आता सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. दिवाळी होऊन सणवार संपले की लग्नसराईची धामधूम सुरू होते. सणवार- लग्नसराई असे काही कार्यक्रम म्हंटलं की हमखास पारंपरिक वेशुभषा करण्याला प्राधान्य दिलं जातं. यातही बहुसंख्य तरूणी निवड करतात ती साडीची. शेवटी कितीही म्हंटलं तरी साडीचं सौंदर्य वेगळंच असतं. त्यामुळे एरवी फक्त जीन्स- टॉपमध्ये वावरणारी तरूणीही सणवार आणि लग्न समारंभात आवर्जून साडी नेसते.
आता साडी नेसूनही ट्रेण्डी रहायचं असेल, तर ब्लाऊजची काहीतरी फॅशन केली जाते. यातही सगळ्यात जास्त चालणारा ट्रेण्ड म्हणजे डीप नेक ब्लाऊज. म्हणजेच मोठ्या गळ्याचा ब्लाऊज. आता असा ब्लाऊज घालायचा म्हणजे योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. या ब्लाऊजमध्ये जर कुणी तुम्हाला पाठमोरं पाहिलं, तर त्याचं लक्ष सगळ्यात आधी तुमच्या पाठीकडेच जातं. त्यामुळेच जर डीप नेक ब्लाऊज घालणार असाल, तर सगळ्यात आधी तुमची पाठ स्वच्छ करा. नाहीतर अस्वच्छ पाठीमुळे चारचौघात तुमचं हसं होण्याला वेळ लागणार नाही. म्हणूनच तर पाठीची स्वच्छता करण्याचे हे काही सोपे उपाय.
१. पाठीवर फोडं असल्यास...
तुमची त्वचा जर ऑईली असेल, तर पाठीवर फोड, व्हाईट हेड्स येण्याची समस्या तुम्हाला असू शकते. त्यामुळे अशा महिलांनी पाठीवर कधीही ऑईल बेस क्रीम लावू नये. यामुळे पाठीवर फोड येण्याची समस्या आणखी वाढू शकतो. त्यामुळे अशा महिलांनी पाठीवर कोरफड जेल किंवा मुल्तानी मातीचा लेप लावण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे पाठीवरील फोडांची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल.
२. पाठीचे स्क्रब करा
चेहऱ्यावरची डेड स्किन काढून टाकण्यासाठी जसे चेहऱ्याचे स्क्रब वेळोवेळी करणे गरजेचे असते, तशीच गरज पाठीला देखील असते. त्यामुळे पाठीचे स्क्रब आठवड्यातून एकदा अवश्य करावे. शिकेकाईने पाठीचे स्क्रब उत्तम पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे थोडीशी शिकेकाई दुधात किंवा कोमट पाण्यात कालवा आणि पाठीवर चोळा. यामुळे पाठीवरची डेड स्किन निघून जाईल आणि पाठ नितळ, चकचकीत दिसू लागेल.
३. डाळीच्या पिठाचा उत्तम उपाय
चेहऱ्यासाठी देखील आपण बऱ्याचदा डाळीच्या पिठाचा उपयोग करतो. तसाच त्याचा उपयोग आता पाठीसाठी करा. डाळीच्या पिठात थोडी हळद, मध आणि दूध टाका. मिश्रण व्यवस्थित हलवून त्याचा लेप बनवा आणि या लेपाने पाठीला मसाज करा. १० ते १५ मिनिट पाठ तशीच राहू द्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. या उपायामुळेही पाठीवरची डेड स्किन निघून जाते.
४. पाठीचे करा ब्लीच
एखाद्या कार्यक्रमासाठी आपण ब्लीच करतो. ब्लीच केल्यामुळे चेहऱ्यावर हलकासा सोनेरी ग्लो येतो. डीप नेक ब्लाऊज किंवा ड्रेस घातल्यानंतर हाच ग्लो तुमच्या पाठीवर येणे गरजेचे असते. म्हणूनच पाठीचे ब्लीच करणे गरजेचे आहे. यामुळे तुमची पाठ निश्चितच सुंदर दिसू लागेल.
५. पाठीचाही मेकअप करा
ज्याप्रमाणे आपण चेहरा आणि गळ्याला फाउंडेशन, कॉम्पॅक्ट लावतो, तशीच ट्रीटमेंट तुमच्या पाठीलाही द्या. कार्यक्रमासाठी तयार होताना तुमच्या पाठीकडे दुर्लक्ष करु नका. पाठीचा मेकअप केल्यानेही पाठीचे सौंदर्य खुलते.