कधी ऑफीसची एखादी महत्त्वाची मिटींग म्हणून तर कधी एखादा इव्हेंट म्हणून साडी नेसावी लागते. तर कधी साडी हाच ड्रेसकोड असल्याने अनेकींना ऑफीसला जाताना नियमित साडी नेसावी लागते. याशिवाय सणावाराला मजा म्हणून साडी नेसली जाते ती वेगळीच. पण ऑफीसमध्ये साडी नेसायची म्हटल्यावर ऑफीसच्या वातावरणाला शोभेल अशी ती साडी असायला हवी. या साडीची निवड, ब्लाऊज, तुमचा लूक, मेकअप हे सगळे प्रोफेशनल असेल तर तुम्ही चांगले दिसता अन्यथा तुमची चेष्टा होऊ शकते. पाहूयात ऑफीसमध्ये साडी नेसताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या...
१. साडीची निवड
ऑफीसमध्ये साडी नेसायची असल्यास डिझाइनर साडी नेसणे टाळावे. तसेच सिल्कची साडी नेसणार असाल तर गडद रंग टाळावा. तसेच जाड बॉर्डरच्या साड्या ऑफीसला नेसणे टाळावे. कॉटन, लिनन अशा हलक्या कापडाच्या आणि फॉर्मल वाटतील अशा साड्या नेसाव्यात. शिफॉनच्या हलक्या रंगाच्या आणि कमी वजनाच्या साड्याही ऑफीसला चांगल्या दिसतात.
२. ब्लाऊज कसा असावा
ऑफीसमध्ये साडी नेसायची असल्यास तुमचे ब्लाऊज सोबर असायला हवे. ब्लाऊजचा पुढचा आणि मागचा गळा जास्त मोठा ठेऊ नये. तसेच गोल, चौकोनी अशा सामान्य आकाराचा गळा असावा. तसेच ऑफीसला जाताना घालत असलेल्या ब्लाऊजला लटकन, एम्ब्रॉडरी असे काहीही नसावे. त्यामुळे तुमच्याकडे प्रोफेशनली पाहिले जात नाही. तसेच ब्लाऊजचा पॅटर्न प्रोफेशनल वाटेल असा असावा. बाह्या फार लहान असतील तर ऑफीसमध्ये चांगले दिसत नाही. त्यामुळे बाह्या कोपरापर्यंत किंवा थ्री फोर्थ असाव्यात. आवडत असेल तर फूल स्लीव्हजच्या बाह्याही चांगल्या दिसतात.
३. घामाघूम होणार नाही आणि काचणार नाही याची काळजी घ्या
ऑफीसमध्ये तुम्ही बसता त्या ठिकाणी हवा पुरेशी खेळती असेल तर ठिक नाहीतर साडीचे कापड जाड असेल तर दिवसभर साडीमुळे गरम होऊ शकते, त्यामुळे घामाघूमही व्हायला होते. तसेच साडी खूप घट्ट नेसली गेली असेल तर कंबरेपाशी तसेच ब्लाऊजपाशी काचते. त्यामुळे अंगाला खाज येऊ शकते. ऑफीसमध्ये अशाप्रकारे इरीटेट झाल्यास आपल्याला खाजवताही येत नाही, त्यामुळे साडीची निवड आणि ती नेसण्याची पद्धत योग्य असेल असे बघा.
४. खूप वर किंवा खूप खाली नेसू नका
अनेकींना साडी खूप पायात नेसायची सवय असते. ऑफीसमध्ये घाईगडबडीत चालताना ही साडी पायात येण्याची शक्यता असते. त्यामुळे साडी एकदम पायात येईल अशी नेसू नका. नाहीतर पायात अडकून पडण्याची शक्यता असते. तसेच साडी खूप वर नेसली गेली तरीही ती चांगली दिसत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही चांगली साडी नेसली तरी ती लोंबल्यासारखी दिसते आणि तुम्ही गबाळे दिसू शकता.
५. साडी चापूनचोपून नेसा
ऑफीसमध्ये साडी नेसताना पदर हातावर न घेता तो योग्य पद्धतीने पीनअप करा. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित आवरले आहे असे दिसाल. तसेच निऱ्या व्यवस्थित घालून साडी चापूनचोपून नेसा. नाहीतर साडी गुंडाळली आहे असे वाटेल आणि तुम्ही गबाळे दिसाल.