असं म्हणतात चेहऱ्यावरून व्यक्तीचं वय दिसून येतं. विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावर म्हातारपण दिसू लागतं. वयोमानानुसार केस पांढरे होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, त्वचा सैल होण्यास सुरुवात होणे अशा समस्या निर्माण होतात. यातून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करायला लागतो. काही जण फेस योग करतात, फेस योग आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. फेस योग चेहऱ्यावरील मांसपेशींना मजबूत करते. त्याचसोबत त्वचा तजेलदार करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. दरम्यान, हा योग केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या व रिंकल्स कमी होतात का? हा योग केल्याने खरोखर चेहऱ्याला फायदा होतो का? यासंदर्भात त्वचारोगतज्ज्ञ डॉ.तृष्या यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये माहिती दिली आहे.
चेहऱ्यावरील सुरकुत्यांसाठी हा फेस योग किती फायदेशीर?
त्वचारोगतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फेस योग हा एक चेहऱ्याचा व्यायाम आहे. ज्यामध्ये चेहऱ्याचे रक्त परिसंचरण वाढवण्यासाठी आणि लिम्फॅटिक ड्रेनेज सुधारण्यासाठी चेहऱ्याला टोन करतात. दरम्यान, हा योग चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी करते असे कोणत्याही संशोधनात आढळले नाही. फेशियल योग केल्याने चेहरा स्लिम होण्यास मदत होईल, असेही कोणत्या दाव्यात स्पष्ट झालेले नाही.
फेस योग केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होत नाहीत, परंतु सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. दररोज 30 मिनिटे चेहरा आणि मानेच्या स्नायूंवर काम केल्याने जबडा आणि चेहरा टोन होतो. मात्र, यासाठी फेशियल योग योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.
त्वचेची काळजी कशी घ्याल
त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी निरोगी अन्नाचे सेवन करणे, धूम्रपान न करणे, स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करणे यासह कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझ करणे, यामुळे त्वचेचे अकाली वृद्धत्व टाळता येईल. दरम्यान, अधिक केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर टाळावे.