साजूक तूप हे आहारात असायलाच हवं असा आयुर्वेदात सांगितलं गेलं आहे. आरोग्यासाठी साजूक तूप अतिशय महत्त्वाचं असतं. तुपात ओमेगा-3,ओमेगा-9 हे फॅटी अँसिड,अ, के आणि ई ही महत्त्वाची जीवनसत्त्वं साजूक तुपात असतात. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी बाराही महिने साजूक तूप पोटात जाणं आवश्यक असतं. पण थंडीत साजूक तुपाचं महत्त्व आणखीनच वाढतं. शरीराला स्निग्धता मिळण्यासाठी, शरीराचं पोषण होण्यासाठी साजूक तूप खाणं महत्त्वाचं असतं. शरीरासाठी आवश्यक असलेलं साजूक तूप चेहर्याचं सौंदर्य राखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतं. चेहर्यावर साजूक तूप लावल्यानं त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. रात्री झोपताना चेहेर्याला साजूक तूप लावून हलका मसाज करुन झोपल्यानं जसे फायदे होतात तसेच साजूक तुपाचा दिवसा फेसपॅकसारखा उपयोग केल्यानेही अनेक फायदे होतात. म्हणूनच चेहर्याला तूप लावण्याची पध्दत समजून घ्यायला हवी.
साजूक तुपाचे सौंदर्योपयोग
1. त्वचा आद्र राहिली तरच त्वचा सुंदर दिसते. त्वचेचा शुष्कपणा कमी करण्यासाठी त्वचा मऊ आणि ओलसर ठेवण्यासाठी तुपाचा उपयोग होतो. यासाठी एक चमचा पातळ साजूक तूप आणि एक चमचा पाणी घ्यावं. ते चांगलं एकत्र करावं. ते चेहर्याला लावलं की काही वेळ थोडा मसाज करावा. मसाज केल्याच्या पंधरा मिनिटानंतर चेहरा थंड पाण्यानं धुवावा. यामुळे चेहरा मऊ आणि ओलसर राहातो.
2. चेहर्याचा रंग उजळ्ण्यासाठी तुपाचा उपयोग होतो. कारण तूप शरीरात जाऊन शरीराच्या आतल्या व्यवस्थेला सुधारण्याचं महत्त्वाचं काम करतं. तूप त्वचेतला ओलसरपणा बाहेर पडून त्वचा शुष्क होण्यापासून रोखतं. त्वचा कोरडी असल्यास ती मऊ मुलायम आणि चमकदार करण्यासाठी तुपाचा उपयोग होतो. यासाठी थोडं कच्चं दूध, थोडं बेसन पीठ किंवा मसूर डाळीचं पीठ घ्यावं. यात चमचाभर साजूक तूप घालावं. ते चांगलं एकजीव करावं आणि चेहर्याला लावावं. हा लेप सुकू द्यावा. सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं धुवावा. या उपायानं चेहरा नैसर्गिकरित्या उजळ होतो.
3. चेहर्याला साजूक तूप लावल्यानं तूप त्वचेत खोलवर प्रवेश करतं. यामुळे त्वचेच्या पेशी निरोगी आणि तरुण राहातात. यामुळे चेहर्यावरच्या सुरकुत्या जातात, वयाच्या खुणा लोप पावतात. चेहर्यावरच्या सुरकुत्या घालवण्यासाठी रोज सकाळी आणि रात्री झोपण्याआधी चमचाभर तूप हातावर घेऊन त्यानं चेहर्याचा मसाज करावा. सकाळी मसाजनंतर अर्ध्या तासानं चेहरा धुवावा आणि रात्री तूप लावल्यानंतर चेहेरा सकाळी गार पाण्यानं धुवावा.
Image: Google
4. डोळ्याखालची काळी वर्तुळं ही समस्या बहुतेकांनाच असते. यासाठी कितीही महागडी सौंदर्य उत्पादनं वापरली तरी फारसा उपयोग होतच नाही. पण साजूक तूप लावण्याचा उपाय काही दिवस नियमित केल्यास डोळ्याखालची काळी वर्तुळं सहज निघून जातात. यासाठी रात्री झोपताना चमचाभर साजूक तूप घ्यावं. ते डोळ्याच्या वर, डोळ्याच्या जवळच्या त्वचेला आणि डोळ्याखालच्या त्वचेला मसाज करत लावावं. सकाळी उठल्यानंतर चेहरा गार पाण्यानं धुवावा. तसेच डोळ्याच्या आजूबाजूच्या त्वचेला तुपानं हलका मसाज केल्यानं डोळ्यांवरचा जडपणा, सूस्तपणा, थकवा दूर होतो. डोळ्यांची जळजळ थांबते.
5. साजूक तुपाचा उपयोग त्वचा मऊ मुलायम होण्यासाठी होतो तसेच फाटलेल्या,फुटलेल्या ओठांवरही होतो. तुपामधील पोषक घटक ओठांमधे आद्रता निर्माण करतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी थोडं साजूक तूप घेऊन बोटानं ते ओठांना लावावं. तुपाचा उपयोग नैसर्गिक लिपबामसारखाही होतो. ओठांवर साजूक तुपाचा मसाज केल्यानं ओठ मऊ आणि गुलाबी होतात.
Image: Google
6. उन्हात फिरल्यानं, तसेच मुरुम पुटकुळ्यांमुळे चेहर्याच्या त्वचेची आगआग होते. चेहर्याच्या त्वचेवर जखमा होतात. ही आग घालवण्यासाठी आणि जखमा भरुन काढण्यासाठी साजूक तुपाच्या मसाजचा उपयोग होतो.
7. साजूक तुपाचा उपयोग रात्री झोपताना नाइट क्रीमसारखा केल्यास त्वचेवरचे काळे डाग निघून जातात.
8. साजूक तूप प्रत्येकाच्याच घरात असतं. ते जर चेहर्यावर नियमित लावल्यास चेहर्यावरील जखमा, डाग निघून जातात. मुरुम पुटकुळ्यांची समस्या दूर होते. चेहर्याचं सौंदर्य टिकवायचं असेल तर चमचाभर तूप खा आणि चमचाभर तूप चेहर्यालाही लावा.
9. साजूक तूप लावल्याने कोणतेही साइड इफेक्ट होत नाही. पण त्याबाबत चिंता वाटत असल्यास आयुर्वेद तज्ज्ञ आधी थोड्या प्रमाणात साजूक तुपाचा उपयोग करण्याचा सल्ला देतात.