Join us  

केसगळतीसाठी महागडे उपचार करण्यापेक्षा घरच्याघरी प्या २ सोपे डिटॉक्स ड्रिंक्स, आहारतज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2022 6:06 PM

Detox Drinks for Hair Fall Hair Care Tips : केस मजबूत करण्यासाठी त्या सर्व पर्याय आणि उपाययोजना करून पाहतात

ठळक मुद्देएकवीस दिवस सलगपणे डिटॉक्स ड्रींक घेतल्यास त्याचा केसगळती कमी होण्यास चांगला फायदा होईल.व्हिटॅमिन ईचे सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. आहारात रोज ताजी फळे आणि भाज्या यांचा समावेश करा.

दिप्ती काबाडे

कोणत्याही स्त्रीला आपले केस लांबसडक असोत किंवा बॉब कट असो ते प्रिय असतात. केस सरळ असो की कुरळे, प्रत्येक स्त्रीचा आपल्या केसांवर खूप जीव असतो. पण काही ना काही कारणांनी केस गळायला लागतात, विरळ व्हायला लागतात, तेव्हा मात्र स्त्रियांचे मन तुटू लागते. मग केस पुन्हा मजबूत करण्यासाठी त्या सर्व पर्याय आणि उपाययोजना करून पाहतात. यामध्ये पार्लरच्या महागड़्या ट्रिटमेंटपासून ते विविध घरगुती उपायांचा समावेश असतो. आज अशाच काही उपाययोजना पाहणार आहोत. परंतु त्याआधी कोणकोणत्या कारणांनी गळतात ते पाहूया (Detox Drinks for Hair Fall Hair Care Tips)...

(Image : Google)

१. डिलिव्हरी नंतर हार्मोन्समध्ये होणारे बदल - हे अतिशय सामान्य आणि सर्रासपणे आढळणारे कारण आहे. स्त्रीची डिलिव्हरी झाली की बऱ्याचदा तिचे मेटाबॉलिझम स्लो होते आणि या काळात आहाराची योग्य काळजी घेतली गेली नाही तर जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येते. शिवाय डिलिव्हरीनंतर सर्व हॉर्मोन्स नॉर्मल पातळीवर येण्यास काही वेळ जावा लागतो. म्हणूनच अनेक स्त्रियांचे डिलिव्हरी नंतर केस गळण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते.

२. आहारात प्रोटीन आणि इ जीवनसत्त्वाची कमतरता : ही समस्या विशेषतः शाकाहारी आणि वेगन लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. केसांसाठी लागणारे केरेटीन हेही एक प्रोटीन आहे. जर आहारात प्रोटीनचा योग्य प्रमाणात समावेश नसेल तर केस गळू शकतात.

३. केसांची निगा न राखणे : हा अनेक स्त्रियांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. वेळच्यावेळी केस न धुणे, घराबाहेर पडताना धूळ मातीपासून संरक्षण न करणे, केसांना वेळच्यावेळी तेलाने मसाज न करणे. केमिकल युक्त शाम्पू, कंडीशनर, हेयर कलर अशी उत्पादने जास्त प्रमाणात वापरणे. अशा अनेक कारणांनी केसांचे आरोग्य खराब होते आणि केस रुक्ष तर होतातच पण ते खराब होऊन गळायला लागतात. 

केसगळती कमी होण्यासाठी काय कराल...

१. केसांची निगा राखणे -

केसांना आठवड्यातून किमान एकदा व्यवस्थित तेल लावून मसाज करा आणि चार पाच तासांनी केस सौम्य शाम्पूने धुवा. तेल शक्यतो केमिकल विरहित वापरा. केस धुताना फक्त त्वचेला मसाज करा. पूर्ण केसांना टोकापर्यंत शाम्पू लावून दोन तळहाताच्या मध्ये घेऊन घासू नका. पूर्ण केसांना शाम्पू न लावता फक्त डोक्याच्या त्वचेला शाम्पू लावा आणि कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवा, फार गरम पाणी वापरू नका.

(Image : Google)

२. आहारात प्रोटीनचा समावेश वाढवा -

जे मांसाहारी आहेत त्यांनी किमान एक दिवसाआड अंडी खायला हवीत. मासे, चिकन या पदार्थांचा समावेश आहारात आठवड्यातून किमान दोन वेळा ठेवा. या व्यतिरिक्त रोजच्या आहारात डाळी, कडधान्ये यांचा वापर वाढवा. शाकाहारी व्यक्तींनी दूध, पनीर, दही, ताक, लस्सी, कडधान्ये, डाळी, शेंगदाणे, सोयाबीन यांचा वापर वाढवायला हवा. व्हिटॅमिन ईचे सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. आहारात रोज ताजी फळे आणि भाज्या यांचा समावेश करा.

३. केस बांधताना लक्षात ठेवा - 

घराबाहेर पडताना केस सांभाळा. प्रवास करणार असाल तर केस मोकळे सोडू नका. उन्हात केसांना स्कार्फ गुंडाळून त्यांना उन्हापासून वाचवा. इलास्टिक रबर केस बांधण्यासाठी वापरू नका. केस घट्ट करकचून बांधू नका. पोनी टेल बांधत असलात तर काही दिवसांनी त्यापासून ब्रेक घेऊन बन हेयर स्टाईल करा, मात्र बन करताना सुद्धा केस मागे ओढून करकचून बांधू नका. अशा प्रकारे काळजी घेतल्यास केस गळणे नक्की कमी होते.

अशी करा डिटॉक्स ड्रींक्स 

१. एक ग्लास ताक सामान्य तापमानाला ठेवून त्यात चार ते पाच पुदिन्याची पाने कुस्करून टाका. ताक नीट ढवळून दहा मिनिटे झाकून ठेवा आणि हे ताक प्या. हे तुम्ही दुपारी जेवणानंतर घेऊ शकता. 

२. एक ग्लास काकडीचा रस काढून त्यात पुदिन्याची चार पाच पाने कुस्करून टाका आणि हे मिश्रण दहा मिनिटे रुम टेम्प्रेचरला ठेवून मग प्या. दोन्हीपैकी कोणतेही एक ड्रिंक किंवा शक्य झाल्यास दोन्ही ड्रिंक आलटून पालटून दर दिवशी घ्या. हा उपाय किमान एकवीस दिवस सलगपणे रोज करा, त्याचा केसगळती कमी होण्यास चांगला फायदा होईल.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत)  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी