सौंदऱ्याच्या बाबतीत आपण चेहऱ्याची खूप काळजी घेतो, पण हात, पाय, मान येथील त्वचेची काळजी घेतोच असे नाही. उन्हाळ्यात तर त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण कडक सूर्यप्रकाश आणि घाम यांमुळे त्वचा काळी पडू लागते. चेहऱ्याला टॅन होण्यापासून वाचवण्यासाठी आपण सर्व प्रकारचे उपाय करत असलो तरी मानेभोवतीची त्वचा काळी पडण्याकडे दुर्लक्ष करतो. याशिवाय उन्हाळ्यात गरम होत असल्याने आपण डीपनेक, स्लिव्ह्जलेस कपडे वापरतो. अशावेळी आपली मान खूप काळी असेल तर ते वाईट दिसते. अनेकदा मान काळी पडण्यामागे काही वैद्यकीय कारणेही असू शकतात. ही कारणे शोधणे आणि त्यानुसार योग्य ते उपचार करणे गरजेचे असते. यासाठीच प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल पंथ काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करतात. यामध्ये त्या मान काळी पडू नये यासाठी काय करावं आणि काय करु नये यासाठी काही टिप्स देतात. त्या कोणत्या पाहूया (Do’s And Don'ts For Dark Neck).
काय टाळायला हवे?
१. अनेकांना झोपताना चेन, मंगळसूत्र, नेकलेस असे कायम घालून झोपण्याची सवय असते. पण झोपेत मानेवर याचे घर्षण होते आणि मान जास्त काळी पडते.
२. मान काळी झाली म्हणून अनेकदा आपण ती जोरजोरात घासतो. पण असे केल्याने मानेचा काळेपणा कमी होण्याऐवजी तो जास्त वाढतो. सामान्यपणे त्वचेचा काळेपणा हा सूर्यप्रकाश किंवा जाड त्वचेमुळे आलेला असतो. अशाप्रकारे घासल्याने तो वाढण्याची शक्यता जास्त असते.
३. जास्त ताठ आणि स्टार्च केलेल्या कॉलरचा शर्ट घालू नका. अशाप्रकारची कॉलर मानेला घासली जाऊन ती काळी पडण्याची शक्यता असते.
उपाय काय?
१. उन्हात जाताना मानेला न विसरता सनस्क्रीन लावण्याची आवश्यकता असते. अनेकदा आपण चेहऱ्याला आणि मानेच्या पुढच्या भागाला सनस्क्रीन लावतो. पण मानेच्या मागच्या भागाला सनस्क्रीन लावायला आपण विसरतो. पण असे न करता मानेच्या मागच्या भागालाही भरपूर सनस्क्रीन लावावे.
२. रात्री झोपताना मानेला ग्लायकोलिक अॅसिड क्रीम लावावे. त्वचेचे एक्सपॉलिएशन झाल्यास त्वचेचा काळेपणा कमी होण्यास मदत होते. झोपताना मानेला न विसरता हे क्रिम लावावे आणि त्यावर मॉईश्चरायजर लावावे.
३. नियमित व्यायाम करणे अतिशय गरजेचे असते. यामुळे इन्शुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते आणि मानेच्या मागच्या भागातील त्वचेची जाडी कमी होण्यास मदत होते.
४. आपला बॉडी मास इंडेक्स २५ पेक्षा कमी ठेवायला हवा. वजन जास्त असल्याने मान काळी पडण्याची शक्यता असते. वजन जास्त असेल तर मानेचा भाग एकमेकांना घासला जातो आणि मान लवकर काळी पडते.