उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्यापैकी अनेकांना खूप घाम येतो. हा घाम बराचवेळ अंगावर तसाच राहिला तर त्याचा वास यायला लागतो. अशावेळी आपण ऑफिसमध्ये, एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये किंवा कार्यक्रमात असू तर हा वास आजूबाजूच्या लोकांना त्रासदायक ठरू शकतो. आपल्या घामाचा वास आपल्याला येतोच असे नाही पण इतरांना मात्र हा वास अगदी पटकन येतो. यासाठीच उन्हाळ्याच्या दिवसांत आपण आवर्जून अंगावर परफ्यूम, डिओड्रंट मारतो. अत्तर हाही पारंपरिक प्रकार अनेक जण आवर्जून वापरतात (Do's and Don'ts Of Perfume Application).
घाईघाईत घराबाहेर पडताना आपण परफ्यूम मारतो, पण तो मारण्याची योग्य पद्धत माहीत नसेल तर काही वेळातच त्याचा वास निघून जातो. त्यामुळे कितीही महागाचा परफ्यूम आणला तरी त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. यामुळे परफ्यूम तर वाया जातोच पण त्याचा वासही जास्त वेळ राहत नाही. अशावेळी परफ्यूम मारताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. प्रसिद्ध फॅशन एक्स्पर्ट शिल्पा तोलानी यांनी यासंबंधी काही टीप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे आपला परफ्यूम वाया जाणार नाही आणि अंगाला बराच काळ वासही टिकून राहील. या टीप्स कोणत्या ते पाहूया...
काय टाळावे
१. त्वचेवर थेट परफ्यूम मारू नये, यामुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते.
२. एका हातावर परफ्यूम मारल्यावर तो हात दुसऱ्या हातावर किंवा इतर कोणत्याही भागावर चोळू नये. अत्तर लावल्यावर आपल्याला असे करायची सवय असते, मात्र परफ्यूमच्या बाबतीत तसे करणे योग्य नाही.
काय करायला हवे?
१. आपल्याला ज्याठिकाणी परफ्यूम मारायचा आहे तिथे आधी मॉइश्चरायजर लावावे. यामुळे परफ्यूममधील रासायनिक घटकांची शरीरावर रिअॅक्शन येत नाही.
२. कानामागे आणि गळ्यावर, मनगट, छाती याठिकाणी परफ्यूम मारू शकतो.
३. केसांवर थोडे अंतर ठेऊन परफ्यूम मारायला हरकत नाही
४. काखेत, दंडावर आणि गुडघ्याच्या मागच्या बाजूला परफ्यूम मारला तरी चालतो. याठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात घाम येत असल्याने या जागांवर वास येण्याची शक्यता असते.