दिवाळी जवळ आली की धांदल त्यांची उडते ज्याची तुळशी विवाहानंतरची लग्नाची तारीख असते. लग्न ही आयुष्यातील मोठी घटना.आता तर लग्न या समारंभाला इतकं वलय आलं आहे की तीन चार दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांनी हा सोहळा रंगतो. या प्रत्येक दिवशी स्पेशल दिसण्यासाठी लग्न ठरलेल्या मुलींची नुसती धावपळ चाललेली असते. रोजचा पेहराव, त्यावरची ज्वेलरी, मेकअप , हेअर स्टाइल या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी ठरवल्या जातात. पण लग्नात स्पेशल दिसायचं असेल तर केवळ कपडे, दागिने, मेकअप एवढ्या गोष्टींनी भागत नाही. लग्नाआधी मुली त्वचेची काय काळजी घेतात, काय खातात पितात याला खूप महत्त्व असतं. सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात की, लग्नाच्या दोन महिने आधीपासूनच मुलींनी नैसर्गिकपणे त्वचा चमकदार होण्यासाठी केवळ क्रीम, लोशन,जेल या कॉस्मेटिक्सचीच नाहीतर आपल्या डाएटची योग्य ती काळजी घ्यायला हवी.
Image: Google
योग्य आहारामुळे त्वचा सुधारते, नैसर्गिक सौंदर्य वाढतं. तसेच लग्नाच्या तयारीसाठी जी धावपळ होते त्यामुळे आणि अति दगदग आणि लग्नाचं दडपण यामुळे पुरेशी झोप होत नाही त्याचा परिणाम चेहेर्यावर दिसतो. चेहेरा थकलेला आणि निस्तेज दिसतो, कोणाच्या चेहेर्याची त्वचाही खराब होते. या सर्वांवर उपाय म्हणजे लग्नाच्या दोन महिने आधीपासून योग्य आहार नियम पाळायला सुरुवात करणे हाच आहे. यासाठी त्वचेचा पोत आणि चमक सुधारणारे आहार नियम माहित असणं आवश्यक आहे. हे नियम पाळले तर लग्नाआधी त्वचा खरोखर चमकायला लागते.
चमकदार त्वचेसाठीचे आहार नियम
1. हळदीचे सौंदर्योपयोग सगळ्यांनाच माहित आहे. ही हळद चेहेर्याला लावून जितका फायदा होतो त्यापेक्षा अधिक फायदा हळद नियमित सेवन केल्यानं होतो. हळदीत भरपूर प्रमाणात जिवाणुविरोधी गुणधर्म असतात. हळदीतला हा गुण त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतो. यामुळे त्वचेवर मुरुम पुटकुळ्यात येण्यास प्रतिबंध होतो. रोज सकाळी उठल्यावर छोटा पाव चमचा हळद खाणं, पाण्यात किंवा दुधात मिसळून हळद पिणं हे हळद सेवनाचे मार्ग आहेत. लग्नाआधी किमान दोन महिने हा उपाय केल्यास लग्नाच्या दिवशी चेहेर्यावर दिसणारी चमक ही मेकअपची नाहीतर आपल्या आहार नियमांची असेल हे नक्की.
2. बदाम नियमित खायला सुरुवात करावी. कारण बदामात ई जीवनसत्त्वं असतं. हे जीवनसत्त्वं त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतं. पण चमकदार त्वचेसाठी बदाम खाण्याची विशिष्ट पध्दत आहे. यासाठी रोज रात्री झोपण्याआधी पाच ते सहा बदाम पाण्यात भिजत घालावेत. सकाळी उठल्यावर फ्रेश झालं की रिकाम्या पोटी हे पाण्यात भिजवलेले बदाम खावेत. या नियमामुळे काही दिवसातच चेहेर्यावर चमक येते.
Image : Google
3. डार्क चॉकलेटचा त्वचेवर खूप चांगला परिणाम होतो. चॉकलेट हे त्वचेखालील कोलॅजन निर्मितीला येणारा अडथळा थांबवते. त्वचा मऊ मुलायम करण्यासाठी डार्क चॉकलेट मदत करतं. डार्क चॉकलेटमधे असलेले झिंक, लोह आणि इतर खनिजं यामुळे त्वचेतील रक्तप्रवाह सुधारतो आणि त्याचा परिणाम चेहेर्यावरील चमक वाढण्यात होतो.
4. लग्नाची तारीख जशी जवळ येते तसे आपल्या आहारातील फास्ट फूड वजा करत जावे. फास्टफूडमधील तेल, अतिरिक्त मीठ, मसाले आणि प्रिझर्व्हेटिव्ह याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्वचेवर यामुळे मुरुम पुटकुळ्या येतात. त्यामुळे आपण जो आहार घेऊ तो पौष्टिकच असायला हवा याकडे लक्ष द्यायला हवं.
Image: Google
5. लग्न जवळ येतं तसे केळवणं, मित्र-मैत्रिणींसोबतच्या पाट्र्या वाढतात. यात तेलकट मसालेदार, पचनास जड पदार्थ जास्त खाल्ले जातात. हे पदार्थ पचनक्रिया बिघडवतात आणि त्याचा परिणाम त्वचेवर दिसतो. त्यामुळे केळवणं आणि पाट्र्या टाळता येणार नसल्या तरी यात खाल्ले जाणारे पदार्थ हे फायबर, प्रथिनं, जीवनसत्त्व, खनिजंयुक्त असावेत याकडे लक्ष द्यावं. यासाठी आहारात भरपूर प्रमाणात भाज्या, सलाड आणि हंगामी फळं यांचा समावेश असायला हवा.
6. बदलत्या जीवनशैलीत वीकेण्ड पार्ट्यांना हल्ली फार महत्त्व आलं आहे. या पार्ट्यात अल्कोहोलचं सेवन करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. अल्कोहोलच्या सेवनामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते.
7. दिवसभरात पुरेस पाणी प्यायला हवं. पाणी पुरेसं प्यायलं की शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. तसेच पौष्टिक स्मुदी पिण्याची सवय लावावी. यामुळेही त्वचा विषमुक्त होते.आहाराचे हे नियम पाळले तर लग्नाच्या सोहळ्यापर्यंत त्वचा छान चमकायला लागते. त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर होते.