कोंडा ही अनेकांना भेडसावणारी एक अतिशय सामान्य समस्या आहे. कधी प्रदूषणामुळे तर कधी हार्मोन्सच्या असंतुलनामुळे हा कोंडा वाढत जातो. केसांची मुळे स्वच्छ नसल्याने किंवा कसली अॅलर्जी नाहीतर फंगल इन्फेक्शनमुळे हा कोंडा वाढत जातो. काहीवेळा आपल्या आजुबाजूचे वातावरण, आरोग्याच्या समस्या किंवा आपण वापरत असलेली वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने यांमुळे हा कोंडा वाढतो. एकदा कोंडा झाला की तो कमी करण्यासाठी काय करावे असा प्रश्न आपल्याला पडतो. हा कोंडा वाढला की तो केस विंचरताना तर पडतोच पण एरवीही आपल्या डोक्यात तो सहज दिसून येतो आणि आपल्याला आणि इतरांनाही आपण अस्वच्छ असल्यासारखे वाटते. थंडीच्या दिवसांत तर त्वचा कोरडी पडल्याने कोंड्याचे प्रमाण जास्त वाढते. अशावेळी कोंडा कमी करण्यासाठी आहारात काही सोपे बदल केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यासाठीच काही सोप्या टिप्स देतात. पाहूयात आहारात कोणते बदल केल्यास केसांतला कोंडा कमी होतो (Diet Tips For Dandruff Problem by Anjali Mukerji)...
१. जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी ज्याप्रमाणे चांगले नसते त्याचप्रमाणे केसांच्या आरोग्यासाठी किंवा कोंड्यासाठीही ते चांगले नसते. त्यामुळे नियमित आहार हा योग्य प्रमाणातच घ्यायला हवा.
२. लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ आहारात असायला हवेत. त्यामुळे केसांतला कोंडा नकळत कमी होण्यास मदत होते. लो ग्लायसेमिक इंडेक्स डाएट म्हणजे काय तर गोड पदार्थ, पास्ता, बर्गर, भात यांसारखे पदार्थ आहारात शक्यतो टाळायला हवेत.
३. तसेच ठराविक दिवसांनी शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करणे अतिशय गरजेचे असते. ते केल्याने शरीरातील अनावश्यक घटक शरीराच्या बाहेर पडतात आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. यामुळे कोंडा कमी होण्यासही मदत होते.
४. याशिवाय ब्राम्हीचे तेल केसांना लावल्यास त्यामुळेही केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते. खोबरेल तेलात ब्राम्ही वनस्पतीची काही पाने घालून ती उकळल्यास किंवा ब्राम्हीची पावडर खोबरेल तेलात घालून लावल्यास त्याचा कोंडा कमी होण्यास नक्कीच फायदा होतो.