Join us  

आय मेकअप करा, पण करताना या १२ गोष्टी सांभाळा! सुंदर दिसण्यात डोळ्यांना आजार नको..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 12:25 PM

डोळ्यांचे सौंदर्य खुलवताना योग्य ती काळजी घ्यायला हवी, नाहीतर चांगले दिसणे पडू शकते महागात

ठळक मुद्देडोळ्यांना सजवताना काळजी घ्यायला हवी, नाहीतर...डोळ्यांचे सौंदर्य खुलवा, पण अट्टाहास नको

दिवाळी म्हटले की नातेवाईक आणि मित्रमंडळींना भेटताना छान दिसायला हवं. मग त्यासाठी चांगल्या कपड्यांबरोबरच हलकासा मेकअप आलाच. यामध्ये ओठ, डोळे यांचा मेकअप सर्वात महत्त्वाचा. तुमचे डोळे हे तुमच्या सौंदर्यातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो असे म्हणतात, कारण डोळे बोलतात आणि ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. हे डोळे उठून दिसले तर तुम्ही चार लोकांमध्ये उठून दिसू शकता. डोळ्यांचे सौंदर्य वाढवायचे असेल तर त्यांना खुलवण्यासाठी काजळ, लायनर, आयशॅडो, मस्कारा या किमान गोष्टी लावल्या जातात. हे लावताना आपल्या डोळ्यांचा आकार, त्यांची ठेवण या सगळ्याचा विचार करणे गरजेचे असते. 

डोळे देखणे दिसण्यासाठी त्यावर मेकअप चढविण्यात आला तरी या मेकअपमुळे डोळ्याच्या आरोग्याला धोकाही उद्भवू शकतो. आजकाल मास्क मुळे डोळ्यांना मेकअप करण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणून मेकअप करुच नये असे नाही पण तो करताना खालील काळजी नक्की घ्यायला हवी. थोड्या वेळाच्या चांगल्या दिसण्यासाठी आपण आपल्या डोळ्याचे आरोग्य तर बिघडवत नाही ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता मेकअप करताना डोळ्यांची काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय? तर नेत्रतज्ज्ञ डॉ. ऐश्वर्या मुळे यांनी याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या जाणून घेऊ...

( Image : Google)

१. मेकअपचे प्रोडक्ट वापरण्या आधी त्यावरील एक्सपायरी डोट नक्की चेक करा. नाहीतर जुने प्रॉडक्ट वापरून डोळे लाल होणे, कोरडे पडणे, चुरचुरणे, रॅश येणे किंवा अॅलर्जी अशा समस्या उद्भवू शकतात. 

२. मेकअपची प्रॉडक्टस शक्यतो चांगल्या ब्रँडची निवडा. जेणेकरुन ही प्रॉडक्ट टेस्टेड असतील व ज्यात पारा, शिसे, पॅराबेन्स, कार्बन ब्लॅक, फोरमालडीहाइड नसेल किंवा कमीत कमी प्रमाणात असेल.

३. डोळ्याच्या मेकअपचे ब्रश स्वच्छ ठेवा जुन्या किंवा खराब ब्रशमुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ शकते.

४. मेकअपचे सामान दर ४ ते ५ महिन्यांनी बदला. तसेच डोळ्यांना इन्फेक्शन झाल्यावर तुम्ही चुकून ही प्रॉडक्ट वापरली असतील तर तेव्हाही ती बदलण्याची आवश्यकता असते. कारण त्यामध्ये जंतू वाढण्याची शक्यता असू शकते.

५. एकमेकांचे मेकअप सामान वापरणे धोक्याचेच कारण त्यामुळे एकाला इनफेक्शन झाले असेल तर या सामानामुळे दुसऱ्यालाही त्याचा संसर्ग होऊ शकतो.

६. डोळ्यांना इन्फेक्शन झाले असल्यास ताबडतोब मेकअप करणे बंद करा. अनेकदा डोळे चुरचुरत असतील, लाल झाले असतील किंवा आणखी काही होत असेल तरी समारंभाला जायचे म्हणून किंवा सणवार आहे म्हणून तसाच मेकअप केला जातो. पण त्यामुळे समस्या आणखी वाढण्याची शक्यता असते. जोपर्यंत त्रास पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत मेकअप करु नका व डॉक्टरांचा सल्ला घ्या

( Image : Google)

७. मेकअप करण्याआधी डोळे व चेहरा स्वच्छ असावा. त्यामुळे चेहऱ्यावर किंवा डोळ्यांच्या आजुबाजूला मातीचे कण किंवा आणखी काही असेल तर ते डोळ्यात जाणार नाही. 

८. अनेकदा घाईत आपण चालत्या लोकलमध्ये किंवा गाडीत मेकअप करतो. पण या प्रॉडक्टला काही वेळा टोक असते. मस्कारा, काजळ लावताना काडी डोळ्यात जाऊन जखम होऊ शकते

९. झोपण्याच्या आधी मेकअप रीमूव्हरने डोळे व चेहरा स्वच्छ साफ करा, डोळ्यांवर मेकअप तसाच राहिला तर त्रास होण्याची शक्यता असते. मेकअप रीमूव्हरऎवजी व्हॅसलिन, बेबी शॅम्पू , खोबरेल तेल यानेही मेकअप काढता येऊ शकतो. फक्त ते डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. 

१०. डोळ्याशी निगडित एखादी शस्त्रक्रिया अलिकडेच झाली असेल तर डॉक्टरांच्या सल्याशिवाय मेकअप करू नका.

११. चमकी असलेला मेकअप टाळा कारण ही चमकी डोळयात गेल्यास बुब्बुळाला त्याचा त्रास होऊ शकतो. 

 १२. चुकून डोळ्यात मेकअप गेल्यास डोळा लगेच स्वच्छ पाण्याने धुवा व डोळा दुखणे लाल होणे घाण येणे, कमी दिसणे ,प्रकाशामध्ये डोळा उघडण्यास त्रास होणे यासारखा त्रास झाल्यास लगेचच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सडोळ्यांची निगामेकअप टिप्सदिवाळी 2021