गळणाऱ्या केसांवर तेल, शाम्पू, सिरम, पॅकचे कितीही उपाय केले तरी परिणाम होत नसतील तर निराश व्हायला होतं. खूप काही करुन थकल्यावर मग एखादा साधा उपायही नकोसा वाटतो. पण तज्ज्ञ म्हणतात केस गळणं थांबवायचं असेल तर केसांवर महागडी प्रोडक्टस वापरण्याची गरज नसते. योगासनातील 4 आसन केल्यास केस गळणं थांबतं.
Image: Google
केस गळती थांबवणारी आसनं
तज्ज्ञ म्हणतात की केस गळण्याची समस्या केवळ हेअर पोडक्टस वापरुन सुटत नाही. संतुलित आहार, व्यायामाचा अभाव यामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळेच केस कमजोर होवून गळायला लागतात. योग्य जीवनशैलीच्या आधारे ही समस्या सोडवता येते, त्यासाठी योगासनातील चार आसन नियमित स्वरुपात करणं फायदेशीर ठरतं.
Image: Google
1. पवनमुक्तासन
पोटातील वायूचा परिणाम केसांच्या मुळांवर होतो. तिथे कोरडेपणा निर्माण होवून केस कमजोर होतात आणि गळतात. यावर उपाय म्हणून पवनमुक्तासन करावं. या आसनामुळे पोटातील आणि आतड्यातील वायू बाहेर पडतो. हे आसन नियमित केल्यास केस गळणं थांबंतं.
पवनमुक्तासन करण्यासाठी पाठीवर झोपावं. दोन्ही पाय एकदम 90 अंशाच्या कोनात वर उचलावे. दोन्ही हात तोंडासमोर धरावे. नंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडावे. डोकं आणि पाठ उचलून दोन्ही हातांनी पायांना घट्ट मिठी मारावी. पाय छातीशी घट्ट धरावे. कपाळ गुडघ्यांवर टेकवावं. या स्थितीत अर्धा मिनिटं थांबावं. पाठ आणि डोकं जमिनीला टेकवावं. हातांनी घातलेली पायाची मीठी सोडवावी. दोन्ही हात तोंडासमोर ताठ धरावे आणि पाय पुन्हा 90 अंशावर आणावे. मग हळूवार हात आणि पाय जमिनीला टेकवावे. किमान दोन वेळा हे आसन करावं.
Image: Google
2. अधोमुख श्वानासन
केस गळती थांबवण्यासाठीचं सोपं योगासन म्हणजे अधोमुख श्वानासन. श्वानाप्रमाणे पुढे झुकून हे आसन करायचं असल्यानं त्याला श्वानासन असं म्हणतात.
श्वानासन करताना आधी ताठ उभं राहाव. दोन्ही पाय एकमेकांना जोडून ठेवावे. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर न्यावे. मग खाली वाकावं. दोन्ही हात पुढे नेवून जमिनीला टेकवावे. मान खाली झुकलेली असावी. श्वास सोडत कपाळ जमिनीला टेकवावं. या स्थितीत अर्धा मिनिटं थांबावं. पाय गुडघ्यात दुमडू नये. अर्धा मिनिटं शरीराची ही स्थिती ठेवावी. मग श्वास घेत सरळ उभं राहावं. थोडा विराम घेऊन पुन्हा श्वास सोडत खाली वाकून हे आसन करावं.
Image: Google
3. उत्थानासन
केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उत्थानासन फायदेशीर असतं. हे आसन नियमित केल्यानं केस गळती तर थांबतेच सोबतच चिंता, काळजी, भीती यासारख्या मानसिक समस्या दूर होतात. मन शांत होतं. अशांत मनामुळेही त्वचा आणि केसांशी निगडित समस्या निर्माण होतात.
हे आसन करताना ताठ उभं राहावं. दोन्ही हात डोक्याच्या वर सरळ न्यावेत. श्वास सोडत खाली वाकावं. कपाळ गुडघ्यांखाली पायांना टेकवावं. दोन्ही हातांनी मागचे पाय पकडावेत. जास्तीत जास्त खाली वाकण्याचा प्रयत्न करावा. हे आसन करताना पाय गुडघ्यात दुमडू नये. दोन्ही पाय एकमेकांच्या अगदी जवळ ठेवावेत. आसनादरम्यान तोल सांभाळावा. आसनाची स्थिती असताना श्वास रोखून न धरता मंद श्वसन सुरु ठेवावं. आसन सोडताना दीर्घ श्वास घेत ताठ उभं राहावं. किमान 5-6 वेळा हे आसन केल्यास त्याचा फायदा होतो.
Image: Google
4. वज्रासन
पचन व्यवस्था नीट काम करत असेल तर त्याचा फायदा आरोग्यासोबताच केसांसाठीही होतो. वज्रासन हे प्रामुख्याने पचन सुधारण्यासाठी परिणामकारक असतं म्हणूनच केसांचं आरोग्य चांगलं राहावं, पचन व्यवस्था बिघडून त्याचा परिणाम केस कमजोर होण्यावर होवू नये यासाठी नियमित वज्रासन करावं.
वज्रासन करताना जमिनीवर गुडघ्यांवर बसावं. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवावे. ताठ बसावं . वज्रासन करताना ध्यान मुद्रेत बसावं लागतं, यासाठी डोळे बंद करावेत. खांदे सरळ रेषेत असावेत. वज्रासन करताना शरीरावरील ताण काढून टाकून शरीर ढील सोडावं. पण पाठीत वाकून बसू नये. वज्रासनात पाठ ताठ असायला हवी. वज्रासन करताना श्वास रोखून न धरता मंद श्वसन करावं. एक मिनिटानंतर पाय सोडून बसावं. पुन्हा काही वेळ वज्रासनात बसावं.
वरील चार आसनांचा नियमित सराव केल्यास त्याचा फायदा आरोग्यावर होतो. आरोग्य सुधारत आणि केस गळती थांबून केस दाट होतात.