Join us  

 मऊ,चमकदार,लांबसडक  दाट  केस हवेत? मग बीअरने धुवा, शिकून घ्या नेमकी पध्दत ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2021 5:42 PM

बॉलीवूडमधील अभिनेत्री, टी.व्ही वाहिन्यांवरील कलाकार आपले केस सुंदर करण्यासाठी बीअरचा वापर करतात. गेल्या काही वर्षांपासून केसांच्या सौंदर्यासाठी बीअरचा वापर करणं वाढलंय. याचं कारण म्हणजे बीअरमुळे केसांना मिळणारे विविध फायदे. हे फायदे काय? केसांना बीअर लावायची पण नेमकी कशी?

ठळक मुद्देबीअर ही माल्टपासून बनवलेली असते. माल्टमुळ केसांना चमक येते. शाम्पू- कंडिशनरद्वारे जो आत्यंतिक रसायनांचा वापर होऊन केस खराब झालेले असतात ते केस नीट करण्याचं काम बीअरमधील घटक करतात.बीअरमधे प्रथिनं असतात. केसांसाठी प्रथिनं हा घटक महत्त्वाचा असतो.

  केसाचं सौंदर्य हा प्रत्येकीचा जिव्हाळ्याचा विषय असतो. पातळ, तेलकट दिसणारे केस कोणालाच नको असतात. लांब केस हे तर अनेकींचं ध्येय असतं पण ज्या केस छोटे ठेवतात त्यांनाही आपले केस सुंदर आणि दाट ,चमकणारे हवे असतात. केसांना असं सौंदर्य प्राप्त करुन देऊ शकणार्‍या अशा जादूई घटकाचा शोध आपण नेहेमीच घेत असतो. या शोधात सापडणारा असाच एक जादूई घटक म्हणजे बीअर. बॉलीवूडमधील अभिनेत्री, टी.व्ही वाहिन्यांवरील कलाकार आपले केस सुंदर करण्यासाठी बीअरचा वापर करतात. गेल्या काही वर्षांपासून केसांच्या सौंदर्यासाठी बीअरचा वापर करणं वाढलंय. याचं कारण म्हणजे बीअरमुळे केसांना मिळणारे विविध फायदे.

 

 

