्का मारून मोकळी होते. आपण ज्याला आपली स्टाईल समजतोय ते इतरांना कम्फर्ट झोनमध्ये अडकल्यासारखं दिसतंय असा स्वच्छ आरसा दाखवून, ती सहावी लिपस्टिक ‘अजून कशाला लागते तुला?’ असं म्हणून बेशरमपणे स्वतःच्या पर्समध्ये टाकून घेऊन जाते.
मग मात्र आपण इरेलाच पेटतो. आपण कम्फर्टच्या नावाखाली त्याच त्याच पॅटर्नचे कपडे, शूज, मेकअपच्या शेड्स वगैरे वापरत आहोत हे खरं म्हणजे आपल्याला नीट दिसलेलं असतं. मग आपण स्वतःला चॅलेंज करतो. पण अगदी आपल्या फॅशनच्या इज्जतीचा प्रश्न असला तरीही कपड्यांमध्ये आपण फार प्रयोग करू शकत नाही. एकतर ऑफिस वेअरला त्याची त्याची एक चौकट असते. शिवाय बहुतेक घरातून बायकांनी काय? घातलेलं चालेल याचे (बव्हंशी अलिखित) नियम असतात. ते तोडायचे की नाही हा फारच वैयक्तिक प्रश्न असतो. बहुतेक वेळा आधीच मागे असलेल्या कामांच्या रगाड्यात ती एक कटकट ओढवून घेणं बायकांना नको वाटतं. कारणं वेगवेगळी असतात. पण कपड्यांमध्ये मूलभूत बदल करण्याची तयारी लवकर होत नाही हे खरं.
मग उरलं काय?
तर मेकअप, दागिने आणि ऍक्सेसरीज. त्यातही मेकअप प्रयोग करायला सगळ्यात सोपा. असं ठरवून आपण त्या बालपणीच्या दुष्ट मैत्रिणीच्या नाकावर टिच्चून एक मस्त, फ्रेश, ब्राईट लिप्स्टिकची शेड आणतो. ती दुकानात आपण ट्राय करतो तेव्हा आपल्याला निःसंशय उत्तम दिसत असते. आपण ती घरी आणतो. पुढच्या वेळी बाहेर जातांना नेहेमीच्या त्याच त्या लिपस्टिकऐवजी ही नवीन नवीन, फ्रेश, ब्राईट लिपस्टिक लावतो आणि आरशात बघतांना आपल्या मनात येतं,
“फारच ब्राईट आहे का ही शेड?”
“ऑफिसला चालेल ना?”
“कोणीतरी पटकन पोपटाची चोच म्हणालं तर?”
“आत्ता घातलेल्या ड्रेसवर ती फारच गॉडी दिसतीये का?”
अशा अनेक शंका कुशंका मनात घेऊन आपण त्या लिपस्टिककडे बघतो. आणि मग आपण दोनच कृती करू शकतो. एक तर ती लिपस्टिक पुसून टाकायची आणि आपली नेहेमीची शेड लावायची. किंवा ती लिपस्टिक लावून तसंच बाहेर जायचं. आपण जर तसंच बाहेर जायचं ठरवलं, तर आपण हे सगळे मनातले प्रश्न घेऊन बाहेर जातो. मग आपण हळूच चार वेळा मोबाईलचा फ्रंट कॅमेरा उघडून त्यात बघून घेतो. पर्समधून टिश्यू काढून ती लिपस्टिक थोडी टोन डाऊन करायचा प्रयत्न करतो.
आता आपण इतके कॉन्शस झाल्यावर ती लिपस्टिक आपल्याला चांगली दिसेल का? तर शेड म्हणून दिसेलही, पण आपलंच वागणं त्या चांगलं दिसण्याच्या आड येत राहतं, कारण आपण छान दिसतोय याचा आपल्याला आत्मविश्वास वाटत नाही. कारण आपण त्या कपड्यात, ती लिपस्टिक शेड लावून कम्फर्टेबल नसतो.