Join us  

चेहरा जाड, टम्म सुजलेला दिसतो? मलायका अरोरा सांगतेय, बारीक - फ्रेश चेहऱ्यासाठी 3 उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 2:36 PM

चेहरा जाड दिसतोय? मेकअप नाही तर मलायका अरोरा सांगतेय त्या 3 युक्त्या आहेत कामाच्या! बघा व्हिडिओ ..

ठळक मुद्देबलून पोजमुळे गालावरची चरबी कमी तर होतेच सोबतच चेहरा उजळ आणि प्रसन्नही दिसतो.चेहरा दीर्घकाळ तरुण ठेवण्यासाठी फेस टॅपिंगचा उपयोग होतो.परफेक्ट जाॅलाइनसाठी मत्स्य मुद्रेचा उपयोग होतो.

सुंदर दिसण्यासाठी केवळ मेकअप महत्वाचा नसून व्यायामही महत्वाचा असतो.  चेहरा जाड दिसत असला, मानेच्या आणि जाॅलाइन भागात तो फुगलेला दिसत असला की चेहरा सुंदर , उत्साही दिसत नाही.  चेहऱ्यावर चरबी साचल्यानं चेहरा जाड दिसतो. चेहरा आणि हनुवटीच्या भागात साचलेली चरबी कमी करण्यासाठी ( दिसण्यासाठी) मेकअपचा उपाय हा तात्कालिक असून त्याचा चेहऱ्यावरची चरबी कमी करण्यासाठी काही उपयोग होत नाही.

Image: Google

चेहऱ्यावरची चरबी कमी करण्यासाठी उपाय शोधत असल्यास मलायका अरोरानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेला याबाबतचा व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. मलायका अरोरा इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत चेहेऱ्यावरची, हनुवटीच्या भागात साचलेली चरबी कमी करण्यासाठी 3 प्रकारचे फेस योग करण्यास सांगते. गाल, हनुवटी, मान या ठिकाणी साचलेली चरबी मलायका अरोरा सांगते त्या  3  मुद्रा (फेस योग) नियमित केल्यास कमी होते आणि चेहरा आकर्षक दिसू शकतो.

Image: Google

चेहरा आकर्षक करणाऱ्या मुद्रा 

1. गालाचा फुगा ( बलून पोज) 

गालावरची चरबी कमी करण्यासाठी बलून पोज ही उपयुक्त योग मुद्रा आहे.  चेहरा फुग्यासारखा फुगवल्यास चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात. यामुळे तेथील रक्तप्रवाहास गती मिळते. बलून पोजमुळे गालावरची चरबी कमी तर होतेच सोबतच चेहरा उजळ आणि प्रसन्नही दिसतो. बलून पोज करण्यासाठी  जमिनीवर मांडी घालून/ पद्मासनात/ अर्धपद्मासनात बसावं. चेहरा समोर स्थिर ठेवावा. दोन्ही गालात हवा भरुन गाल फुगवावे. हाताची दोन बोटं ओठांवर ठेवावीत. ओठांवर बोटं ठेवल्यानं हवा तोंडात रोखण्यास मदत होते. एक किंवा अर्धा मिनिटं या अवस्थेत राहिल्यानंतर तोंडातली हवा बाहेर सोडावी. अर्ध्या मिनिटं थांबून पुन्हा बलून पोज करावी.  रोज किमान तीन वेळा बलून पोज करावी. 

Image: Google

2. फेस टॅपिंग

चेहरा आणि मानेवरची चरबी कमी करुन चेहरा सतेज दिसण्यासाठी फेस टॅपिंग ( चेहेरा आणि मानेवर बोटं नाचवत मसाज करणं)या योग मुद्रा सरावाचा फायदा होतो. चेहरा दीर्घकाळ तरुण ठेवण्यासाठी फेस टॅपिंगचा उपयोग होतो. फेस टॅपिंगमुळे चेहऱ्याकडील रक्तप्रवाह सुधारतो त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही.  

फेस टॅपिंगसाठी जमिनीवर मांडी घालून ताठ बसावं. चेहरा समोर ठेवावा. तीन वेळा दीर्घ श्वसन करावं. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यासमोर आणावेत. मग कपाळापासून मानेवपर्यंत चेहऱ्यावर बोटं नाचवत कपाळापासून मानेपर्यंत मानेपासून कपाळापर्यंत मसाज करावा. असा मसाज किमान 5 वेळा करावा.

Image: Google

3 मत्स्य मुद्रा ( फिश पोज)

मत्स्य मुद्रा केल्यानं चेहऱ्यावरची चरबी वेगानं कमी होते. मत्स्य मुद्रा करताना चेहेरा आणि मानेचे स्नायू ताणले जातात. परफेक्ट जाॅलाइनसाठी मत्स्य मुद्रेचा उपयोग होतो. 

मत्स्य मुद्रा करण्यासाठी जमिनीवर मांडी घालून ताठ बसावं. चेहरा समोरच्या दिशेनं स्थिर ठेवावा. आधी थोडा वेळ दीर्घ श्वसन कराव. तोंडातील हवेचा उपयोग करुन  दोन्ही गाल आतल्या बाजूने आत खेचावे. नंतर मान वर करुन छताकडे पाहावं. अर्धा ते एक मिनिट चेहरा आणि मान त्याच स्थितीत ठेवावी. ही मुद्रा किमान 3 वेळा करावी. मान उंच, चेहरा बारीक आणि शार्प दिसण्यासाठी मलायका अरोरा सांगते त्या योगआसनातील तीन मुद्रा अवश्य करायला हव्यात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सयोगासने प्रकार व फायदेत्वचेची काळजी