आपले केस छान लांबसडक, काळेभोर, घनदाट असावेत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. केस सुंदर दिसावेत यासाठी स्त्रिया त्यांची योग्य ती काळजीदेखील घेतात. केसांना तेल लावणे, व्यवस्थित शॅम्पूने धुणे, वेळोवेळी केसांचे कंडिशनिंग करणे असे अनेक प्रकार स्त्रिया करत असतात. केस जितके लांबसडक तितकीच त्यांच्या स्वच्छतेची देखील काळजी घ्यावी लागते. सर्वसाधारणपणे आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपण केस धुतो.
केस धुतल्यानंतर ते लगेच वाळण्यासाठी किंवा केसातील पाणी निथळून जाण्यासाठी काही स्त्रिया केसांना टॉवेल बांधून ठेवतात. अशा प्रकारे केसांना टॉवेल बांधून ठेवल्याने केस लगेच वाळतील किंवा पाणी निथळून जाईल असे जरी वाटत असले, तरी तसे न होता यामुळे केसांना कमी - अधिक प्रमाणांत हानी पोहोचते. केसांची काळजी घेताना काही मूळ गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. केसांची काळजी घ्यायची असेल तर, केस धुणे आणि केस वाळवण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. ओल्या केसांवर अशा प्रकारे टॉवेल बांधून ठेवल्याने केसांचे नुकसान होऊ शकते(Wrapping Towel After Bath Is Harmful).
ओल्या केसांवर टॉवेल बांधल्याने कोणते नुकसान होऊ शकते...
१. केस होऊ शकतात ड्राय :- ओल्या केसांवर टॉवेल बांधून ठेवल्याने केसांची मुळे तसेच नसांवर एक प्रकारचा ताण येतो. यामुळे केसांच्या मुळांना व नसांना इजा होऊन केस फारच रुक्ष किंवा कोरडे पडू शकतात.ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळ्याने आपले केस आणि टॉवेल यांच्यात एक प्रकारचे घर्षण निर्माण होते. यामुळे केस रुक्ष किंवा कोरडे होऊ शकतात. कारण जास्त वेळ केसांना टॉवेल बांधून ठेवल्यास केसांमधील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस खूप कोरडे होतात.
२. केस तुटू शकतात :- केस धुतल्यानंतर तशाच ओल्या केसांवर टॉवेल बांधून ठेवल्याने कमजोर केसांना इजा पोहोचून ते तुटण्याची समस्या उद्भवू शकते. कमजोर केसांसोबतच मजबूत किंवा चांगले केसदेखील टॉवेलच्या छोट्या धाग्यांमध्ये अडकून तुटू शकतात. केस ओले असताना फार नाजूक असतात. अशावेळी केसांना टॉवेल गुंडाळल्याने केसांचं टॉवेलसोबत घर्षण होतं. यामुळे केस तुटतात.
३. केस गळती सुरु होऊ शकते :- ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळ्याने आपले केस टॉवेलमध्ये बराच काळ राहून टॉवेलसोबत झालेल्या घर्षणाने दुमडू लागतात. केस दुमडल्याने त्यावर अतिरिक्त ताण येऊन ते आपोआप तुटू लागतात. ओल्या केसांवर बराच काळ टॉवेल गुंडाळून ठेवल्याने केसांचे सौंदर्य खराब होते. यामुळे केसांचे आरोग्य कमजोर होऊन केस गळती सुरु होते.
४. केसांची नैसर्गिक चमक होईल नाहीशी :- शॅम्पूने केस धुतल्यानंतर ओले केस टॉवेलने बांधण्याची अनेक स्त्रियांना सवय असते. आंघोळीनंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केस ताणले जाऊन भरपूर प्रमाणात गळू शकतात. असे केल्याने केसांच्या नसा कमकुवत होऊ लागतात. वारंवार ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसांची नैसर्गिक चमक नाहीशी होऊन केस कोरडे व रुक्ष दिसू लागतील.
५. केसांतील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी होईल :- केस धुतल्यानंतर टॉवेलने वारंवार केसांना पुसणे, ओल्या केसांवर टॉवेल बांधून ठेवणे याचा वाईट परिणाम आपल्या केसांवर होऊ शकतो. यामुळे आपले केस कायमचे कोरडे होऊ शकतात. यासोबतच केसांना टॉवेलमध्ये बांधल्याने केसांचे नैसर्गिक तेल संपते. यामुळे केसांचा नैसर्गिक चमकदारपणा निघून जातो. नैसर्गिक तेल संपल्याकारणाने केस आपोआप रखरखीत होतात.
अंघोळीनंतर ओले केस पुसण्यासाठीचे उपाय ...
१. जर आपण आपले केस घट्ट बांधत असाल तर आपल्याला ही सवय तात्काळ बदलावी लागेल. कारण घट्ट केस बंधाल्याने आपल्या हेअर फॉलिकल्सवर भरपूर प्रमाणात ताण येतो. त्यामुळे केस कमकुवत होऊन तुटू लागतात. त्यामुळे शक्य असेल तेवढे केस हलके बांधा किंवा मोकळे सोडा. जर केस बांधायचेच असतील तर लक्षात ठेवा की जास्त घट्ट बांधू नका.
२. ओले केस बांधण्यासाठी टॉवेलऐवजी कॉटन टी-शर्ट किंवा मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करावा.
३. आंघोळ केल्यानंतर आपण ज्या टॉवेलनं ओलं शरीर पुसतो, त्याच टॉवेलने ओले केस पुसणे टाळावे. केस पुसण्यासाठी एक वेगळे सुती कापड किंवा वेगळ्या टॉवेलचा वापर करावा. ते टॉवेल फक्त केस पुसण्यासाठीच वापरावे. शरीर पुसण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी त्याचा वापर करू नये.