थंडीच्या दिवसांत तापमान कमी झाल्यामुळे हवेत एक प्रकारचा कोरडेपणा येतो. त्यामुळे आपल्या शरीरातही हा कोरडेपणा वाढतो. शरीराच्या आत आणि बाहेर हा कोरडेपणा जाणवतो. म्हणूनच थंडीच्या दिवसांत आपण शरीराला जास्त स्निग्धता देणारे, उष्ण, पौष्टीक पदार्थ खातो. शरीराची आतून स्निग्धता वाढवण्यासाठी हे उपाय करतो. त्याचप्रमाणे त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आपण त्वचेला तेल लावणे, मॉईश्चरायजर, कोल्ड क्रिम असे काही ना काही लावतो. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. पण शरीराच्या त्वचेबरोबरच आपली डोक्याची त्वचाही कोरडी पडते (Easy Home remedies for Dandruff Issue in winter hair care tips) .
या त्वचेच्या कधी खपल्या निघतात तर कधी कोरडेपणामुळे त्यात प्रमाणाबाहेर कोंडा होतो. हा कोंडा एकदा झाला की तो लवकर कमी व्हायचे नाव घेत नाही. अशावेळी आपल्याला नेमके काय करावे ते कळत नाही. कारण केस विंचरताना हा कोंडा कपड्यांवर पडतो. इतकेच नाही तर केसांवरही बरेचदा हा कोंडा दिसून येतो. अशावेळी आपल्याला एकदम लाजल्यासारखे होते. म्हणूनच थंडीच्या दिवसांत होणारा कोंडा कमी होण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय कोणते ते पाहूया...
१. कोरफड
कोरफड हा सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरला जाणारा सर्वात उत्तम घटक आहे. त्वचेच्या,पोटाच्या आणि केसांच्याही कित्येक समस्यांवर कोरफड अतिशय उपयुक्त ठरते. कोरफडीचा गर काढून त्यामध्ये काही थेंब तेल घालावे.हे मिश्रण एकजीव करुन केसाच्या मुळांना लावून ठेवावे. २० ते २५ मिनिटांनंतर एखाद्या हलक्या स्वरुपाच्या शाम्पूने केस धुवावेत. कोरफडीमुळे केसातील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते आणि कोंडा कमी होतो.
२. लिंबू
आपण केसांना नेहमी तेलाने मसाज करतो. याच तेलात लिंबाचे काही थेंब टाकून केसांच्या मुळांना मसाज करायला हवा. यासाठी शक्य तितके नैसर्गिक खोबरेल तेल वापरायला हवे. हा मसाज ३ ते ५ मिनिटांपर्यंत करा. हे मिश्रण लावल्यावर केस साधारणपणे तासभर तसेच ठेवावेत जेणेकरुन तेल आणि लिंबाचा रस मुळांमध्ये चांगला मुरेल आणि कोंडा कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर नेहमीप्रमाणे केस शाम्पू आणि कंडीशनरने धुवावेत.या उपायाचा तुम्हाला त्वरीत आणि चांगला परीणाम दिसून येईल.
३. कांदा
कांद्यामध्ये केसांसाठी उपयुक्त असे बरेच गुणधर्म असतात. म्हणून अनेक महिला कांद्याचे तेल, शाम्पू असे काही ना काही वापरुन केसांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात. केसगळती कमी होण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी, केस मजबूत होण्यासाठी तसेच कोंडा कमी होण्यासाठी हा रस लावणे फायदेशीर असते.कांद्याचा रस, तेल आणि लिंबाचा रस एकत्र करुन हे मिश्रण काही वेळासाठी डोक्याला लावून ठेवावे. नंतर केस नेहमीप्रमाणे धुवावेत. कोंडा कमी होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.