विजयादशमी म्हणजेच दसरा हा वर्षातील एक मोठा सण. गणपतीनंतर येणारे नवरात्र, दिवाळी हे सण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात. सणावारांना देवाची आराधना करण्याबरोबरच विविध पदार्थ बनवणे-खाणे, नवनवीन कपडे घालणे, नातेवाईक आणि मित्रमंडळींनी एकत्र येणे हे आवर्जून होते. अशावेळी आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे दसरा, दिवाळी या काळात आपण आवर्जून मेकअप करतो. एरवी मेकअप न करणाऱ्या आपल्याला अचनाक मेकअप करायचे म्हटले की नेमकी कुठून, कशी सुरुवात करायची ते कळत नाही. अशावेळी काही किमान स्टेप्स माहित असतील तर मेकअपचे काम सोपे होते. तसेच यामुळे आपण आहोत त्यापेक्षा नक्कीच काही प्रमाणात सुंदर दिसू शकतो. म्हणून मेकअप करताना आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात अशा ५ स्टेप्स कोणत्या ते पाहूया (Easy and Simple make up Steps for Dasra)...
१. मेकअपची सर्वात महत्त्वाची पहिली स्टेप म्हणजे पूर्वतयारी. त्यासाठी सर्वात आधी सौम्य क्लीन्जरने चेहरा स्वच्छ करावा. क्लिंजर नसल्यास कच्च्या दुधानं चेहेर्याचं क्लीन्जिंग करावं. क्लीन्जिंग नंतर टोनिंग करावं, त्यासाठी गुलाब पाणी वापरलं तरी चालतं, यामुळे त्वचा छान सेट होण्यास मदत होते.
२. टोनिंगनंतर चेहेर्यावर रुमालात बर्फ घेऊन तो काही सेकंद फिरवावा. यामुळे चेहेर्याची त्वचा घट्ट होते आणि मेकअपही दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. चेहेर्याला मॉश्चरायझर अवश्य लावावं, यामुळे चेहेर्यावर ओलसरपणा राहील आणि मेकअप चांगला टिकण्यास मदत होईल. मॉश्चरायजर न लावता मेकअप केला तर काही वेळातच चेहेरा कोरडा पडतो.
३. चेहेरा चांगला दिसण्यासाठी चेहऱ्याला फाउंडेशन लावणं आवश्यक आहे. यामुळे चेहेर्याची त्वचा मऊ होते आणि मेकअप केल्यावरही ती एकसारखी दिसण्यास मदत होते. त्यानंतर चेहऱ्यावरचे डाग झाकण्यासाठी चेहऱ्याला कन्सीलर लावावं. हे लावताना डॉट- डॉट करुन लावावं आणि नंतर स्पंजने पसरावे.
४. डोळ्यांच्या बेसिक मेकअपनेही लूकला छान उठाव येतो. डोळ्यांच्या मेकअपसाठी आयशॅडो, काजळ आणि पापण्या मोठ्या असतील तर आयलायनर एवढंच पुरेसं आहे. लिक्विड काजळाऐवजी पेन्सिल काजळ वापरावं. तसेच लवकर पसरणार नाही अशा काजळाची निवड करावी. हल्ली वेगवेगळ्या रंगाचेही काजळ बाजारात मिळतात, तेही छान लूक देतात.
५. आपण ज्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालणार आहोत त्याला मॅच होईल अशी लिपस्टिक लावावी. लिपस्टिक उठावदार दिसण्यासाठी ती लावण्याआधी लिप लायनर लावावे. लिपस्टीक लावताना आधी लिप बाम लावल्यास ओठ लवकर कोरडे पडत नाहीत.