Join us  

दिवाळीत साडी नेसायचं ठरवताय? ट्रॅडिशनल पण सिझलिंग लूक हवा, या घ्या 7 सोप्या टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2021 1:22 PM

दिवाळीत साडी नेसायचीये आणि त्यात स्टायलिश पण दिसायचंय असं असेल तर थोडी तयारी करायला हवी. पाहूया दिवाळीत साडी नेसून परफेक्ट तयार होण्यासाठी काय गरजेचं आहे...

ठळक मुद्देसाडी अशीतशी नाही तर परफेक्टच नेसली तरी छान दिसते, काय केल्याने होईल परफेक्ट साडीबरोबरच त्यावरील दागिने, चपला हेही तितकेच नीट हवे..मग थोडी आधीपासूनच तयारी करा

साडी हा महाराष्ट्राचा पारंपरिक पोषाख. आता नऊवारी साडी फार कोणी नेसत नसले तरी सहावारी साडी मात्र आजही महिलाच नाही तर तरुणीही आवडीने नेसताना दिसतात. सणावाराला तर साडी स्त्रीच्या सौंदर्या भरच घालते. दिवाळीत तुम्ही साडी नेसणार असाल तर त्यात तुम्ही स्टाललिश आणि परफेक्ट दिसायला हव्या ना. नाहीतर साडी कितीही भारी असून उपयोग नाही. साडी व्यवस्थित नेसली नसेल तर तुम्ही कितीही आवरले तरी अवतारातच दिसता. त्यामुळे दिवाळीत नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासमोर तुमचा लूक उठून दिसावा असे वाटत असेल तर साडी नेसताना आणि तयार होताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ही साडी चापूनचोपून, बोंगा होणार नाही अशा पद्धतीने नेसायला हवी. नाहीतर तुम्हालाही काही सुचत नाही आणि मग सगळाच मूड जातो. साडी एकदा नेसली की ती पुढचे कितीतरी तास आहे तशीच टिकून राहायला हवी. नाहीतर थोडा वेळानी साडी लूज झाली की मग आहे तिथून ती नीट करण्यासाठी धावाधाव होते. पाहूया साडी परफेक्ट येण्यासाठीच्या काही टिप्स...

( Image : Google)

१. पेटीकोट किंवा परकर - तुम्ही साडी्च्या आत जो परकर किंवा पेटीकोट घालणार आहात तो योग्य पद्धतीने बांधला आहे की नाही तपासा. तो जास्त लूज असेल तर साडी लवकर सुटते. त्यामुळे तो घट्ट बांधून घ्या. हा परकर तुमच्या अंगाला बसेल असाच घ्या. तुमच्यापेक्षा परकरचा बोंगा जास्त असेल तर साडी चोपून बसत नाही. तसेच तो खालच्या बाजुने मोठा असेल तर आधीच टिप मारुन घेतलेली चांगली. ऐनवेळी तो परकर वर खोचावा लागतो आणि मग थो्ड्या वेळानी तो खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही साडीच्या आत घालत असलेला परकर योग्य असेल याची काळजी घ्या. 

२. साडी खोचताना - साडी खोचताना ती सगळ्या बाजुने एकसारखी खोचली जाईल याची काळजी घ्या. ती वरखाली खोचली गेली तर खालच्या बाजुनेही ती वरखाली दिसते. यामुळे निऱ्या आणि पदर घ्यायलाही अडचण येऊ शकते. तसेच अनेकदा बाजूने साडी बाहेर आल्यासारखी दिसते, त्यामुळे साडी एकसारखी खोचा. 

३. योग्य पद्धत ठरवा - काही जण परकर बेंबीच्या खाली घालतात त्यामुळे साडीही बेंबीच्या खालून नेसली जाते. त्यामुळे तुमची बेंबी दिसते. यामुळे तुम्ही स्टायलिश दिसू शकता. पण हे तुम्हाला सोयीचे नसेल तर बेंबीच्या वर परकर आणि साडी नेसा. मात्र इतक्या वर घेऊ नका की पोटाच्या बाजूला साडीचा बोंगा आल्यासारखे वाटेल. थोडे पोट दिसेल अशी नेसा त्यामुळे तुमची फिगर दिसून तुम्ही स्टायलिश दिसता. 

४. कंबरेच्या बाजूने व्यवस्थित ओढून घ्या - साडीचा लूक हा ज्याप्रमाणे पदरावर अवलंबून असतो त्याचप्रमाणे ती चोपून बसण्यावरही अवलंबून असतो. कंबरेच्या बाजूने साडी लूज सोडू नका तर ती व्यवस्थित ओढून घ्या. त्यामुळे तुम्ही नीटनेटके तर दिसालच पण बारीक दिसायलाही मदत होईल. तसेच साडीला छानसा काठ असेल तर तोही छान दिसू शकेल. 

( Image : Google)

५. ब्लाऊज - अनेकदा पारंपरिक साड्यांमध्ये साडीला मॅच होणारे ब्लाऊज असते. पण हल्ली डिझायनर आणि साडीपेक्षा वेगळे डिझायनर ब्लाऊज घालायची फॅशन आहे. हे ब्लाऊज साडीला मॅच होईल याची काळजी घ्या. तसेच तुम्ही ब्लाऊज शिऊन घेतले असेल तर त्याचे फिटींग तुम्हाला नीट बसते की नाही ते पाहा. रेडिमेड ब्लाऊज घेतले असेल तर ते नीट बसते का नाही तपासून पाहा. साडीमध्ये तुमचा लूक खुलून येण्यासाठी ब्लाऊजही परफेक्ट असणे तितकेच गरजेचे आहे. 

६. दागिन्यांची निवड - तुमच्या साडीनुसार दागिने निवडणे गरजेचे आहे. तुमच्या साडीला मोठा काठ असेल, तुम्ही केस मोकळे सोडणार असाल आणि मोठे कानातले घालायला आवडत असेल तर गळ्यात काही नाही घातले तरी चालेल. डिझायनर साड्यांवर आधीच चमकी किंवा काही डिझाईन असते त्यावरही कमी दागिने घातले तर चांगले वाटेल. साडी, हेअरस्टाईल यानुसार तुम्ही दागिन्यांची निवड करा. साडी प्लेन असेल तर जास्त दागिने चांगले दिसतात. तसेच लांब दागिनेही चांगले दिसतात. पण साडीवर जास्त प्रिंट किंवा डिझाईन असेल तर गळ्याशी येणारे दागिने चांगले वाटतात. 

७. चपलांची निवड - साडीनुसार तुम्ही चपलांचीही योग्य पद्धतीने निवड करणे गरजेचे असते. साडीला मॅच होतील अशा चप्पल किंवा सँडल घतल्या तर तुमचा लूक आणखी उठून दिसू शकतो. चपलेचा पॅटर्न त्यावरील डिझाईन ही साडीला साजेशी असायला हवी. तसेच साडीत तुम्ही कम्फर्टेबली वावरु शकाल अशा चपला किंवा सँडल तुम्ही घालायला हवे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनदिवाळी 2021मेकअप टिप्स