दिवाळी म्हटली की पहाटे लवकर उठणं, घरातील आई-आजीने सगळ्यांना बदाम तेलाने केलेला मसाज आणि मग उटणं लावून केलेली आंघोळ. हे वर्षानुवर्षे आजही आपल्या घरी होतेच होते. अभ्यंग स्नानाला पारंपरिक उटणे लावण्याची रीत आहे त्याला काही शास्त्रीय अर्थ आहे. पावसाळा संपून थंडीचे दिवस चालू होताना हवेत कोरडेपणा, गारठा वाढतो. याचा त्वचेवर परीणाम होतो आणि त्वचा कोरडी पडायला लागते. असे होऊ नये आणि त्वचेतील मुलायमपणा टिकून राहावा यासाठी उटणं लावून अभ्यंगस्नान केले जाते. उटणं म्हटलं की आयुर्वेदीक वनस्पतींपासून केलेली पावडर इतकंच आपल्याला माहित असतं (How to make ubtan at home).
मग बाजारात वेगवेगळ्या पद्धतीने केलेली उटणी आपण विकत आणतो आणि त्यानेच काही दिवस आंघोळ करतो. पण या उटण्यामध्ये काही भेसळ नाही ना, त्यातील सर्व घटक आपल्या त्वचेसाठी चांगले आहेत ना हे आपण फारसे पाहत नाही. या उटण्याची किंमतही खूप जास्त असते. मग या सगळ्याचा विचार करता आपण घरच्या घरीच सोप्या पद्धतीने उटणं केलं तर? हे उटणं करायला अगदी सोपं असून त्वचेच्या आरोग्यासाठीही ते नक्कीच चांगले असते. पाहूया हे उटणं नेमकं कसं करायचं.
१. साधारण १ वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा.
२. यामध्ये अंदाजे गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या घालायच्या.
३. हे सगळे मिक्सरमध्ये बारीक करुन पूड करुन घ्यायची आणि एका बाऊलमध्ये काढायची.
४. यामध्ये पाव वाटी मुलतानी माती आणि पाव वाटी डाळीचं पीठ घालायचं.
५. यात १ चमचा कॉफी पावडर आणि १ चमचा हळद घालायचे.
६. हे सगळे चांगले एकजीव करायचे आणि हवाबंद बरणीमध्ये सगळे भरुन ठेवायचे.
७. दिवाळीच्या दिवशी लागेल तेव्हा एखाद्या बाऊलमध्ये हे चमचाभर उटणं काढायचं आणि त्यात गुलाब पाणी, दूध किंवा दही घालायचे.
८. संपूर्ण अंगाला हे उटणे लावायचे आणि आंघोळ करायची. त्वचेचा काळेपणा निघून जाण्यास तसेच त्वचेचा छान ग्लो येण्यास याचा चांगला उपयोग होतो.