फक्त चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेऊन उपयोग नाही. कारण चेहऱ्याप्रमाणेच जेव्हा तुमच्या संपूर्ण त्वचेची काळजी घेतली जाईल, तेव्हाच तर खऱ्या अर्थाने तुमचे सौंदर्य दिसून येईल. म्हणूनच संपूर्ण त्वचेची काळजी घेण्यासाठी आंघोळीच्या पाण्यापासूनच थोडा बदल करायला सुरुवात करा. सगळ्या अंगाची स्वच्छता करण्यासाठी आंघोळीसारखा दुसरा चांगला पर्याय नाही. म्हणूनच तर रोज नुसती साध्या पाण्याने आंघोळ करण्यापेक्षा त्या पाण्यात अधून- मधून या काही पदार्थांपैकी कोणताही एक पदार्थ टाकत जा. मग बघा तुमच्या त्वचेचा पोत कसा सुधारतो ते. या उपायामुळे त्वचा मऊ, तजेलदार आणि तुकतुकीत होते.
१. ऑलिव्ह ऑईलआठवड्यातून दोन वेळा आंघोळीच्या पाण्यात दोन टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल टाका. ऑईल टाकल्यानंतर सगळे पाणी एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर या पाण्याने आंघोळ करा. ऑलिव्ह ऑईल केसांसाठी तसेच त्वचेसाठी अतिशय पोषक असते. या उपायामुळे तुमच्या शरीराचे नैसर्गिक पद्धतीने पोषण होईल. अशा प्रकारची आंघोळ केल्यानंतर सगळ्या अंगाला बॉडी लोशन लावायची गरज नाही, असेही तज्ज्ञ सांगतात.
२. नारळाचे दूध नारळ किसून त्याचे काढलेले दूध त्वचेसाठी तसेच केसांसाठी अतिशय पोषक आहे. त्यामुळे हा प्रयोगही आठवड्यातून एकदा करायला काहीच हरकत नाही. नारळ किसून त्याचे दूध काढून घ्या आणि दोन किंवा तीन टेबलस्पून दूध तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाका. यामुळे त्वचेचे नैसर्गिक पद्धतीने मॉईश्चरायझेशन होईल.
३. लिंबाचा रसलिंबामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. यासोबतच लिंबामध्ये चांगल्या प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. लिंबामध्ये असणारे हे दोन्ही पोषक घटक आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. तसेच लिंबाला नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे बादलीभर आंघोळीच्या पाण्यात एक मध्यम आकाराचे लिंबू पिळून टाकावे आणि या पाण्याने आंघोळ करावी. त्वचा सुरकुतण्याचा वेग यामुळे नक्कीच मंदावला जातो.
४. गुलाबपाणीमेकअपच्या आधी गुलाबजल हे टोनर म्हणून वापरले जाते हे तर आपल्याला माहितीच आहे. हेच गुलाबजल जर आंघोळीच्या पाण्यात मिसळले, तर याचा निश्चितच त्वचेवर चांगला परिणाम दिसून येतो. त्वचा मृदू आणि मुलायम होते. हा उपाय उन्हाळ्यात अवश्य करावा. कारण गुलाब जलामुळे त्वचेला थंडावा मिळतो.
५. काळे मीठआंघोळीसाठी काढलेल्या गरम पाण्यात जर काळेमीठ घातले तर नक्कीच त्वचा फ्रेश आणि तुकतुकीत होते. यामुळे शरीराचा सगळा थकवा निघून जातो आणि त्वचा खुलून येते. काळे मीठ घातलेल्या गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे रक्ताभिसरण आणखी उत्तम होते, असे म्हंटले जाते.