Highlights सेल्फी घेताना ज्याप्रमाणे आपण दोन्ही गाल आत घेऊन तोंडाचा चंबू करतो तसा चेहेरा करावा.दुहेरी हनुवटी कमी करण्यासाठी पाण्याच्या ऐवजी तोंडात हवेची गुळणी धरावी. दुहेरी हनुवटीसोबतच थकवा घालवण्याचा एक पर्याय म्हणजे सिंह मुद्रा.
दुहेरी हनुवटी अर्थात डबल चिन ही समस्या अनेकजणींच्या सौंदर्यात अडसर ठरते. अनेकजणींची शरीरयष्टी मध्यम असते पण चेहेरा मोठा असतो. तर काहीजणी सडपातळ असूनही दुहेरी हनुवटीच्या समस्येनं चेहेरा मोठा दिसतो.
गळ्याजवळील स्नायुंना रक्त पुरवठा कमी होते त्यामुळे दुहेरी हनुवटीची समस्या उद्भवते. येथील रक्त प्रवाह सुधारला की समस्या दूर होते
योगसाधनेत शरीराच्या प्रत्येक अवयवासाठीचे व्यायाम आहेत. दुहेरी हनुवटीसाठीही फेशिअल योग करुन ही समस्या दूर करता येते.
दुहेरी हनुवटी कमी करण्यासाठी
- सेल्फी घेताना ज्याप्रमाणे आपण दोन्ही गाल आत घेऊन तोंडाचा चंबू करतो तसा चेहेरा करावा. तीस सेकंद चेहेरा याच स्थितीत ठेवावा. नंतर सामान्य स्थितीत यावं. काही सेकंद आराम करावा. तीन ते चार वेळा चेहेर्याची ही स्थिती करावी.
- दुहेरी हनुवटी आणि चेहेर्यावरची चरबी कमी करण्यासाठी हनुवटी वर करावी. छताकडे बघावं. दहा पंधरा सेकंद तोंड उघड बंद करावं. नंतर चेहेरा सामान्य स्थितीत आणावा. चेहेर्यावरची चरबी कमी करण्यासाठी ही क्रिया तीन ते चार वेळा करावी.
- तोंडात पाणी घेऊन ते तोंडातल्या तोंडात फिरवणं, गुळणी धरुन गाल फुगवणं या क्रिया आपल्याला माहिती आहेत. दुहेरी हनुवटी कमी करण्यासाठी पाण्याच्या ऐवजी तोंडात हवेची गुळणी धरावी. हवा तोंडात भरुन गाल फुगवावे. तोंडातली हवा डावीकडून उजवीकडे अन उजवीकडून डावीकडे न्यावी. तोंडात हवा धरुन गाल फुगवावे. वीस ते तीस सेकंद हा व्यायाम करावा. मग श्वास सोडावा. थोडा आराम करावा. ही क्रिया किमान तीन ते चार वेळा करावी.
- दुहेरी हनुवटीसोबतच थकवा घालवण्याचा एक पर्याय म्हणजे सिंह मुद्रा. त्यासाठी आधी वज्रासनात बसावं. दोन्ही हात मांडीवर ठेवावेत. पाठ सरळ ठेवावी. मग जीभ पूर्ण बाहेर काढावी. शक्य तितकी जीभ बाहेर ताणावी. जीभ बाहेर ताणताना स्नायुवर दबाव यायला नको याची काळजी घ्यावी. दीर्घ श्वास घेऊन तोंडाने जोरात आवाज करावा. ही क्रिया सहा ते सात वेळा करावी.