आपलं सौंदर्य जपण्यासाठी महिला प्रत्येक महिन्यात किमान एकदा तरी पार्लरमध्ये जाऊन ब्युटी ट्रीटमेंट्स घेतात. यामध्ये फेशियल, फेस क्लीनअप, हेअर स्पा, थ्रेडींग, वॅक्सिंग, अप्पर लिप्स यांसारख्या ट्रिटमेंट्सचा समावेश असतो. इतकेच नव्हे तर चेहेऱ्यासोबतच हातापायांची सुंदरता देखील तितकीच महत्वाची असते. हातापायांची सुंदरता वाढवण्यासाठी मेनिक्युअर, पेडिक्युअर तर आपण आवर्जून करतोच. हातांचे आणि नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मेनिक्युअर, करतात तर चेहऱ्यासारखीच पायांची काळजी घेणेसुद्धा खूप महत्वाचे आहे म्हणून पायांचे पेडिक्युअर करतात. बदलत्या काळानुसार मेनिक्युअर आणि पेडिक्युअरचे असंख्य नवीन प्रकार पार्लरमध्ये सहज उपलब्ध असतात. परंतु वारंवार मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करणे शरीरासाठी चांगले आहे की वाईट? यावर तज्ज्ञ काय सांगतात. त्याचा आढावा घेऊया(Are gel manicures safe? What to know about skin cancer risk to hands and nails).
जेल मेनिक्युअर म्हणजे नेमकं काय? जेल मेनिक्युअर हा मेनिक्युअरचाच एक महत्वाचा प्रकार आहे. बेसिक मेनिक्युअरमध्ये, नखांना शेप दिला जातो. त्यानंतर हातांना क्रिम लावून मसाज केला जातो. मग गरम पाण्यांत हातांची व्यवस्थित सफाई करून सगळ्यांत शेवटी नखांना नेलपेंट लावले जाते. जेल मेनिक्युअर करताना हातांना मॉइश्चराइजर, स्क्रबिंग, मसाज तर केला जातोच पण यासोबतच जेल नेलपेंटचा वापर केला जातो. बहुतेक मोठ्या पार्लरमध्ये नखांना पॉलिश करण्यासाठी अल्ट्रा वॉयलेट लॅम्पचा (Ultraviolet Lamp) वापर केला जातो. जेल मेनिक्युअर करून नखांना पूर्णपणे सेट होण्यासाठी आपला हात काही काळासाठी अल्ट्रा वॉयलेट लॅम्पमध्ये ठेवला जातो. जेल मेनिक्युअर आपल्या नखांना चमकदार बनवून नेलपेंट जास्त काळ नखांवर टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात.
शरीरातील डीएनए (DNA) साठी अपायकारक ठरून होऊ शकतो कॅन्सरचा धोका...
मोठमोठ्या पार्लरमध्ये केल्या जाणाऱ्या मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरसाठी अल्ट्रा वॉयलेट लॅम्पचा (Ultraviolet Lamp) वापर केला जातो. या अल्ट्रा वॉयलेट लॅम्पमधून मोठ्या प्रमाणांत यू व्ही (UV) रेज बाहेर फेकले जातात. या यू व्ही (UV) रेजमुळे आपल्या त्वचेतील पेशींमध्ये बिघाड होऊन हळुहळु त्या नष्ट होऊ लागत. तसेच या यू व्ही (UV) रेजच्या अतिवापरामुळे शरीरातील डीएनए (DNA) मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बिघाड होतो.
