- साधना तिप्पनाकजे
दिवाळी फराळ कितीही आवडत असला तरी एवढं सर्व गोड, तिखट, तेलकट खायचं टेन्शन येतंच ना. बरं घरात किंवा बाहेरही यातलं थोडं थोडं खाल्लं तरी शेवटी पोतडी भरतेच. बऱ्याच जणांना ऐन सणातच या खाण्यानं त्रास सुरू होतो. तामिळनाडूमध्येही दिवाळीत तऱ्हेतऱ्हेचे लाडू, चकल्या, कडबोळी, शेव, शंकरपाळी यांची रेलचेल असते. मात्र तिथं नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान झाल्यावर फराळ खाण्याआधी चमचाभर ‘दीपावली मरुंदू लेगियम’ खाणं सक्तीचं असतं. दीपावली लेगियम खाल्यामुळं फराळाचे पदार्थ पचवण्याची ताकद शरीराला मिळते. पूर्वी हे दीपावली लेगियम घरोघरी तयार करायचे. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे दीपावली लेगियम बाहेरुन विकतच आणलं जातं.
(Image :google)
कसं करतात लेगियम?
लेगियमकरता ओवा २५ ग्राम, पिंपळी २० ग्राम, पिंपळीचं सुकलेलं मूळ २० ग्राम, ज्येष्ठ मध १० ग्राम, सूंठ १० ग्राम, थाय जिंजर १० ग्राम, नागकेसर १० ग्राम, चोपचिनी किंवा चायनारूट १० ग्राम, वावडिंग २० ग्राम, कंकोळ १० ग्राम, काळी मिरी ४ टेबलस्पून, खारीक १०० ग्राम, काळ्या मनुका ५० ग्राम हे जिन्नस हवेत. यातल्या पिंपळी, खारीक वगैरेमधल्या बिया काढून त्यांचे लहान तुकडे करा. खारीक आणि काळ्या मनुका कोमट पाण्यात वेगवेगळं रात्रभर भिजवायच्या. उरलेलं इतर सामान मंद आचेवर कोरडं भाजायचं. हे सर्व जिन्नस खारीक-मनुका भिजवलेलं पाणी घालून बारीक वाटायचं. हे वाटण एका कढईत मंद आचेवर ७-८ मिनिटं परतायचं. आता यात पाऊण किलो गूळ घालून परतायचं. गूळ विरघळल्यावर थोडं थोडं तूप घालायचं. म्हणजे समजा ४ चमचे तूप घालून चांगलं मिक्स केलं की परत ४ चमचे तूप घालायचं. असं साधारण ३०० ग्राम तूप लागतं. सर्व तूप चांगलं मिक्स झालं की मिश्रणाला तकाकी येऊ लागते. यातलं थेंबभर मिश्रण हातावर घेऊन त्याची गोळी वळली की दीपावली लेगियम तयार झालं.
(Image : google)
पाच कोसावर भाषा बदलते तशी खाद्यसंस्कृतीही..
त्यानुसार तंजावूरमधलं दीपावली लेगियम जरा वेगळं असतं आणि मला सोपंही वाटलं. पाऊण कप ओवा, ३ चमचे धणे, ३ चमचे काळीमिरी, ३-४ हिरवी वेलची, २ चमचे जीरं, १ चमचा सूंठ पावडर, पिंपळीच्या मूळाच्या १२-१५ लहान काड्या हे सर्व जिन्नस तासभर कोमट पाण्यात भिजवायचं. त्यानंतर पाण्यासकट हे जिन्नस बारीक वाटायचे. मंद आचेवर हे वाटण ७-८ मिनिटं परतायचं. वाटणाएवढाच गूळ यात घालून तो विरघळेपर्यंत परतायचं. यातही साधारण पाऊण कप तूप वरच्यापद्धतीनं थोडं थोडं घालून जिरवायचं.
हे लेगियम दिवाळीच्या ५-६ दिवस आधी तयार केलं की ते छान मुरतं.
त्यामुळं दिवाळीच्या सर्व फराळावर हात आडवा मारायला तुम्हांलाही आवडत असेल, तर चमचाभर ‘दीपावली मरुंदू लेगियम’ खायलाच हवं. लेगियम घरी करणार नसाल तर जवळच्या तामिळ दुकानात किंवा ऑनलाईन पर्याय आहेच.
(लेखिका खाद्यपरंपरा अभ्यासक-मुक्त पत्रकार आहेत.)