Join us  

केस सतत गळतात, पातळ झाले? आहारात घ्या ५ पदार्थ - केस होतील दाट-लांबसडक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 4:00 PM

Diet Tips for good Hairs Hair care Tips : आहाराकडे नीट लक्ष दिल्यास आपले केसही दाट आणि लांबसडक होऊ शकतात.

सणावाराच्या दिवसांत आपणही इतर मुलींप्रमाणे हटके हेअरस्टाईल कराव्यात आणि सगळ्यांमध्ये उठून दिसावे असे अनेकींना वाटते. पण काही ना काही कारणाने केस गळतात आणि विरळ होतात. कधी केमिकल्सचा वापर किंवा प्रदूषणामुळे खूप रुक्ष होतात. केसांसाठी बाह्य काळजी घेणे ज्याप्रमाणे महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे अन्नातून शरीराचे आणि केसांचे पोषण होणेही तितकेच महत्त्वाचे असते.  आपण अनेकदा पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंटस घेतो किंवा हजारो रुपयांची उत्पादने लावून केस चांगले दिसावेत यासाठी प्रयत्न करत राहतो. पण याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. तर त्यासाठी आपण घेत असलेल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक असते. आहाराकडे नीट लक्ष दिल्यास आपले केसही दाट आणि लांबसडक होऊ शकतात. पाहूयात केस चांगले राहण्यासाठी आहारात कोणते पदार्थ आवर्जून असायला हवेत याविषयी डॉ. रमिता कौर काय उपाय सांगतात (Diet Tips for good Hairs Hair care Tips)...

१. आहारात व्हिटॅमिन सी असणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा. यामध्ये आवळा, लिंबूवर्गिय फळे, पेरु, ढोबळी मिरची यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. 

२. गाजर, पालक, रताळी यांसारख्या व्हिटॅमिन इ असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश वाढवणे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

(Image : Google )

३. बदाम, सूर्यफूलाच्या बिया, अव्हाकॅडो यांसारखे व्हिटॅमिन इ जास्त प्रमाणात असणाऱ्या गोष्टी खाल्ल्याने केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. 

४. ज्या पदार्थांमध्ये बायोटीन आहे असे डाळी, अंडी, विविध प्रकारच्या बिया-दाणे खाणे केसांचे गळणे कमी होण्यासाठी आणि केस दाट होण्यासाठी फायदेशीर ठरते. 

५. न चुकता रोज किमान १५ मिनिटे सूर्यप्रकाश घ्यायला हवा. सूर्यप्रकाशातून आपल्या शरीराला आणि केसांना व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात मिळत असल्याने केस चांगले राहण्यासाठी याचा उपयोग होतो. 

केसांना काय लावावे?

एरंडेल तेल आणि तिळाचे तेल सारख्या प्रमाणात एकत्र करावे आणि हे तेल थोडे गरम करुन त्याने केसांच्या मुळांना मसाज करावा. साधारण २ ते ३ तास हे तेल केसांना तसेच ठेवून केस धुवून टाकावेत. याशिवाय नियमितपणे २ मिनीटे शशांकासन केल्यास केसगळती कमी होऊन केस वाढण्यास चांगली मदत होते. तसेच केसांच्या मुळांचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यासही याचा चांगला फायदा होतो.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीआहार योजना