वातावरणातील प्रदूषण, बदलतं हवामान, केसांवर वापरली जाणारी रसायनं, केसांवर स्टाइल म्हणून केले जाणारे प्रयोग यामुळे केसांचं आरोग्य टिकवणं अवघड झालं आहे. आहारातील पोषक घटक हे केसांचं देखील पोषण करतात, केसांना पोषक घटक पुरवतात. पण आहारात केसांच्या पोषणास आवश्यक घटक नसतील तर मात्र केसांचं आरोग्य धोक्यात येतं. पण केसांच्या आरोग्यासाठी काय आवश्यक असतं हेच जर माहीत नसेल तर..
केसांवर आपल्या आहारातील घटक सर्वात जास्त परिणाम करतात म्हणूनच केस सुंदर राखायचे असतील, त्यांची वाढ चांगली व्हावी, ते दाट आणि काळेभोर असावेत यासाठी आहारात कोणते खाद्य पदार्थ आवश्यक आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.
केसांच्या आरोग्यासाठी काय खावं?
Image: Google
1. घेवडा
प्रथिनांचं उत्तम स्त्रोत म्हणून घेवड्याकडे बघितलं जातं. घेवड्याचा समावेश आहारात करुन केस दाट आणि मुलायम करता येतात. तसेच घेवड्यात ब, ई ही जीवनसत्त्वं, झिंक आणि मॅग्नेशियम ही खनिजं असतात. हे सर्व घटक केसांच्या पोषणासाठी आवश्यक असतात.
2.कोथिंबीर
कोथिंबीरच्या पानांमधे प्रथिनं, लोह, अ आणि क जीवनसत्त्वं असतं. केसांसाठीच्या पौष्टिक आहारात म्हणूनच कोथिंबीरचा समावेश होतो. क जीवनसत्त्वामुळे केसांमधे कोंडा आणि मुक्त पेशींमुळे होणारं नुकसान टाळलं जातं. त्यासोबतच क जीवनसत्त्व आहारातील लोह शोषून घेतं आणि केस गळण्याची समस्या दूर होते.
3. शतावरी
शतावरी संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीनंच महत्त्वाची असते. शतावरीत फोलेट, के, क, अ, ई , ब ही जीवनसत्त्वं आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. फोलेट, ई जीवनसत्त्व आणि लोह हे घटक केसांचं पोषण करतात. ई जीवनसत्त्वामुळे केस मजबूत होतात. तसेच फोलेटमुळे केसांन चमक येते. शतावरीतील लोह केस गळण्याची समस्या थांबवतं.
Image: Google
4. जवस
जवसामधे लोह तर असतंच शिवाय यात ओमेगा-3 ही भरपूर प्रमाणात असतं. जवसामधील लोह केस वाढवण्यास मदत करतात. ओमेगा या फॅटी अँसिडमुळे टाळूशी निगडित समस्या दूर होतात. ओमेगामुळे सोरायसिस सारखे आजार बरे होण्यासही मदत होते.
ओमेगा फॅटी अँसिडमुळे रक्तातील प्रवाहात फॉस्फोलिपिडस हा घटक वाढवतो. यामुळे केसांवरचं आवरणाच्या गुणवत्तेत सुधारणा होते. हे आवरण केस सुरक्षित ठेवण्यास महत्त्वाचं असतं. जवसामधे ई जीवनसत्त्वं असतं. यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं. त्यामुळेच केस सुंदर आणि मजबूत हवे असतील तर आहारात जवस असायलाच हवेत.
5. ओट्स
ओट्स मधील पोषक घटक केसांसाठी फायदेशीर असतात. ओट्समधे प्रथिनं, फॅटी अँसिड, ई जीवनसत्त्वं, फोलेट, जस्त, लोह, सेलेनियम सारखं अमीनो अँसिड असतं. हे सर्व घटक एकत्रितरित्या केसांचं पोषण करुन केस दाट, लांब आणि मुलायम होण्यास मदत करतात. हे घटक खाद्यपदार्थातून मिळणं आवश्यक असतं. म्हणूनच आहारात ओट्स हवेत.
6. सुकामेवा
शेंगदाणे, बदाम , काजू यात टोकोट्रिनॉल हा घटक असतो. शरीरात हा घटक अँण्टिऑक्सिडण्टसारखा काम करतो. या घटकामुळे केस गळती रोखता येते. त्याचप्रमाणे यात प्रथिनं भरपूर असतात. केसांचं आरोग्य जपण्यासाठी ही प्रथिनं आवश्यक असतात. आपल्या आहारात जर शेंगदाणे, बदाम, काजू पुरेशा प्रमाणात असतील तर केस खराब झालेत म्हणून कापण्याची वेळ येणार नाही. म्हणून आहारात सुकामेवा म्हणून बदाम, काजू, शेंगदाणे, बेदाणे, सुक्या मनुका आणि अंजीर यांचा समावेश असावा.
Image: Google
7. हिरव्या भाज्या
आहारात हिरव्या भाज्या असायलाच हव्यात. कारण हिरव्या भाज्यांमधे फोलेट भरपूर प्रमाणात असतं. फोलेट जर पुरेशा प्रमाणात शरीरात गेलं तर त्याचा उपयोग केसांचं आरोग्य सुधारण्यास आणि केस चमकदार होण्यास होतो. फोलेटमुळे अकाली केस पांढरे होण्याचंही टळतं. हिरव्या भाज्यांमधे अ, क जीवनसत्त्वं आणि लोहही भरपूर असतं. केसांच्या आरोग्यासाठी सेबेसियस ग्रंथीचं काम योग्य पध्दतीनं होणं आवश्यक असतं. या ग्रंथीमुळे केस मुलायम राहातात. ते रुक्ष आणि कोरडे होत नाहीत. या ग्रंथीचं काम प्रभावी होण्यासाठी आहारातून अ जीवनसत्त्वं मिळणं गरजेचं असतं. फक्त अ जीवनसत्त्व हे आहारात पुरेसं असावं ते अति प्रमाणात असू नये. कारण अ जीवनसत्त्वाचं अति प्रमाण केस गळण्यास कारणीभूत ठरतं. आहारातील अ जीवनसत्त्वाचं योग्य प्रमाण केस वाढवण्यास मदत करतात.
त्यामुळे केसांच्या सौंदर्यासाठी केसांना काय लावावं? हा प्रश्न पडण्याआधी आहारात काय असावं याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आहारात हे सात घटक जर पुरेशा प्रमाणात असतील तर मग केसांच्या आरोग्यासाठी, सौंदर्यासाठी महागड्या हेअर प्रोडक्टसवर पैसे खर्च करण्याची वेळ येणार नाही.