चेहऱ्याचे सौंदर्य आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचे असते. यामध्ये त्वचेच्या समस्या, पिंपल्स यांबरोबरच आणखी एक समस्या असते ती म्हणजे चेहऱ्यावर नको असणारे केस (Unwanted facial hair) . या केसांमुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते. कधी हे केस हनुवटीवर वाढतात तर कधी गालावर आणि कानाच्या बाजूलाही. त्यामुळे एकतर आपण आहोत त्यापेक्षा सावळे दिसतो. इतकेच नाही तर मेकअप करतानाही या केसांमुळे व्यवस्थितपणे मेकअप करता येत नाही. मग एकतर पार्लरमध्ये जाऊन व्हॅक्सिंग, थ्रेडींग किंवा ब्लिचसारख्या ट्रीटमेंट घ्याव्या लागतात. यासाठी लागणारा पैसा आणि वेळ जमवणे जिकरीचे काम. इतकेच नाही तर हल्ली लेझर उपचारांनीही चेहऱ्यावरचे हे अनावश्यक केस काढता येऊ शकतात (How to remove facial hair) . मात्र त्यासाठी येणारा खर्च प्रत्येकाला परवडेलच असे नाही. अशावेळी घरच्या घरी काही सोप्या उपायांनी (Home remedies) चेहऱ्यावरचे अनावश्यक केस काढता आले तर? नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या स्क्रबचा हे केस काढण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.
चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढण्याची कारणे
१. आनुवंशिकता २. हार्मोनसमध्ये सातत्याने होणारे बदल३. सतत व्हॅक्सिंग, थ्रेडींग यांसारखे उपचार४. गर्भनिरोधक औषधे५. मेनोपॉज
घरगुती उपाय
१. मध, साखर आणि लिंबाचा रस हे सगळे १ चमचा घ्या. चमच्याने हलवून हे मिश्रण एकजीव करा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर ज्याठिकाणी केस आहेत तिथे लावा. १५ ते २० मिनीटांनंतर हलक्या हाताने मसाज करुन हा पॅक काढा. मध चिकट असल्याने या पॅकसोबत केस निघून येण्यास मदत होईल. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा प्रयोग नक्की करु शकता.
२. बाजरीचे पीठ आणि लिंबू हे घटकही चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी उत्तम उपाय ठरु शकतात. एक चमचा बाजरीचे पीठ घेऊन त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला. यामध्ये आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून याची घट्टसर पेस्ट तयार करुन घ्या. चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांवर ही पेस्ट लावा आणि १५ ते २० मिनीटांनी वाळल्यावर हा पॅक हळूवारपणे काढण्याच प्रयत्न करा. चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास चेहऱ्यावरील केस निघून जाण्यास मदत होईल.
३. हरभरा डाळीच्या पीठात हळद आणि दूध एकत्र करा. हा पारंपारिक फेसपॅक चेहऱ्यावरील केस निघण्याबरोबरच चेहरा उजळवण्यासाठीही उपयुक्त ठरेल. हा पॅक चेहऱ्याला लावून २० मिनीटांसाठी तसाच ठेवा त्यानंतर हळूहळू हा पॅक काढा. हा पॅक काढताना चेहऱ्यावरचे नको असलेले केस निघून येण्यास मदत होईल.
४. चमचाभर मेथीच्या दाणे पाण्यात भिजत घाला. त्यानंतर त्याची मिक्सरवर पेस्ट तयार करुन ही पेस्ट चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर चेहऱा स्वच्छ धुवून टाका. त्यामुळे केस निघून जाण्यास मदत होऊ शकते. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय तुम्ही केल्यास चेहऱ्यावरचे केस निघून जाण्यास मदत होईल.
५. मक्याच्या पीठात साखर आणि अंडे एकत्र करा. त्याची पेस्ट चेहरा आणि हातांवर लावा. थोडा वेळ ठेऊन ही पेस्ट धुवून टाका. त्यामुळे चेहरा आणि हातावरचेही केस निघून जाण्यास मदत होईल.
टिप -
यातील कोणताही उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरु नका. त्यामुळे आपल्याला कोणती गोष्ट सूट होत नाही हे लक्षात येईल आणि तुमचे काम वाढण्याऐवजी सोपे होईल. तसेच एकावेळी एकच उपाय फॉलो करणे केव्हाही फायद्याचेच आहे.