आपले शरीर कायम फ्रेश आणि ताजेतवाने राहावे यासाठी शरीराला ज्याप्रमाणे व्यायामाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपला चेहरा ग्लोईंग आणि ताजातवाना दिसावा यासाठी चेहऱ्यालाही व्यायामाची आवश्यकता असते. नेहमी आपण चेहऱ्याला मसाज करावा, चेहऱ्याचे काही सोपे व्यायाम करावेत याबाबत ऐकतो. पण सणावारांच्या काळात किंवा एरवीही चेहरा ग्लोईंग दिसावा यासाठी कोणत्या क्रिया केलेल्या फायदेशीर ठरतील याविषयी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र काही महत्त्वाच्या टिप्स देतात. ब्यूटी, आरोग्य, फिटनेस या विषयात डॉ. हंसाजी कायम मार्गदर्शन करत असतात. पाहूया चेहऱ्याच्या कोणत्या क्रिया केल्यास आपला चेहरा कायम ग्लो करेल (Easy Facial Exercises for glowing Skin)...
१. कपाल रंध्र धौती
हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ आधी समजून घ्यायला हवा. कपाल म्हणजे कपाळ किंवा संपूर्ण चेहरा, रंध्र म्हणजे चेहऱ्यावरील रंध्रे आणि धौती म्हणजे ती चमकणे किंवा स्वच्छ करणे. या क्रियेमुळे चहरा आतून आणि बाहेरुन स्वच्छ होण्यास मदत होते. तुम्हाला चेहऱ्यावर कुठे पिंपल्स असतील किंवा त्वचा खूप कोरडी असेल तर चेहऱ्याला मसाज न करता हळूवारपणे प्रेशर द्या. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन त्वचेच्या तक्रारी कमी होण्यासही मदत होईल. चेहरा खूप कोरडा असेल तर चेहऱ्याला मॉइश्चरायजर किंवा तेल लावून हा मसाज करायला हवा. आपल्या बोटांमध्ये अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल या पंचमहाभूतांची शक्ती असते. त्यामुळे आपण बोटांनी जेव्हा चेहऱ्याला मसाज करतो तेव्हा एकप्रकारची एनर्जी चेहऱ्यामध्ये पास होते. शरीर आणि मनातील नकारात्मक किंवा नको असलेल्या गोष्टी बाहेर पडाव्यात यासाठी ही क्रिया केली जाते.
कसे करायचे?
१. सुरुवातीला चेहरा आणि हास स्वच्छ धुवायचे.
२. मांडी घालून किंवा तुम्हाला सोयीच्या आसनात पाठ ताठ ठेवून बसा.
३. दोन्ही हातांचे अंगठे कपाळाच्या बाजूला ठेवून इतर बोटांनी कपाळावर मसाज करा.
४. पहिल्या दोन बोटांनी नाकाच्या बाजूने मसाज करा.
५. हाताच्या पहिल्या बोटांनी कानाच्या बाजुने गोलाकार मसाज करा.
६. मान वर करुन खालून वर असा मानेला मसाज करा.
२. सिंहासन
या आसनाचा चेहऱ्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो. नियमितपणे हे आसन केल्यास चेहऱ्याचा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
कसे करायचे?
१. वज्रासनात बसावे आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडे अंतर घ्यावे.
२. हाताचे पंजे जमिनीला टेकलेले ठेवावेत.
३. पुढच्या बाजूला वाकून तोंड उघडावे.
४. जीभ बाहेर काढून ती जास्तीत जास्त ताणावी.
५. डोळे मोठे करुन लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी किंवा नाकाच्या शेंड्यावर केंद्रित करावे.
६. काही सेकंदांसाठी हे आसन करावे आणि पुन्हा रिलॅक्स व्हावे. चेहरा ग्लो होण्यासाठी या आसनाचा अतिशय चांगला फायदा होतो.