Join us  

निस्तेज चेहऱ्यावर झटपट येईल चमक, करा दह्याचं इस्टंट ग्लो फेशियल! तजेला देणारा नॅचरल उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 5:24 PM

कोमेजलेल्या चेहऱ्यावर करा दह्याचं इस्टंट ग्लो फेशियल; झटपट तजेला आणणारा नॅचरल उपाय

ठळक मुद्देचेहरा सुरक्षितरित्या झटपट चमकवण्यासाठी दह्याचं फेशियल उपयुक्त ठरतं.दह्याच्या फेशियमध्ये दह्यातील लॅक्टिक ॲसिडचे चांगले परिणाम चेहऱ्यावर दिसतात. 

त्वचेवर इंस्टट ग्लो आणणाऱ्या अनेक ब्यूटी प्रोडटक्सच्या जाहिरातींकडे लक्ष आकर्षित होतं. वेळेच्याअभावी झटपट परिणाम देणारी सौंदर्य उत्पादनं वापरावीशी वाटतात.  पण इंस्टट ग्लोचा वायदा करणाऱ्या या सौंदर्य उत्पादनात ब्लीचसारख्या घटकांचा वापर केलेला असतो. यामुळे चेहरा स्वच्छ झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे चमकही येते. पण काहीच दिवसात चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात. त्यामुळे हे इंस्टंट ब्यूटीचे वायदे कसे क्षणिक निघतात याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. पण यामुळे निराश होण्याची गरज नाही. किमान या असल्या अनुभवामुळेच सौंदर्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर करण्याची गरज निर्माण होते, वाढते.  चेहऱ्यावर झटपट ग्लो हा केमिकल्सयुक्त ब्यूटी प्रोडक्टसचा वायदा तकलादू असला तरी नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास तो प्रत्यक्षात आणता येतो तोही चेहऱ्याच्या त्वचेला कोणतीही हानी न पोहोचवता. चेहरा सुरक्षितरित्या झटपट चमकवण्यासाठी दह्याचं फेशियल उपयुक्त ठरतं. 

Image: Google

दह्याचं फेशियल करताना

1. दह्याचं फेशियल करताना आधी चेहरा क्लीन्जरनं  स्वच्छ करावा लागतो. यासाठी दह्याचा वापर करावा. एक चमचा दह्यात अर्धा चमचा कोरफड जेल घालून दोन्ही एकजीव करावं. हे मिश्रण चेहऱ्यावर मसाज करत लावावं. मसाज केल्यानंतर थोडा वेळ थांबून नंतर चेहरा साध्या पाण्यानं स्वच्छ धुवावा.

2. चेहऱ्याचं स्क्रबिंग करण्यासाठी 2 चमचे दही आणि अर्धा चमचा तांदळाचं पीठ घ्यावं. ते व्यवस्थित मिसळून या मिश्रणानं चेहऱ्याला हलक्या हातानं मसाज  करत स्क्रबिंग करावं. 2-3 मिनिटं स्क्रब केल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

3. चेहरा स्क्रब केल्यानंतर चेहऱ्याला वाफ घ्यावी. स्टीमरनं किंवा पातेल्यात पाणी गरम करुन वाफ घ्यावी. किंवा सुती रुमाल गरम पाण्यात घालून पिळावा आणि तो रुमाल चेहऱ्यावर झाकून ठेवावा. असं 3-4 वेळा करुन चेहऱ्याला वाफ घेता येते. 

4. वाफ घेतल्यावर चेहऱ्याच्या त्वचेचा मसाज होणं आवश्यक . यासाठी अर्धा चमचा ताजी पिठी साखर आणि 2 चमचे दही घेऊन त्याचं मिश्रण करावं. हे मिश्रण चेहऱ्याला मसाज करत लावावं. या उपायामुळे त्वचेवरील ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स निघून जातात. मसाज केल्यानंतर चेहरा पाण्यानं धुवावा.

5. सर्वात शेवटी त्वचेला दह्याच्या फेशियलमुळे मिळालेले लाभ लाॅक करण्यासाठी चेहऱ्याला मस्क लावावा. यासाठी 4 चमचे दही, त्यात चिमूटभर हळद आणि थोडा कोरफडचा गर घालून मिश्रण एकजीव करावं. हे मिश्रण चेहऱ्याला लावून 20 मिनिटं ठेवावं आणि नंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Image: Google

दह्याचं फेशियल का करावं?

दह्याचं फेशियल करताना दह्यातील लॅक्टिक ॲसिडचा त्वचेला फायदा होतो. लॅक्टिक ॲसिडमुळे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होते. चेहऱ्यावरची सूज, दाह कमी होतो. नवीन त्वचा येण्यास चालना मिळते. चेहऱ्याच्या त्वचेरील मोठी रंध्रं छोटी होतात, मुरुम पुटकुळ्या कमी होतात, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात. उन्हामुळे चेहऱ्यावर येणारा काळपटपणा कमी होतो.  दह्याच्या फेशियलमुळे चेहऱ्याचं माॅश्चरायाजिंग होतं. मुरुम पुटकुळ्यांन अटकाव होतो. चेहऱ्याच्या त्वचेचा दाह कमी होतो. डोळ्याखालची काळी वर्तुळं कमी होतात. चेहऱ्यावरील वयाच्या खुण विरतात. दह्याच्या फेशियमुळे स्किनटोन सारखा होतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी