जाहिरातीत दिसतात तशा मॉडेलसारखे किंवा अभिनेत्रींसारखे आपले केस लांबसडक आणि दाट असावेत असे तरुणींना कायमच वाटते. मात्र नियमित केसांना तेल लावून, ते धुवूनही म्हणावे तसे हेल्दी नसतातच. अनेकदा केस खूप कोरडे होतात तर कधी त्यात खूप कोंडा होतो. केस गळणे आणि त्यामुळे ते पातळ होणे ही तर तमाम मुलींची तक्रार असते. केस गळण्यामागे असंख्य कारणे असतात. कधी केमिकल्सचा अतिवापर, कधी आहारातून होणारे अपुरे पोषण तर कधी प्रदूषण यांसारख्या तक्रारींमुळे केस गळतात आणि मग ते पातळही होतात (Easy Ayurvedic home remedy for thick and long hairs).
केसांची अशी अवस्था झाली की आपण पार्लरमध्ये जाऊन विविध प्रकारच्या महागड्या ट्रिटमेंटस घेतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. केसांसाठी वरच्या उपायांसोबतच पोटातून मिळणारे पोषण आणि उपायही तितकेच गरजेचे असतात. त्यामुळे घरच्या घरी काही सोपे आययुर्वेदीक उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री केस चांगले वाढण्यासाठी घरच्या घरी करता येईल असा एक खास उपाय सांगतात. तो कोणता आणि कसा करायचा पाहूया...
१. भृंगराज ही वनस्पती केसांसाठी अतिशय फायदेशीर असल्याने त्याचे तेल केसांना लावले जाते. त्याचप्रमाणे या वनस्पतीची पाने पोटातून घेतल्यासही केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात.
२. त्यामुळे दररोज सकाळी भृंगराजची ३ पाने आणि १ चमचा काळे तीळ पोटातून घेतल्यास त्याचा केस लांब आणि दाट होण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो. शक्य असेल तर घरातील कुंडीत आपण भृंगराजचे रोपही लावू शकतो.
३. ही ताजी पानं असतील तर २ ते ३ खायची, पण ती उपलब्ध होत नसतील तर आयुर्वेदीक दुकानात मिळणारी भृंगराज पावडर अर्धा चमचा आणि १ चमचा काळे तीळ असेही घेऊ शकतो.
४. हा उपाय करायला सोपा आणि अतिशय कमीत कमी खर्चात होणारा असून तो सलग ३ महिने केल्यास केसांच्या आरोग्य सुधारल्याचे आपल्याला अगदी सहज जाणवते.