Join us  

ब्लीच केल्यावर ४ चुका अजिबात करु नका! नाहीतर चेहऱ्याची लागेल वाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 1:01 PM

चेहरा चांगला दिसावा असे वाटत असेल तर काही बेसिक गोष्टींची काळजी घ्यायला हवी

ठळक मुद्देब्लीचमुळे चेहरा उजळ दिसत असला तरी त्यानंतर काही चुका आवर्जून टाळायला हव्यात सौंदर्या वाढवत असताना त्याबाबत निष्काळजीपणा झाल्यास ठरु शकतो घातक

चेहऱ्यावर केस असण्याची समस्या सध्या अनेक तरुणींना भेडसावते. मग कधी ऑफीस मिटींग म्हणून, तर कधी लग्नकार्य, सणवार यांसारख्या निमित्ताने आपण ब्लीच करण्याचा पर्याय स्वीकारतो. चेहऱ्यावर जास्तच केस असतील तर नियमितपणे ब्लीच करणाऱ्याही बऱ्याच तरुणी आहेत. अनेकदा ब्लीच लावल्यावर चेहऱ्याची आग होणे, चेहऱ्यावर बारीक फोड येणे, त्वचेला खाजल्यासारखे किंवा चुरचुरल्यासारखे होणे अशा समस्या उद्भवतात. ब्लीच केल्याने चेहऱ्यावर असलेले काळे केस सोनेरी होतात आणि त्यामुळे चेहरा आपोआपच उजळ दिसण्यास मदत होते. हल्ली घरच्या घरी ब्लीच करण्याच्याही बऱ्याच पद्धती आणि उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. अशाप्रकारे तुम्हीही घरच्या घरी ब्लीच करत असाल तर खालील चुका अजिबात करुन नका, नाहीतर चेहऱ्याची वाट लागेल.

(Image : Google)

१. उन्हात जाणे 

ब्लीच केल्यावर चेहरा उजळ दिसत असला तरी त्याचा त्वचेवर परीणाम होतो. त्यावर ऊन लागल्यास त्वचेला आणखी जास्त त्रास होण्याची शक्यता असते. सनबर्न होणे, त्वचा लाल होणे, खाज येणे या समस्या ऊन्हामुळे आणखी वाढू शकतात. त्यामुळे ब्लीच केल्या केल्या उन्हात गेल्यास त्याचा त्वचेला त्रास होत असल्याने लगेचच उन्हात जाणे टाळावे. ब्लीच केल्यानंतर काही वेळ घरातच राहायला हवे. तसेच उन्हामुळे ब्लीचचा परिणाम कमी होऊन चेहऱ्यावरचे केस पूर्णपणे रंगले जात नाहीत. म्हणून तुम्हाला ब्लीच केल्यानंतर बाहेर जायचे असेल तर चेहरा पूर्णपणे झाकलेला राहील याची काळजी घ्या. तसेच चेहऱ्याला सनस्क्रीन लावा. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होईल. 

२. फेसवॉश वापरणे 

ब्लीच केल्या केल्या फेसवॉश वापरणे त्वचेसाठी घातक ठरु शकते. फेसवॉशमधील रासायनिक पदार्थ आणि ब्लीच यांचा एकमेकांशी संबंध आला तर ते घातक ठरु शकते. त्यामुळे ब्लीच केल्यानंतर ७ ते ८ तास तरी फेसवॉश वापरु नका. तसेच ब्लीच काढण्यासाठी गार पाण्याचा वापर करा. ब्लीच काढण्यासाठी गरम पाणी वापरले तर रॅशेसची समस्या आणखी वाढू शकते. थंडीच्या दिवसांत किंवा एरवीही चेहऱ्याला गार पाणी लावणे तुम्हाला नको असेल तर वाइप्सच्या साह्याने हे ब्लीच काढणे केव्हाही चांगले. 

३. स्क्रबिंग करणे

चेहऱ्यावरील डेड स्कीन आणि ब्लॅकहेडस काढण्यासाठी आपण स्कीनकेअर रुटीनमध्ये नियमितपणे स्क्रबचा वापर करतो. त्यामुळे ब्लीच करण्याआधी तुम्ही स्क्रब वापरु शकता. मात्र ब्लीच झाल्यावर स्क्रब केल्यास चेहऱ्याला खाज येऊ शकते, तसेच काहींना रॅशेसही येऊ शकतात. थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी झालेली असते. अशावेळी स्क्रबमुळे ती आणखी कोरडी होऊ शकते. तसेच  चेहऱ्यावर कुठे एखादी जखम किंवा चीर पडली असल्यास ब्लीच करायची चूक अजिबात करु नका, त्याने चेहऱ्याला जास्त त्रास होऊ शकतो. 

(Image : Google)

४. ब्लीचनंतर थ्रेडींग करणे

ब्लीच झाल्यावर आयब्रोज किंवा अप्पर लिप्स याठिकाणचे थ्रेडींग करण्याची चूक काही जण करतात. मात्र त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. ज्यांची त्वचा जास्त सेन्सिटीव्ह आहे अशांनी ब्लीचनंतर थ्रेडींग केल्यास चेहऱ्यावर लाल रंगाचे फोड येण्याची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच ब्लीच करायच्या काही तास आधी किंवा काही दिवस आधी थ्रेडींग करायला हवे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी