Join us  

दिवाळीपर्यंत केस दाट-मुलायम हवेत तर आहारात करा ५ सोपे बदल, हेअर लूक दिसेल स्मार्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2022 12:12 PM

Diet Tips for Healthy Hair : प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी केस चांगले राहावेत यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा याविषयी सांगतात...

ठळक मुद्देजंक फूड किंवा तेलकट पदार्थांमुळे आरोग्यासोबतच सौंदर्यामध्येही बाधा येत असल्याने असे पदार्थ टाळायला हवेत. सणावाराला केस चांगले हवे असतील तर आहारात काही किमान बदल करायलाच हवेत.

दसरा झाला आणि आता आपल्या डोक्यात दिवाळीच्या खरेदीचे विचार एव्हाना सुरू झाले असतील. दिवाळीत कसे कपडे घ्यायचे, काय दागिने घ्यायचे, आपला लूक कसा असेल यांबाबत आपण विचार करायला लागलो असू. आपण मेकअप, दागिने, कपडे या सगळ्याबाबत कायम जागरुक असतो. पण या सगळ्यात आपले केस कसे असावेत याबाबात मात्र आपण फारसा विचार केलेला नसतो. फारतर हेअरकट आणि अगदीच वाटले तर हेअर स्पा या गोष्टी आपण करतो. पण आपले केस आहेत त्यापेक्षा दाट आणि मुलायम दिसावेत यासाठी आपण विशेष कष्ट घेत नाही. केसांसाठी बाह्य उपचार जितके आवश्यक असतात तितकेच आहारातून पोषण मिळणेही महत्त्वाचे असते. आहारातून केसांचे योग्य पद्धतीने पोषण झाले तर केस चांगले राहतात. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी केस चांगले राहावेत यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा याविषयी सांगतात (Diet Tips for Healthy Hair Care Tips)...

(Image : Google)

१. लोह असलेले आणि प्रोटीन असलेल्या पदार्थांचा आराहात समावेश वाढवायला हवा. यामध्ये तुम्ही अंडी, हिरव्या पालेभाज्या, सोयाबिन, फिश, कच्च्या भाज्या, फळं, सुकामेवा, डाळी, दही यांसारख्या गोष्टींचा आवर्जून समावेश करु शकता. 

२. धान्यांमध्येही नाचणी, ज्वारी, गहू य़ा धान्यांचा आवर्जून समावेश करायला हवा. अनेकदा आपण फक्त गव्हाचा किंवा तांदळाचाच वापर आहारात जास्त प्रमाणात करतो. मात्र त्यामुळे शरीराला आणि केसांना पुरेसे पोषण मिळत नाही. त्यामुळे इतर धान्यांचाही आहारात वापर वाढवायला हवा.

 ३. विविध प्रकारच्या ज्यूसचा आहारात समावेश केल्यास त्याचाही चांगला फायदा होतो. यामध्ये तुम्ही पालक सूप, टोमॅटो सूप, गव्हांकुराचे सूप यांचा आवर्जून समावेश करु शकता. त्यामुळे केसांचा पोत सुधारण्यास निश्चितच मदत होते. 

४. याबरोबरच आहारात ब्राम्ही, भृंगराज यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश केल्यास त्याचाही चांगला फायदा होतो. यामुळे केसगळती कमी होऊन केसांच्या मुळांचे पोषण होते. 

(Image : Google)

५. तेलात तळलेले पदार्थ आणि साखरयुक्त पदार्थ शक्यतो टाळायला हवेत. असे केल्यास केस चांगले होण्यास मदत होते. जंक फूड किंवा तेलकट पदार्थांमुळे आरोग्यासोबतच सौंदर्यामध्येही बाधा येत असल्याने असे पदार्थ टाळायला हवेत.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी