ऋतू बदलला की त्याचा आपल्या शरीरावर परीणाम होतो. थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारठ्यामुळे एकीकडे थंडी वाजत असतानाच हवेतील कोरडेपणामुळे त्वचा, केस कोरडे पडतात. खरखरीत झालेल्या कोरड्या केसांचे काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. ऑफीसल किंवा अगदी एखाद्या कामासाठी बाहेर जाताना केस विंचरले की कोरडेपणामुळे ते एकतर खूप गळत असतात नाहीतर त्यांचा झाडू झाल्यासारखे वाटत असते. आता बाहेर जाताना असे केस घेऊन कसे जाणार, रोजच्या रोज ते धुणेही शक्य नाही. हेइर स्पासाठी सतत पैसे घालवणे शक्य नसते. अशावेळी थंडीच्या दिवसांत केस मुलायम कसे ठेवायचे यासाठी काही सोप्या टिप्स पाहूयात...
१. थंडीच्या दिवसांत बाहेर जाताना तुम्ही लोकरीची टोपी किंवा स्कार्फ वापरत असाल तर त्याला आतून कॉटनचे कापड असेल याची काळजी घ्या. लोकरीसोबत केसांचे घर्षण होते आणि ते आहेत त्यापेक्षा आणखी कोरडे होतात.
२. रात्री झोपताना केसांची न विसरता वेणी घाला. त्यानंतर केसांना सुती कपड्याने बांधून ठेवा. अशाप्रकारे केसांना कापड बांधणे तुम्हाला सोयीचे वाटत नसेल तर अंगावर एक कॉटनची सुती चादर घ्या त्यानंतर रजई घ्या. कारण रजईच्या कापडामुळे केस आणखी खरखरीत होण्याची शक्यता असते.
३. सीरम हे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. आपण केस धुताना नियमितपणे शाम्पू आणि कंडिशनर लावतो. पण सीरमबाबत एकतर आपल्याला पुरेशी माहिती नसते किंवा आपण ते लावायचा कंटाळा करतो. ओल्या केसांवर लावण्यासाठी ज्याप्रमाणे सीरम उपयुक्त असते. त्याचप्रमाणे रात्री झोपताना केसांना सीरम लावल्याने केस मुलायम होण्यास मदत होते.
४. थंडीच्या दिवसांत बाहेर गारठा असल्याने आपल्याला अंगावर आणि केसांवर जास्तीत जास्त गरम पाणी घ्यावेसे वाटते. पण अशाप्रकारे कडक पाण्याने केस धुतल्यास केस जास्त रुक्ष होतात. त्यामुळे अंगावर जास्त गरम पाणी घेत असाल तरीही केसांसाठी कोमट पाणी वापरणे केव्हाही चांगले.
५. अनेकदा घाईत आपण आंघोळीला गेल्यावर केस धुवायचे असे ठरवतो आणि केसांना शाम्पू, कंडीशनरने धुतो. पण असे केल्याने केसांचा कोरडेपणा वाढू शकतो. त्यामुळे आदल्या दिवशी रात्री किंवा किमान सकाळी उठल्यावर आंघोळीच्या दोन ते तीन तास आधी तेलाने मालिश करुन मगच केस धुवायला हवेत.
६. हेअर जेल ही स्टायलिंगसाठी वापरतात असा आपला गैरसमज असतो. मात्र हेअर जेलमुळे केस मुलायम होण्यास मदत होते. त्यामुळे केस धुतल्यानंतर ते सेट करण्यासाठी तसेच त्यातील आर्द्रता टिकून राहण्यासाठी हे्र जेलचा वापर करायला हवा.
७. थंडीत केस कोरडे झाले असतील तर ते प्लास्टिकच्या कंगव्याने विंचरण्यापेक्षा लाकडाच्या किंवा मेटलच्या कंगव्याने विंचरलेले जास्त चांगले. प्लास्टिकमुळे केस आणखी रखरखीत होण्याची शक्यता असते. तसेच थंडीत केसांत जास्त गुंता होत असल्याने लहान दातांच्या कंगव्यापेक्षा मोठ्या दातांचा कंगवा वापरावा. त्यामुळे केस कंगव्यात अडकून तुटत नाहीत.
८. केसांना वाफ देणे, कोमट पाण्याच्या सुती कापडाने केस बांधून ठेवणे, बाहेर जाताना केस कव्हर होतील याची काळजी घेणे अशा काही सोप्या उपायांनी आपले केस कोरडेपणापासून दूर राहू शकतात. मात्र या गोष्टी करायचा कंटाळा केल्यास आपल्याला केसांच्या कोरडेपणाचा सामना करावा लागतो.