नेचर कम्युनिकेशन जर्नल (Nature Communications Journal) यांनी केलेल्या अध्ययनातून सिद्ध झाले की, जेल मॅनिक्युअर करताना आपल्या हातांवर विशिष्ट प्रकारच्या जेलचा भरपूर वापर केला जातो. त्याचप्रमाणे आपण जे नेलपेंट लावतो ते दिर्घकाळ टिकून राहून नखांना पॉलिश केल्यासारखे दिसावे म्हणून जेलचा भडीमार करून ते नेलपॉलिश ड्रायर लॅम्प मध्ये (Nail Polish Dryer Lamp) सुकवले जाते. परंतु असे करत असताना या नेलपॉलिश ड्रायर लॅम्पमधून यू व्ही (UV) रेज बाहेर फेकले जातात. आणि हे यू व्ही (UV) रेज आपल्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकतात.
किती काळात किती टक्के पेशी नष्ट होतात...
आपण पार्लरमध्ये गेल्यावर मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करतो. हे करून झाल्यावर आपली नख व्यवस्थित सेट होण्यासाठी आपला हात,पाय नेलपॉलिश ड्रायर लॅम्पमध्ये (Nail Polish Dryer Lamp) ठेवले जातात. साधारणतः २० मिनिटे आपण आपला हात या लॅम्पमध्ये ठेवल्यास त्वचेमधील २०% ते ३०% पेशी नष्ट होतात. जर का आपण पुढील प्रत्येकी एका महिन्यात एक असे ३ सेशन साधारणतः २० मिनिटांचे केल्यास जवळपास ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत त्वचेमधील पेशी नष्ट होण्याचा धोका संभवतो.
तज्ज्ञ काय सांगतात...
या अभ्यासाचे जनक लुडमिल अलेक्झांड्रोव्ह (Ludmil Alexandrov) सांगतात, "नेलपॉलिश ड्रायर लॅम्प किंवा यांसारखी वेगवेगळी सौंदर्य प्रसाधन करणारी उपकरणे आपल्यासमोर अशा प्रकारे सादर केली जातात की जणू काही ती आपल्यासाठी सुरक्षित आहेत. या उपकरणांचा वापर आपल्या शरीरावर असा केला जातो जसे काही आपल्याला काळजी करण्याची गरजच नाही किंवा हे साधन आपल्या शरीरासाठी हानीकारक नसून उपयुक्त आहे. परंतु आमच्या अभ्यासानुसार, या उपकरणांचा आणि या उपकरणांमुळे आपल्या शरीरावर होण्याऱ्या अपायकारक गोष्टींचा अद्याप कुणीही अभ्यास केलेला नाही." याचप्रमाणे अभ्यासकांचे असे म्हणणे आहे की, आम्ही केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष आणि काही जुन्या अभ्यासांचे पुरावे असे दर्शवितात की, नेलपॉलिश ड्रायर लॅम्पमधून बाहेर पडणाऱ्या यू व्ही (UV) रेडिएशनमुळे आपल्याला हातांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
नेलपॉलिश ड्रायर लॅम्पचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी?
१. सनस्क्रीनचा वापर करा - जेव्हा आपण पार्लरमध्ये नेलपॉलिश ड्रायर लॅम्पचा वापर करता तेव्हा आपल्या हातापायांच्या बोटांना सनस्क्रीन जरूर लावा.
२. यू व्ही प्रतिबंधित ग्लोव्हज - नेलपॉलिश ड्रायर लॅम्पचा वापर करण्याआधी यू व्ही रेडिएशन प्रतिबंधित ग्लोव्हज घालायला विसरु नका.
३. व्हिटॅमिन 'सी' व अँटिऑक्सिडंटयुक्त सिरम - पार्लरमध्ये नेलपॉलिश ड्रायर लॅम्पचा वापर करण्याआधी व्हिटॅमिन 'सी' व अँटिऑक्सिडंटयुक्त सिरमने हातापायांना मालिश करण्यास विसरु नका.
४. डर्माटॉलॉजिस्टचा सल्ला घ्या - वारंवार नेलपॉलिश ड्रायर लॅम्पचा वापर करून जर आपल्या त्वचेला इजा किंवा काही दुखापत झाली असल्यास सर्वप्रथम एखाद्या चांगल्या डर्माटॉलॉजिस्टचा सल्ला घ्या.