Body Odor Reasons : शरीरातून दुर्गंधी येणं ही एक सामान्य बाब आहे. जी उन्हाळ्यात अधिकच वाढते. मग पावडर, अत्तर, परफ्यूम किंवा डीओ लावून ही दुर्गंधी करण्याचा प्रयत्न केला जातो. काही प्रमाणात याचा फायदा होतोही. पण काही लोकांच्या शरीरातून इतकी जास्त दुर्गंधी येते की, परफ्यूम जास्त वेळ कामच करत नाही. अशात अनेकांना चारचौघात जाण्याची लाजही वाटते. इतकंच नाही तर व्यक्तीचा आत्मविश्वासही कमजोर होतो. अशात आज आपण डॉक्टरांकडून हे जाणून घेणार आहोत की, काही लोकांच्या शरीरातून इतरांच्या तुलनेत जास्त दुर्गंधी का येते.
काय असतं कारण?
न्यूट्रिशन कोच रयान फर्नांडो यानी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात ते सांगतात की, 'सामान्यपणे सगळ्यांनाच असं वाटत असतं की, घामामुळे शरीरातून दुर्गंधी येते. पण अजिबात काही नाहीये. शरीरातून दुर्गंधी येण्याचा आणि घामाचा काही थेट संबंध नाही. शरीराच्या दुर्गंधीचं मुख्य कारण त्वचेवर बॅक्टेरिया असतात'.
डॉ. रयान फर्नांडो म्हणाले की, शरीरातून जो घाम निघतो त्याला अजिबात गंध नसतो. पण जेव्हा बॅक्टेरिया याच्या संपर्कात येतात, तेव्हा दुर्गंधी तयार होते. फार कमी लोकांना माहीत असेल की, शरीरात घाम दोन ग्रंथींपासून तयार होतो. एक म्हणजे एक्राइन आणि दुसरी म्हणजे एपोक्राइन. एक्राइन ग्रंथीसोबत पाणी व मीठ मिक्स होऊन घाम तयार होतो. ज्याला अजिबात गंध नसतो. तेच एपोक्राइन ग्रंथीसोबत फॅट आणि प्रोटीन मिळून घाम तयार होतो. ही ग्रंथी प्यूबर्टीनंतर सक्रीय होतात आणि यातून निघणाऱ्या घामात बॅक्टेरिया वाढतात. हेच बॅक्टेरिया दुर्गंधीचं कारण ठरतात.
काही लोकांच्या शरीराची जास्त दुर्गंधी का येते?
याबाबत डॉक्टरांनी सांगितलं की, याचं कारण जीन्स, हॉर्मोनल बदल, स्वच्छतेची कमतरता आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी असू शकतात.
काय करावे उपाय?
खाण्या-पिण्यात करा बदल?
ज्या लोकांच्या शरीरातून जास्त दुर्गंधी येते त्यांनी ही समस्या दूर करण्यासाठी काय करावं याबाबत डॉक्टरांनी काही उपाय सांगितले आहेत. ते म्हणाले की, दुर्गंधी दूर करण्यासाठी सल्फर असलेले फूड्स जसे की, कोबी, कांदे, लसूण, ब्रोकली या गोष्टी कमी खाव्यात. तसेच जास्त मसालेदार पदार्थ सुद्धा खाऊ नयेत आणि कॉफीही टाळावी.
तेच तुम्ही क्लोरोफिल असलेले फूड्स अधिक खाऊ शकता. यात पालक, धणे, मेथी इत्यादींचा समावेश होतो. तसेच शरीराची दुर्गंधी कमी करण्यासाठी ड्रॅगन फ्रूट, दही, ताक, लिंबू, संत्री, काकडी, कलिंगड खाण्याचा सल्लाही त्यानी दिला.
नियमित सफाई आणि योग्य कपडे
शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी रोज आंघोळ करावी आणि शरीर चांगलं स्वच्छ करावं. वेळोवेळी काखेत वाढलेले केस काढा. आंघोळ करण्यासाठी तुम्ही बेनजोल पॅरोक्साइड बॉडी वॉशचा देखील वापर करू शकता. त्यासोबतच कॉटन किंवा लिननसारखे कपडे घाला. सिंथेटीक कपड्यांनी घाम थांबतो आणि दुर्गंधी वाढते.