Join us  

फॅशन ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात तुम्हीही ३ चुका हमखास करताय का? बघा, किती आरोग्याला धोका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2023 5:43 PM

Sometimes, In The Pursuit Of Style, We Can Overlook The Impact Our Choices Have On Our Health : फॅशन ट्रेंड फॉलो करताना शारीरिक काळजी घेण्याकडे अधिक लक्ष द्यावे.

फॅशन करताना कपडे, चपला, हॅन्ड बॅग्ज, मेकअप यांसारख्या गोष्टींमध्ये आपण ट्रेंड फॉलो करतो. दिवसागणिक बदलत जाणाऱ्या ट्रेंडनुसार फॅशनदेखील बदलत असते. आपण सुद्धा या बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार आपल्या सगळ्या गोष्टींत बदल आणतो. परंतु कधी कधी ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात आपण आपली शारीरिक हानी करून घेतो. फॅशन करताना आपल्याला जे सूट होईल, ज्यातून आत्मविश्वास वाढेल, आपल्याला कम्फर्टेबल वाटेल असे कपड्यांचे प्रकार निवडावेत. फॅशन नेहमीच बदलत असते. ट्रेंडमध्ये अनेक गोष्टी अचानक येतात. मात्र, सध्या जो ट्रेंड आहे, तो आपल्याला सूट होत असेल तर नक्की फॉलो करावा. अन्यथा सूट होत नसेल, तर त्याचा वापर अजिबात करू नये. फॅशन ट्रेंड फॉलो करताना शारीरिक काळजी घेण्याकडे अधिक लक्ष द्यावे (Sometimes, In The Pursuit Of Style, We Can Overlook The Impact Our Choices Have On Our Health).

आपण फॅशन ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात काय चुका करून बसतो किंवा शारीरिक आरोग्यासाठी ते किती हानीकारक ठरू शकते याबद्दलचा एक व्हिडीओ satvicmovement या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 

 

नक्की काय करता टाळता येऊ शकत? 

१. हाय हिल्स वापरणे टाळा  - उंच, स्टायलिश व ग्लॅमरस दिसण्यासाठी अनेक महिला हाय हिल्सच्या चपला वापरतात. मात्र त्यांच्या सततच्या वापरामुळे पायांचे दुखणे वाढते. आजकाल बऱ्याच महिला शॉपिंग, पार्टी, ऑफीसला जाताना हाय हिल्सचा वापर करताना दिसतात. मात्र सतत उंच टाचांच्या चपला घातल्यामुळे पायांचे दुखणे (Foot pain) सुरू होते. त्या जरी स्टायलिश दिसत असल्या तरी त्यामुळे पायांवर फोड येणे, ते सुजणे, दुखणे, अशा अनेक समस्या सुरू होतात. बराच वेळ हाय हिल्स घातल्याने पायांवर दाब येतो, ते आखडतात. त्यांच्या नसांना सूज येते, काहीवेळेस ते इतके दुखू लागतात, की धड चालताही येत नाही. कंबरेचे, पाठीचे दुखणेही मागे लागू शकते. यामुळे गरजेनुसार हाय हिल्स वापरावेत परंतु सहसा दररोजच्या वापरात हाय हिल्स वापरणे टाळा. पायांना योग्य आणि आरामदायक अशा चपलांचा वापर करा. रोजच्या वापरात शक्यतो सपाट (फ्लॅट) चपला वापरा. 

 

२. आकाराने मोठ्या हेव्ही हॅन्ड बॅग्ज घेणं टाळा -  आकाराने मोठ्या हेव्ही हॅन्ड बॅग्ज घेतल्याने खांद्यांवर, हातांवर ताण येतो. आपण आकाराने जितक्या मोठ्या हॅन्ड बॅग्ज घेतो तितकेच सामान आपण त्यात भरून ठेवतो. त्यामुळे अनावश्यक सामान उगाच भरून ठेवल्याने बॅग्ज वजनाने जड होतात. या जड बॅगा जरआपण बराच वेळ हातात किंवा खांद्यांवर पकडून राहिलो तर हात दुखून त्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे मोठ्या आकाराची एकच मोठी हॅन्ड बॅग न घेता मागे दोन्ही खांद्यांवर अडकवू शकू अशी सॅक घ्या. जेणेकरून यात तुमचे सगळे सामान व्यवस्थित राहवून तुम्ही दोन्ही खांद्यांवर बॅग अडकवल्यामुळे तुमच्या एकाच खांद्यांवर ताण येणार नाही. दोन्ही खांद्यांवर बॅग घेतल्यामुळे त्या बॅगेचे वजन दोन्ही खांद्यांवर एकसारखे विभाजित होईल. 

३. नेलपेंट लावणे हानीकारक- नेलपेंट लावणे प्रत्येक मुलीला खूप आवडते. नेलपेंट लावल्याने नखे सुंदर दिसतात परंतु नेलपेंट लावणे नुकसानकारक ठरू शकते. नेलपेंटचा जास्त वापर केल्याने नखे कमजोर होतात, सोबतच तुटू लागतात आणि हळुहळु त्यांची चमक नष्ट होते. नेलपॉलिशचा वापर करणार्‍या महिलांमध्ये ट्रिफेन्यल फॉस्फेट सारखा विषारी पदार्थ आढळतो. नेलपेंटमध्ये वेगवेगळ्या हानिकारक केमिकलचा वापर केला जातो. जेव्हा हे केमिकल नखांच्या संपर्कात येते तेव्हा हळुहळु नखाच्या पेशींमधून जाऊन शरीराच्या इतर पेशींमध्ये सुद्धा प्रवेश करते. नेलपेंटमध्ये असे अनेक हानीकारक केमिकल असतात ज्याचा वापर नेलपेंट प्रीझव्ह करण्यासाठी म्हणून केला जातो. त्वचेच्या संपर्कात आल्यानंतर या केमिकलमुळे खाज सुटण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

टॅग्स :फॅशन