Join us  

धकधक गर्ल माधुरी देते दिवाळीसाठी मेकअपच्या खास ४ टिप्स; वाढत्या वयातही सुंदर दिसायचं तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2023 12:02 PM

Diwali Makeup Tips by Actress Madhuri Dixit Nene : माधुरीने सांगितलेल्या या टिप्स मेकअप करताना नक्की लक्षात ठेवा.

धकधक गर्ल माधुरी दिक्षित-नेने हे मराठी नाव बॉलिवूडमध्ये आणि सिने इंडस्ट्रीमध्ये कायमच चर्चेत असते. नव्वदीच्या काळात सौंदर्य, अभिनय आणि स्माईलने रसिकांना घायाळ करणारी माधुरीची लोकप्रियता आजही अजिबात कमी झालेली नाही. डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर माधुरी परदेशात आपल्या संसारात व्यस्त झाली. मात्र २ मुलांची आई झाल्यानंतरही वयाच्या पन्नाशीत माधुरीचे सौंदर्य आजही तरुणींना लाजवेल असेच आहे. मराठमोळी अभिनेत्री म्हणून महाराष्ट्राकडून तिला कायमच प्रेम मिळत राहीले (Diwali Makeup Tips by Actress Madhuri Dixit Nene). 

बॉलिवूडमधून विश्रांती घेतल्यानंतर माधुरी रिअॅलिटी शोमधून तर आपल्या समोर आलीच पण तिच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही ती आपल्याला भेटत राहीली. ब्यूटी आणि फूड हे २ तिच्या आवडीचे विषय घेऊन माधुरी आपल्या युट्यूब चॅनेलवर नेहमी काही ना काही पोस्ट करत असते. नुकताच तिने दिवाळीसाठीच्या मेकअपचा खास व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी अपलोड केला असून यामध्ये तिने मेकअपशी निगडीत अतिशय महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. यंदाच्या दिवाळीत तुम्हालाही सगळ्यांमध्ये भाव खाऊन जायचा असेल तर माधुरीने सांगितलेल्या या टिप्स मेकअप करताना नक्की लक्षात ठेवा. 

(Image : Google )

१. सगळ्यात आधी ओठांना लिप बाम लावून ठेवावे. म्हणजे डोळ्यांचा, चेहऱ्याचा बाकी मेकअप होईपर्यंत ओठ सेट होण्यास मदत होते. तसेच थंडीच्या दिवसांत ओठ खूप कोरडे पडलेले असतात त्यामुळे त्यावरची त्वचाही निघालेली असते ती सगळी सेट व्हायला लिप बामची चांगली मदत होते. 

२. डोळ्यांच्या वरच्या भागाला सगळ्यात आधी थोडासा प्रायमर लावून घ्यायचा म्हणजे डोळ्यांचा मेकअप दिर्घकाळ टिकण्यास मदत होते. संध्याकाळची पार्टी असेल तर आपल्या कपड्यांप्रमाणे आय शॅडोचे शेडींग करुन घ्यायचे. मुख्य रंग घेऊन त्यानंतर त्याला मॅच होणाऱ्या थोड्या हलक्या शेडने हा रंग ब्लेंड करायचा. तुम्हाला आवडत असेल तर यावर थोडासा शाईन देणारा एखादा आयशॅडो लावला तर डोळे आणखी छान दिसण्यास मदत होते. मग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यावर आयलायनल लावू शकता.

३. गालाच्या हाडावर कॉन्ट्रो लावावे त्यानंतर त्यावर आपल्या आवडीच्या आणि कपड्यांना मॅच होईल असे ब्लश लावावे. चिक बोनवर हे दोन्ही चांगले ब्लेंड केले तर आपला लूक खुलून येण्यास मदत होते. 

४. ओठांना लावलेले लिप बाम रुमाल किंवा टिश्यूने काढून घ्यावे आणि मग लिप लायनरच्या साह्याने ओठांना छान शेप द्यायला हवा. त्यानंतर आवडीची लिपस्टीक ओठांना सगळीकडे एकसारखी लावून घ्यावी. ती आतल्या बाजुने किंवा ओठांच्या कडांना नीट ब्लेंड झाली नसेल तर एखाद्या सॉफ्ट ब्रशने ती छान ब्लेंड करायला हवी. 

टॅग्स :दिवाळी 2023ब्यूटी टिप्समेकअप टिप्समाधुरी दिक्षित