Join us  

फक्त 15 मिनिटं, 3 स्टेप्स आणि 'सन ग्लोइंग फेशियल': मिळवा सकाळच्या कोवळ्या उन्हासारखा ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 7:05 PM

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी रोज फेशियल करणं गरजेचं . रोज 15 मिनिटं काढून 3 स्टेप्स  फेशियल करा अन सन टॅनिंग विसरुन जा!

ठळक मुद्देत्वचा स्वच्छ करण्यासाठी कच्च्या दुधाचा उपयोग करावा.मसूर डाळीच्या पिठानं स्क्रब केल्यानं उन्हानं आलेला काळपटपणा निघून जातो. मुलतानी मातीचा लेप लावल्यानं त्वचेला आवश्यक खनिजं मिळतात.

उन्हाळ्यात त्वचेची चमक हरवते. केवळ चमक हरवते असं नाही तर तीव्र उन्हामुळे, गरम हवेमुळे त्वचा रापते, काळवंडते. नुसते ब्यूटी प्रोडक्टस वापरुन त्वचेची काळजी घेणं किंवा महिन्यातून एकदा फेशियल करणं पुरेसं ठरत नाही. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी सौंदर्य तज्ज्ञ पूनम चुघ रोज फेशियल करणं गरजेचं असल्याचं सांगतात.

Image: Google

 उन्हाळ्यात त्वचा जास्त खराब होते. चेहऱ्यावर मृत त्वचेचा थर जमा होतो. तो काढून टाकण्यासाठी त्वचेची खोलवर स्वच्छता आणि त्वचेचं नियमित पोषण् या दोन गोष्टींची आवश्यकता असते. यासाठी केवळ रोज 15 मिनिटं काढणं गरजेचे असतात. उन्हाळ्यात रापलेली त्वचा स्वच्छ होवून त्वचेवर चमक येण्यासाठी 3 स्टेप्स फेशियल करण्याची पध्दत पूनम चुघ सांगातात.

Image: Google

कच्च्या दुधानं क्लीन्जिंग

त्वचा स्वच्छ करण्यासाठी कच्च्या दुधाचा उपयोग करावा. कच्चं दूध आधी फ्रिजमध्ये ठेवून थंडं कराव्ं. थंडं दुधानं चेहऱ्याच हळूवार मसाज करत त्वचा स्वच्छ करावी. कच्च्या दुधानं क्लीन्जिंग करण्याचे अनेक फायदे असल्याचं पूनम चुघ सांगतात. कच्च्या दुधानं चेहरा स्वच्छ केल्यानं चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाते. कच्च्या दुधात असलेल्या लॅक्टिक ॲसिडमुळे त्वचा ताजीतवानी होते. त्वचेवर चमक येते. दुधात प्रथिनांचं प्रमाण भरपूर असल्यानं त्वचेला आर्द्रता मिळते. कच्च्या दुधाच्या वापरानं त्वचेतील कोलॅजन निर्मितीला चालना मिळून त्वचा घट्ट होते. तरुण दिसते. कच्चं दूध हे नैसर्गिक टोनर म्हणून ओळखलं जातं. कच्च्या दुधानं त्वचा स्वच्छ होते आणि उजळही. उन्हानं काळी पडलेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर केल्यास काळपटपणा निघून जातो. 

Image: Google

मसूर डाळीचा फेस स्क्रब

कच्च्या दुधानं त्वचा स्वच्छ केल्यानंतर मसूर डाळीचा स्क्रब करावा. यासाठी 1 मोठा चमचा लाल मसूर डाळ आणि 2 छोटे चमचे कच्चं दूध घ्यावं. स्क्रब तयार करण्यासाठी मिक्सरमधून मसूर डाळ बारीक करुन घ्यावी. वाटलेल्या डाळीत कच्चं दूध घालावं. मिश्रण थोडं घट्टच ठेवावं. हे मिश्रण चेहऱ्यास हलका मसाज करत लावावं. हा मसाज दोन मिनिटं करावा. मसाज केल्यानंतर  2मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. मसूर डाळीच्या पिठानं स्क्रब केल्यानं चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाते. त्वचा स्वच्छ होते. उन्हानं आलेला काळपटपणा निघून जातो.  चेहऱ्यावरील मुरुम, डाग, पुटकुळ्यांची समस्या कमी होते.

Image: Google

मुलतानी मातीचा लेप

लाल मसूर डाळीनं स्क्रब केल्यानंतर शेवटी मुलतानी मातीचा लेप चेहऱ्यास लावावा. हा लेप तयार करण्यासाठी 1 छोटा चमचा मुलतानी माती  आणि 2 छोटे चमचे कोरफडचा गर घ्यावा.  एका वाटीत दोन्ही गोष्टी एकजीव करावं. हा लेप चेहऱ्यास लावावा. हा लेप 10 मिनिटं चेहऱ्यावर राहू द्यावा. नंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. चेहरा रुमालानं टिपून चेहऱ्यास माॅश्चरायझर लावावं. या लेपाबाबत पुनम चुघ म्हणतात की मुलतानी मातीचा लेप लवकर सुकतो. तो पूर्ण कोरडा होवून देऊ नये. ज्यांची त्वचा कोरडी असेल त्यांनी मुलतानी मातीचा लेप करताना त्यात थोडं मधही घालावं. मुलतानी मातीचा लेप लावल्यानं त्वचेला आवश्यक खनिजं मिळतात. त्वचा खोलवर स्वच्छ होते. चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाते. चेहऱ्यावरचं अतिरिक्त तेल निघून जातं. चेहऱ्यावरचे मुरुम पुटकुळ्यांचे डाग पुसट होतात. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्ससमर स्पेशलत्वचेची काळजी