Join us  

फॅशन म्हणून खोटी नखं लावता? ४ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर खोटीच नाही खरी नखंही होतील खराब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2023 4:31 PM

how to take care of artificial acrylic nails at home : आर्टिफिशियल नखं लावल्यानंतर काय काळजी घ्यायची?

नखं सुंदर दिसावीत म्हणून आपण मेनिक्युअर, पेडिक्युअर, नेल स्पा असे बरेच काही करतो. नखांची सुंदरता वाढविण्यासाठी बऱ्याच महिला खोट्या तसेच अ‍ॅक्रेलिक नखांचा वापर करताना दिसतात. या आर्टिफिशियल खोट्या नखांचा वापर करून आपल्या नखांची सुंदरता वाढवू शकतो. आर्टिफिशियल नखांचा वापर केल्याने आपली लहान नखे आकाराने मोठी, शेपमध्ये असलेली दिसतात पर्यायाने हात व बोट खूप छान आकर्षक दिसतात. आर्टिफिशियल नखांचा वापर करताना त्यांची तितकीच काळजी देखील घ्यावी लागते.

काहीवेळा आपण खूप हौसेने आर्टिफिशियल नख लावतो परंतु त्याची योग्य ती काळजी न घेतत्यामुळे हातांच्या बोटांना इजा होणे, स्किनवर लालसरपणा दिसणे, स्किन कोरडी पडणे अशा विविध समस्या उद्भवतात. कित्येक महिला आर्टिफिशियल नख लावण्यासाठी पार्लरमध्ये महागड्या ट्रीटमेंट्स आणि भरपूर पैसा खर्च करतात. परंतु आर्टिफिशियल नख लावल्यानंतर त्याची योग्य ती काळजी कशी घ्यायची हे माहित नसल्या कारणामुळे महिलांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. आर्टिफिशियल नखं लावल्यानंतर त्यांची काळजी कशी घ्यायची याबद्दलच्या काही टीप्स लक्षात ठेवू( how to take care of artificial acrylic nails at home?).

आर्टिफिशियल नखांची काळजी कशी घ्यावी ? 

१. आर्टिफिशियल नखं लावल्यानंतर त्यांची काळजी घ्या :- आर्टिफिशियल नखं लावल्यानंतर त्यांची अतिशय काळजी घ्यावी लागते. आर्टिफिशियल नखं लावल्यानंतर भलेही आपली नख खूप लांब, मोठी, मजबूत दिसत असली तरी ती खूपच नाजूक असतात. या नखांचा वापर एखाद्या टूलसारखा करू नका. या लांब नखांनी अवजड वस्तू उचलणे, नखांचा वापर करून फाडणे, वस्तूंचे झाकण उघडणे अशा गोष्टी करू नका. असे केल्यास आपली आर्टिफिशियल नखं तुटू शकतात. आर्टिफिशियल नख तुटून तुमच्या खऱ्या नखांना देखील इजा होऊ शकते.

 

२. ओलाव्यापासून राहा दूर :-  आर्टिफिशियल किंवा अ‍ॅक्रेलिक नखं लावल्यानंतर आपला हात कायम सुका राहील याची दक्षता घ्यावी. आर्टिफिशियल नखं लावल्यानंतर पाण्याचा वापर हातांसाठी जास्त करू नका. पाण्यात हात बुडवल्यानंतर या आर्टिफिशियल नखांमध्ये पाणी साचून राहिल्याने त्याला फंगस किंवा बुरशी येऊन ते खराब होऊ शकते. यामुळे तुमच्या बोटांची स्किन खराब होण्याची दाट शक्यता असते. आर्टिफिशियल किंवा अ‍ॅक्रेलिक नखं चिटकविण्यासाठी अ‍ॅक्रेलिक ग्लू वापरला जातो. जर सतत या आर्टिफिशियल नखांना पाणी लावले तर अ‍ॅक्रेलिक ग्लू निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आर्टिफिशियल नख लावल्यानंतर हात जास्त काळ पाण्यात राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

३. अ‍ॅसिटोनचा वापर टाळा :- नखांची सुंदरता वाढविण्यासाठी आपण त्यावर वेगवेगळ्या रंगांच्या नेलपेंट लावतो. नेलपेंट लावताना आपण आधीचे नेलपेंट काढून टाकण्यासाठी नेलपेंट रिमूव्हरचा वापर करतो. नेलपेंट रिमूव्हरमध्ये असणाऱ्या अ‍ॅसिटोन नामक घटकाचा आपल्या आर्टिफिशियल नखांवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. जर आपण नेलपेंट रिमूव्हरचा जास्त वापर केल्यास त्यामध्ये असणाऱ्या अ‍ॅसिटोन या घटकामुळे आर्टिफिशियल नखं खराब होऊ शकतात.

 

४. नखांच्या जवळच्या स्किनची काळजी घेणे महत्वाचे :- आर्टिफिशियल नखं लावल्यानंतर जितकी नखांची काळजी घ्यावी लागते तशीच काळजी नखांच्या आसपासच्या स्किनची देखील घ्यावी लागते. नखांच्या जवळपास असणाऱ्या स्किनची स्वच्छता ठेवणे देखील महत्वाचे ठरते. नखांच्या जवळच्या स्किनला रोज न चुकता मॉइश्चराइजर लावणे आवश्यक आहे. आर्टिफिशियल नख लावलेल्या बोटाची स्किन जर कोरडी, लालसर किंवा इतर काही बदल दिसत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :ब्यूटी टिप्स