बीअरमुळे केसांना मिळणारे फायदे

  1.  बीअरमधील बुडबुडे हे केवळ शोभेसाठी नसतात. बीअर ही माल्टपासून बनवलेली असते. माल्टमुळे केसांना चमक येते. जर केस हे खराब आणि निजिर्व झाल्यासारखे दिसत असतील किंवा केस अगदीच चिपकू चिपकू दिसत असतील तर त्यांना झुळझुळीत करण्यासाठी बीअरचा हेअर मास्क लावावा. त्यासाठी थोडी बीअर, थोडं पाणी आणि ऑलिव्ह ऑइल घ्यावं. हे मिश्रण केसांना व्यवस्थित हलका मसाज करत लावावं. या उपायाने आपल्याला हवी असलेली चमक केसांना मिळते.
  2.  बीअरमधे सक्रीय यिस्ट असतो. जो केसांना भरीवपणा देते. त्यामुळे केस बसलेले चिपकू न दिसता मस्त मोकळे आणि पसरट दिसतात. केस धुताना बीअर वापरली तर केसांमधला चिकटपणा निघून जातो.
  3.  बीअरमधे प्रथिनं असतात. केसांसाठी प्रथिनं हा घटक महत्त्वाचा असतो. केसांवर शाम्पू- कंडिशनरद्वारे जो आत्यंतिक रसायनांचा वापर होऊन केस खराब झालेले असतात ते केस नीट करण्याचं काम बीअरमधील घटक करतात. बीअरनं केस धुतल्यास केसांची मुळं पक्की होतात. बीअरमुळे संथगतीने केसांचं पोषण होत राहातं. या पोषणानं केस मुळाशी घट्ट होतात. गळत नाही.
  4. बीअर होप, यीस्ट आणि माल्ट या घटकांपासून तयार झालेली असते. त्यामुळे बीअरमधे ब12 हे जीवनसत्त्वं, तांबं, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, लोह आणि अँण्टिऑक्सिडण्टस असतात. बीअरमधील हे पोषक घटकांचं मिश्रण केस वाढण्यास प्रोत्साहन देतं. बीअरमुळे केवळ रक्ताची हालचालच वेगवान होते असं नाही तर केसांच्य मुळाशी, टाळूशी केसांचा रक्त प्रवाह सुधारतो. आणी केस वाढतात.
  5.  बीअरमधे अँसिड युक्त पीएच हा घटक असतो. जो केसांच्या मुळांशी असलेला अतिरिक्त तेलकटपणा कमी करतो. बीअरमधील हा घटक केसांच्या मुळांशी होणारी तेल निर्मितीवर नियंत्रण ठेवतो आणि केसाच्या मुळाशी असलेले सर्व दूषित घटक बाहेर टाकण्यास मदत करतो.
  6. बीअरमधे क्लीन्जिग घटक असतात. थोडी बुडबुडे असलेली बीअर ही सौम्य प्रकारच्या शाम्पूत चांगली एकत्र करावी. आणि हे मिश्रण केस स्वच्छ करण्यासाठी वापरावं. बीअर ही केसांसाठी उग्र परिणामांची ठरत नाही. उलट केसांच्या मुळाशी निर्माण होणार्‍या तेलाचं नियंत्रण करतं. केस धुण्यासाठी नियमित बीअर वापरली तर पुढे असं लक्षात येईल की आता केसांना शाम्पू लावण्याचीही गरज राहिलेली नाही.
  7. बीअरमुळे केस राठ, गोठल्यासारखे होत नाही. जर आपले केस राठ असतील तर एक फ्लॅट बीअर ( त्यातला गॅस उडून बीअर खाली बसली की तिला फ्लॅट बीअर असं म्हणतात.) गरम करावी त्यात थोडं ऑलिव्ह ऑइल घालावं. केसांना शाम्पू केल्यानंतर केमिकल युक्त कंडिशनर वापरण्याऐवजी केसांवर बीअर आणि ऑलिव्ह ऑइलचं मिश्रण टाकावं. यामुळे केस छान मऊ होतात.

 

 

केसांसाठी बीअर कशी वापराल?

* सर्वात आधी बीअर  बाटलीतून एका मगमधे ओतून घ्यावी. ती रात्रभर तशीच ठेवावी. यामुळे तिच्यातला सर्व गॅस निघून जातो आणि बीअर फ्लॅट होते. केसांना आधी शाम्पू लावून तो धुवून घ्यावा. जर केस तेलकट असतील तर केसांसाठी कंडीशनर वापरु नये. त्यापेक्षा मगाभर ही फ्लॅट बीअर ओतवी. मग बोटांनी केसांच्या मुळाशी आणि केसांना बोटानं हलका मसाज करावा. 15 मिनिटं थांबावं. नंतर केस थंड पाण्यानं धुवावेत. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास केस स्वच्छ राहातात. केसांच्या मुळाशी असलेली पीएचची पातळी संतुलित राखली जाते. आपल्या केसांमधे जे छेद गेलेले असतात ते बुजवून केसांना चमक आणण्याचं काम बीअर करते.

* केसांसाठी बीअर वापरण्याची आणखी एक पध्दत आहे. एका भांड्यात दिड कपबीअरउकळावी. उकळल्यानंतर बीअर निम्मी झाली की गॅस बंद करुन ती थंड होवू द्यावी. . एक कप शाम्पूमधे ही आटवलेली बीअर घालून ती एकत्र करावी. केस धुताना आधी पाण्यानं केस ओले करावेत . मग बीअर शाम्पूचं मिश्रण केसांना लावावं. आणि जोपर्यंत फेस होत नाही तोपर्यंत ते केसात हलक्या हातानं घासावं. नंतर केस थंड पाण्यानं धुवावेत. आठवड्यातून दोन तीन वेळा केसांवर बीअरचा असा उपयोग करावा. थंड पाण्यानं केस धुतल्यानं केसात बीअर राहिल याची चिंता करु नका. जरी बीअर थोडी केसात राहिली तरी तिचा केसांना फायदाच होतो नुकसान होत नाही. याचा वापर आठवड्यातून एकदा फारतर दोनदा करावा. कारण अति प्रमाणात ते वापरलं तर केसांच्या मुळाशी कोरडेपणा येतो आणि डोक्यात कोंडा होतो.