Join us  

घरात एकमेकांचा कंगवा वापरताय? दुसऱ्याचा कंगवा वापरणं पडतं महागात, केसांचा घात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 3:53 PM

घरात जेवढी माणसं आहेत, तेवढे कंगवे असलेच पाहिजेत. शिवाय येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी एक दोन कंगवे एक्स्ट्राचे ठेवावेच. कारण एकमेकांचे कंगवे शेअर करणं म्हणजे स्वत:च्या केसांचं चांगलंच नुकसान करून घेणं आहे.

ठळक मुद्देशक्यतो कुणाचा कंगवा शेअर करूच नये. पण अगदीच गरज असली, तर जो कंगवा वापरणार आहात तो सॅनिटाईज करून स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि त्यानंतरच वापरा.मोठ्या माणसांचा कंगवा लहान मुलांसाठी अजिबात वापरू नये. मुलांचा कंगवा वेगळाच ठेवावा. 

अनेक घरांमध्ये कंगवे बरेच असतात. पण कुणी कोणता कंगवा वापरायचा याचे काही नियोजन नसते. हाताला येईल तो कंगवा घ्यायचा आणि केस विंचरून मोकळे व्हायचे, असे करत असाल तर थांबा. एकमेकांचे कंगवे वापरण्याची  सवय लगेच सोडून द्या. कारण असं करणं तुमच्या केसांच्या आणि डोक्याच्या त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतं. 

 

अनेकदा ऑफिसमध्ये किंवा कुणाच्या घरी पाहुणे म्हणून राहायला गेल्यावर किंवा एखाद्या लग्न- समारंभप्रसंगी कार्यालयात, हॉटेलमध्ये राहण्याची वेळ आल्यावर अनेक जण सर्रास आपले कंगवे एकमेकांसोबत शेअर करतात. साधा कंगवा तर आहे, मग तो शेअर केल्याने काय होणार, असा विचार अनेकांच्या मनात येऊ शकतो. मुळात कंगवा शेअर करण्याचे काही साईड इफेक्टही असू शकतात, हेच कुणाच्या डोक्यात येत नाही. अनेकदा तर आपला कंगवा तसाच आपण लहान मुलांच्याही डोक्यात फिरवतो. हे असे करणे खूपच त्रासदायक ठरू शकते. 

 

इतरांचा कंगवा का वापरू नये ?जेव्हा आपण आपले केस विंचरतो तेव्हा आपल्याला दिसत नसले तरी आपल्या केसातला कोंडा, मळ, घाण यांचे लहान- लहान कण कंगव्याला चिकटले जातात. ते तसेच कंगव्यावर चिटकून राहतात. हा कंगवा जेव्हा दुसरे कुणी वापरतात, तेव्हा कंगव्यावर आधीपासूनच असलेला सगळा संसर्ग आपोआपच दुसऱ्याच्या केसांमध्ये चालला जातो. उवांचा प्रवासही कंगव्याच्या माध्यमातून एका डोक्यातून दुसऱ्या डोक्यात होऊ शकतो. 

 

ज्या व्यक्तीला रिंगवर्म फंगसचा त्रास आहे, अशा व्यक्तीचा कंगवा वापरल्याने आपल्यालाही तो आजार होऊ शकतो. यामध्ये डोक्याच्या त्वचेवर अनेक लहान- लहान फोड येतात, केस गळू लागतात,  टाळू कोरडी  पडू लागते आणि केस अशक्त होऊन तुटण्याचे प्रमाण वाढत जाते. 

आठवड्यातून एकदा कंगवा धुवाकेस जसे नियमितपणे धुता, तसा कंगवाही नियमितपणे धुणे खूप आवश्यक असते. इतरांचा कंगवा वापरणे जसे धोकादायक असते, तसेच तुम्हीही वर्षानुवर्षे न धुतलेला कंगवा वापरणे हानिकारक असते. प्रत्येकवेळी केस विंचरताना कंगव्यात नव्याने घाण, कचरा, कोंडा अडकत राहतो आणि त्याचा केसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत जातो.

 

कसा धुवायचा कंगवा ?कंगवा धुण्यासाठी गरम पाण्यात शाम्पू टाका आणि त्याचा फेस करून घ्या. यामध्ये एखादा तास कंगवा भिजत ठेवा. यानंतर कोंब क्लिनरने कंगव्यात अडकलेली घाण स्वच्छ करून टाका. अशा पद्धतीने आठवड्यातून एकदा कंगवा स्वच्छ करायलाच हवा.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी