Join us  

दसऱ्याला मेकअप न करताही चेहऱ्यावर ग्लो हवा, द्या फक्त ५ मिनीटं, दिसाल सुंदर-देखण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2024 12:18 PM

Easy face yoga steps for glowing skin on Dussehra : पार्लरमध्ये जायला किंवा मेकअप करायला वेळ नाही मिळाला तरी दिसाल उठून..

गौरी-गणपतीनंतर येणारा दसरा हा मोठा सण असून देशभरात तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी घर सजवून आपल्या वाहनांची, घरातील शस्त्रांची पूजा केली जाते. गोडाधोडाचा स्वयंपाक, एकमेकांकडे जाऊन शुभेच्छा देणे, आपट्याचे पान लुटणे अशा पारंपरिक गोष्टींना या दिवशी विशेष महत्त्व असते. या निमित्ताने एकमेकांकडे जाताना किंवा घरातही आपण छान नवीन कपडे घालतो आणि आवरतो. मग या दिवशी आपण छान फ्रेश दिसावे अशी साहजिकच आपली इच्छा असते. सगळ्या घाईगडबडीत आपल्याला  पार्लरमध्ये जायला किंवा मेकअप करायला वेळ होतोच असे नाही (Easy face yoga steps for glowing skin on Dussehra).  

पण मेकअप न करताही चेहऱ्यावर मस्त ग्लो आला तर?  त्यासाठी नेमकं काय करायचं याबाबत समजून घेऊया. अगदी ५ मिनीटांत होणारी ही गोष्ट करायला सोपी असल्याने फायदेशीर ठरते. दसऱ्याला ४ दिवस बाकी असताना आतापासून तुम्ही हा प्रयोग सुरू केलात तर दसऱ्याला तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येण्यास नक्कीच मदत होईल. या व्यायामांमुळे रक्ताभिसरण सुधारते, त्वचेवर चमक येते, पोत सुधारतो आणि त्वचेतील टॉक्सिन्स निघून जाण्यास फायदा होतो आणि त्वचा निरोगी-घट्ट राहण्यास याची चांगली मदत होते. 

१. बोटाच्या पेरांनी चेहऱ्यावर सगळीकडे टॅप करायचे. डोळे मिटून शांतपणे किमान २० सेकंद सगळीकडे हे टॅपिंग करत राहायचे. यामुळे चेहऱ्याच्या पेशी अॅक्टीव्हेट होतात आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यास त्याची मदत होते. 

२. कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी दोन्ही हातांची पहिली २ बोटे घ्यायची आणि ती कपाळावरुन बाहेरच्या बाजूला फिरवायची. कपाळावर आलेला ताण कमी होण्यास आणि रक्तप्रवाह सुरळीत होण्यास याची मदत होते. आपण चेहऱ्याला मॉईश्चरायजर किंवा इतर कोणते क्रिम लावतो त्यावेळी ३० सेकंद ही क्रिया अवश्य करावी. 

३. गालाचा नाकाच्या बाजुला थोडा वर आलेला जो भाग असतो तो छान ग्लोईंग दिसावा यासाठी एक सोपा फेस योगाचा प्रकार उपयुक्त ठरतो. हाताच्या पहिल्या दोन्ही बोटांच्या मागच्या भागाने याठिकाणी मसाज करावा. २० सेकंद हा मसाज केला तरी याठिकाणचा ताण कमी होतो आणि चेहरा ग्लो करण्यास मदत होते. 

४. बरेचदा आपले गाल वयोमानानुसार ओघळल्यासारखे दिसतात. पण तसे होऊ नये आणि त्यांची त्वचा कायम ताठ राहावी यासाठी गाल खालच्या बाजुने वर सरकवल्यासारखा मसाज करावा. 

५. गालाला ज्याप्रमाणे बोटांच्या मागच्या बाजुने मसाज केला तसाच मसाज हनुवटीला दोन्ही हातांनी करावा. साधारणपणे ३० सेकंद हा मसाज केल्यामुळे हनुवटी छान टोकदार दिसण्यास किंवा शार्प दिसण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीदसरा