Join us  

दिवाळी जवळ आली आणि केस चिकट-चिपचिपे-बेजान दिसतात? घरच्याघरी करा हेअर स्पा.. केस दिसतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 5:25 PM

Easy and Natural Steps of Hair Spa at Home : काही सोप्या स्टेप्स वापरुन आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन आपल्याला घरच्या घरी हेअर स्पा करता येऊ शकतो.

ठळक मुद्दे पार्लरमध्ये जायला वेळ नसल्याने ऐन सणाच्या दिवशी केसांचे काय करायचे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन आपण केसांचा पोत सुधारण्यासाठी नक्कीच मदत करु शकतो.

दिवाळी अगदी उद्यावर आली आणि आपल्या केसांची वाट लागली असल्याचे आपल्या लक्षात आले असेल. सकाळपासून कडक उन्हामुळे होणारी घामाघूम आणि दुसरीकडे धो धो पाऊस यांमुळे आरोग्यावर ज्याप्रमाणे परीणाम होतो, त्याचप्रमाणे त्वचा, केस यांच्यावरही याचा वाईट परीणाम होतो. दिवाळी ऐन तोंडावर आली असताना वातावरणामुळे केसांची मात्र पार वाट लागलेली असेल. एकीकडे हवामानाचा परीणाम, दुसरीकडे प्रदूषणामुळे केसांची झालेली अवस्था आणि त्यात घरकाम आणि ऑफीस. यांमुळे पार्लरमध्ये जायला वेळ नसल्याने ऐन सणाच्या दिवशी केसांचे काय करायचे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर काही सोप्या स्टेप्स वापरुन आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन आपल्याला घरच्या घरी हेअर स्पा करता येऊ शकतो. पाहूयात हाच स्पा करण्याच्या काही स्टेप्स (Easy and Natural Steps of Hair Spa at Home)...

१. हेअर मसाज 

हेअर स्पा करण्यासाठी सुरुवातील केसांना चांगला मसाज करावा. यासाठी नारळ किंवा ऑलिव्ह तेल कोमट करुन घ्यावे. टाळूला आणि संपूर्ण डोक्याच्या त्वचेला हलक्या हातांनी १५ ते २० मिनिटे मसाज करा. मसाजमुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारते आणि केसांची वाढ होण्यास त्याची चांगली मदत होते. 

२. अशी द्या स्टिम 

पार्लरमध्ये केसांना स्टीम देण्यासाठी काही मशीन्स उपलब्ध असतात. पण घरी केसांना स्टीम देण्यासाठी अगदी सोपी आणि पारंपरिक पद्धत वापरता येते. यासाठी एक सुती टॉवेल गरम पाण्यात बुडवून तो केसांना बांधून ठेवा. १० ते १५ मिनीटे हा टॉवेल बांधून ठेवल्याने केसांना चांगली वाफ मिळेल आणि तेल मुळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यानंतर साध्या पाण्याने सौम्य शाम्पूने केस धुवा.

(Image : Google)

३. हेअर कंडिशनिंग करा

केसांना शॅम्पू केल्यानंतर चांगल्या दर्जाचे कंडिशनर लावणेही आवश्यक आहे. त्यामुळे न चुकता केसांना नियमितपणे कंडीशनर लावा. नैसर्गिक कंडीशनर म्हणून चहाच्या पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून किंवा आंबट दही केसांना लावून हेअर कंडीशनिंग करता येते. जर अशाप्रकारे कंडीशनर तयार केले तर अर्धा तास तसंच राहू द्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा.

४. हेअर मास्क महत्त्वाचा 

बाजारात चेहऱ्याला लावण्यासाठी ज्याप्रमाणे हेअर मास्क मिळतात त्याचप्रमाणे केसांना लावण्यासाठीही काही हेअर मास्क मिळतात. पण तुम्ही घरच्या घरी मास्क तयार करणार असाल तर भांड्यात दोन अंडी, एक चमचा मध आणि थोडे खोबरेल तेल मिसळा. अंडे नको असेल तर पिकलेल्या केळ्याचा वापर करु शकता. हे हेअर मास्क ओल्या केसांवर किमान ३० मिनिटे लावून ठेवा आणि मग सौम्य शाम्पूने केस पुन्हा धुवा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी